RSS

बुधवार, २ एप्रिल, २०१४

संयुक्ता पाऊल "पळते" पुढे - एक अनोखं गेट-टुगेदर

२०१३ च्या जानेवारी महिन्यापासून मी आणि मेघनाने आपापल्या देशात नियमित रनिंग करायला सुरुवात केली. आम्ही एकमेकींना आमच्या रोजच्या रनिंगचे अपडेट्स देत होतो, प्रोत्साहन देत होतो, नवनवीन टार्गेट्स देत होतो. सहा महिने प्रॅक्टिस झाल्यानंतर एक दिवस दोघींना वाटलं की आपापल्याच देशात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी का होईना, पण एकाच वेळी धावलो तर ....? दोघींच्या टाईमझोनमध्ये ५ तासांचा फरक असूनसुध्दा हे जमवलं. मेघनाने तिच्या सकाळी ६.०० वाजता घरातुन ट्रॅककडे निघताना मला पिंग केलं आणि मी पण त्याचवेळी घरातुन बाहेर पडले. इप्सित स्थळी पोचून स्ट्रेचिंग करुन झाल्यावर फोन वरुन "गेट-सेट-गो" चा सिग्नल देऊन पळायला सुरुवात केली. थँक्स टू आयफोन आणि थँक्स टू टेक्नॉलॉजी स्मित २०१४ च्या फेब्रुवारी पर्यंत कधी ५के, कधी ७के, कधी १०के अशी वेगवेगळ्या अंतराची पाच-सहा वेळेस 'रनिंग गेट-टुगेदर्स' झाली. मनात विचार आला की जर आम्ही दोघी ह्या दोन टाईमझोन्समध्ये जमवू शकतो तर यात "मायबोली" वरच्या इतर "संयुक्तांना" सहभागी केलं तर??
विचार आल्यावर लगेच ठरवून संयुक्तामध्ये या कल्पनेचं सुतोवाच केलं आणि महिला दिनाच्या मुहुर्तावर लगेच धागा सुरु केला. मेघनाला खरंतर खूप रिस्पॉन्सची अपेक्षा नव्हती. पण सांगायला आनंद होतोय की तिचा चांगलाच अपेक्षाभंग झाला. फिदीफिदी
आणि सुरुवात झाली एका अनोख्या संयुक्ता गेट-टुगेदरच्या प्लॅनिंगला! आत्तापर्यंत आम्ही दोघीच करत असलेल्या गेट-टुगेदरला आता थोडं मोठं स्वरुप येणार होतं. त्यानुसारच साधारण कल्पना होती 'एक वेळ - वेगवेगळी ठिकाणं'. म्हणजे एकाच वेळेस वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या संयुक्तांनी या 'रनिंग गेट-टुगेदर' मध्ये भाग घ्यायचा. अंतर ठरलं ५ किमी. आणि तारीख ३० मार्च २०१४! जपानमध्ये मी सकाळी ११.०० वाजता रनिंग सुरु करणार तेव्हा भारतात सकाळचे ७.३० झालेले असतील तर मध्य पूर्वेत सकाळचे ६.००. यातच अजून ५ वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या संयुक्तांनी भाग घेऊन आमच्या उत्साहात भर घातली. सिंगापूर, युके, अमेरिका (इस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट) आणि ऑस्ट्रेलिया.
काही जणींना रनिंगची सवय होती तर काही जणींना रोजच्या चालण्याच्या व्यायामाची. काही जणींनी आत्तापर्यंत कधी सुरुवात केली नव्हती पण ह्या गेट-टुगेदर मधे भाग घ्यायच्या निमित्तानी सुरुवात करायची होती. काही जणींना आपण हे अंतर चालत निश्चित पार करु असं वाटत होतं परंतू धावण्याबद्दल विश्वास नव्हता. मग हे फक्त "रनिंग गेट-टुगेदर" न करता "रनिंग/वॉकिंग गेट-टुगेदर" करायचं ठरलं. म्हणता म्हणता ५२ जणी जमल्या.
इथे एक बाब आम्हांला खूप कौतुकाची वाटली. भारतात एक तर उन्हाळा सुरु झालेला आणि तसं म्हटलं तर चालण्या-पळण्यासाठी घराच्या अगदी जवळपास सोयीची जागा असेलच असं नाही. पण असं असूनसुद्धा भारतातल्या संयुक्तांनीच मोठ्या संख्येने या रनिंग/वॉकिंग गेट-टुगेदरमध्ये भाग घेतला.
आत्ता पर्यंत आम्ही दोघीच जेंव्हा हे रनिंग गेट-टुगेदर करत होतो तेंव्हा जपान आणि युएई ह्या दोनच देशातल्या वेळा आणि ऋतुंची चिंता करावी लागत होती. पण आता सगळ्याजणी मिळुन वेगवेगळ्या आठ टाईमझोनमधल्या संयुक्ता होत्या. त्यातुन सगळीकडचे ऋतुही पूर्ण वेगळे. जपानमध्ये मी ३० मार्चला सकाळी ११.०० वाजता सुरु करणार तेंव्हा ऑस्ट्रेलियाची लोकल वेळ होत होती भर दुपारी १.०० आणि सिंगापुरला लोकल वेळ सकाळी १०.००. पण अमेरिकेच्या इस्ट कोस्टवर तेंव्हा होत होते २९ मार्चच्या रात्रीचे १०.०० व वेस्ट कोस्टला संध्याकाळचे ७.००. तर युके मधे तेंव्हा वाजणार होते ३० मार्चच्या पहाटेचे ३.००. त्यामुळे अगदी एकाच वेळी सगळ्यांनी धावण्याचं गणित थोडं अवघड वाटायला लागलं. मग सगळ्यांच्या वेळेचा आणि त्या-त्या देशातल्या ऋतुंचा विचार करून तीन ग्रूप पाडले. पहिल्या ग्रूपमधल्या म्हणजे सिंगापूर, अमेरिकेतल्या पूर्व किनार्‍यावरच्या व ऑस्ट्रेलियामधील संयुक्ता आत्ता ठरलेल्या वेळेच्या तीन तास आधी एकत्र सुरु करतील. ठरलेल्या वेळेवर दुसर्‍या ग्रूपमधल्या संयुक्ता ज्या जपान, भारत, मध्य पूर्व व अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर होत्या त्या ठरवून एका वेळेस धावतील. युकेतल्या संयुक्तांची वेळ कोणाबरोबरच जमत नव्हती त्यामुळे त्या त्यांच्या ३० मार्चला रविवारी सकाळी ७.३० ला एकत्र धावतील असं ठरवलं.
मध्य पूर्वेचे देश सोडल्यास सगळ्यांना सोईचा म्हणून रविवार ठरवला होता. पण कुवेतच्या एका संयुक्ताने आपल्याला रविवारी जमणार नाही म्हणुन शनिवारी एकटीने चालेन असं सांगून अप्रत्यक्ष भाग घेतला तर भारतातल्या एका संयुक्तेला सकाळी चालणं जमणार नव्हतं म्हणून तिनेही संध्याकाळी चालेन पण ठरलेलं अंतर चालून पूर्ण करेन असा संकल्प केला. त्या अगदी गेट-टुगेदर मध्ये सगळ्यांच्या वेळेला सहभागी नसल्या तरी त्यांनी चालण्याचं ठरवलं होतं हेच पॉझिटिव्ह होतं.
बुलेटिन बोर्ड उघडला, नावनोंदणी पण व्हायला लागली. तरी सगळ्यांना सतत मोटिवेट करत राहाणं खूपच गरजेचं होतं. त्यामुळे दर ३-४ दिवसांनी याच्याशी संबंधित चित्रं व त्याबरोबर संदेश टाकायचा असं ठरवलं जेणेकरून भाग घेतलेल्या संयुक्तांना ३० मार्चची, पर्यायाने सरावाची आठवण राहील आणि संयुक्तांचा उत्साहही वाढायला मदत होईल. मग एकमेकींचा उत्साह वाढवणं, टिप्स देणं, एकाच शहरात असणार्‍या संयुक्तांना भेटुन एकत्रच कुठे धावता/चालता येईल ह्या बद्दल चर्चा झडु लागल्या. हल्ली स्मार्टफोन्सवर चालण्या-धावण्याशी संबंधित बरीच चांगली चांगली अ‍ॅप्स मिळतायत. अंतराचा अंदाज येण्यासाठी हे गरजेचंही होतं. बहुतांशी जणी हे असं पहिल्यांदाच करणार होत्या त्यामुळे कोणतं अ‍ॅप चांगलं वगैरेची चर्चाही झालीच. ज्या आधीपासूनच अशी अ‍ॅप्स वापरत होत्या त्यांनी त्यांच्या अनुभवाची देवाण-घेवाण केली.
गेट-टुगेदर च्या दिवशी त्या-त्या ग्रूपमधल्या सगळ्यांनी एकाच वेळेस धावणं/चालणं अपेक्षित होतं. त्यामुळे गेट-टुगेदर साठी "गेट-सेट-गो" चा सिग्नल द्यायला व्हॉट्सअॅप वर ग्रूप्स करायचे असं ठरलं. पुन्हा एकदा थँक्स टू द टेक्नॉलॉजी स्मित त्याप्रमाणे दहा बारा दिवस आधीच बुलेटिन बोर्डवर लिहून नंतर वेळेत फोन नंबर्स मिळून ग्रूप करता यावा यासाठी सगळ्यांना संपर्कातून मेल टाकून फोन नंबर्स मागवले.
बुलेटिन बोर्ड वेगळ्या अर्थाने पेटला होता. सगळ्याच जणी खूप उत्साहात होत्या. आणि मर्फीच्या नियमांनुसार १०-१२ दिवस आधी स्वत:चं आजारपण, मुलांचं आजारपण, ऑफिसमधल्या कामाचा ताण अश्या एकेक अडचणी यायला लागल्या. असं असलं तरी ठरलेल्या दिवशी धावायचा/चालायचा निश्चय अटळ होता.
ठरल्याप्रमाणे बरोब्बर दोन दिवस आधी व्हॉट्सअ‍ॅपवर तीन ग्रूप्स पाडले गेले. आणि तिथे चर्चेला सुरुवात झाली. टाईमझोनप्रमाणे जसं धावायचं/चालायचं ठरलं होतं, त्याचप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवर तीन ग्रूप्स तयार केले. सगळ्यांचे फोन नंबर्स त्यावर अ‍ॅड केल्यावर तिथे एकच गडबड सुरु झाली. फिदीफिदी मायबोलीवर असतात त्याप्रमाणे इथेही बर्‍याच जणी वाचनमात्र होत्या. डोळा मारा
हां-हां म्हणता गेट-टुगेदर चा रविवार उजाडला. सिंगापूरमध्ये सकाळचे ७ वाजत होते तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये सकाळचे १० तर अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर शनिवारची संध्याकाळ. तिथल्या संयुक्ता त्यांच्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता सुरु करणार होत्या. पहिला ग्रूप जपानच्या वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता सुरु करणार होता. ठरल्याप्रमाणे मी माझ्या ७.३० वाजता म्हणजे अर्धा तास आधी त्यांना पिंग करणार होते. पण त्या सगळ्या जवळजवळ तासभर आधीपासूनच उत्साहात तयार होऊन वेळ होण्याची वाट बघत होत्या त्यांचा उत्साह बघुनच हे गेट-टुगेदर नक्की यशस्वी होणार ह्याचे सिग्नल्स मिळाले.
आमच्या ग्रूपची वेळ जवळ येत गेली तसे व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजेस यायला लागले. सगळ्यांना स्टार्टिंग पॉईंटला १५ मिनीटे आधी पोचून स्ट्रेचिंग करून तयार रहा अशी सूचना दिली होती त्याप्रमाणे सगळ्याजणी एकदम जय्यत तयारीत होत्या. माझ्या जपानच्या टाईमझोनबरोबर इतर ३ टाईमझोनमधल्या (भारत, युएई व अमेरिकेचा पश्चिम किनारा) संयुक्ता माझ्याबरोबर भाग घेणार होत्या. आम्ही ट्रॅकवर जायला निघायच्या आधीच पहिल्या ग्रूपमधल्या संयुक्तांचे कामगिरी फत्ते झाल्याचे मेसेजेस यायला सुरुवात झाली होती. मी १०.४० ला ट्रॅकवर जायला निघाले, भारतातल्या संयुक्ताही त्यांच्या नियोजित ठिकाणी जायला निघाल्या होत्याच. बरोबर ११ च्या ठोक्याला मेघनाने 'गेट सेट गो' चा सिग्नल दिला आणि एका मोठ्या ग्रूपच्या गेट-टुगेदर ला सुरुवात झाली. सगळ्यांचा उत्साह ऊतू जात असल्याने काहीजणी प्रत्येक कि.मी.चा अपडेट देत होत्या तर काहीजणींनी ठरलेलं अंतर पूर्ण झाल्यावरच अपडेट्स दिले. तासाभरात व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजेसचा पूर यायला लागला. ठरल्याप्रमाणे जवळ जवळ सगळ्यांनीच या गेट-टुगेदर मध्ये भाग घेऊन ते यशस्वी करून दाखवलं.
दुसर्‍या आणि तिसर्‍या ग्रूपच्या वेळेत तसं बरंच अंतर होतं. तिसर्‍या ग्रूपमध्ये फक्त युकेमधल्या संयुक्ता भाग घेणार होत्या. त्या त्यांच्या सकाळी ७.३० वाजता सुरु करणार होत्या. त्याप्रमाणे बरोबर ६.३० वाजता त्यांना पिंग करून तयारीला लागायची आठवण करून दिली. वेळेच्या आधी १५ मिनीटं पोचून स्ट्रेचिंग करायची आठवण करायलाही विसरलो नाही. बरोबर ७.३० वाजता त्यांनाही 'गेट सेट गो' चा सिग्नल दिला आणि त्यांच्या अपडेट्सची वाट बघत बसलो. ह्या गेट-टुगेदर चा गड सर होण्याचा हा शेवटचा टप्पाच राहिला होता.तासाभरात त्यांचेही टार्गेट पूर्ण केल्याचे मेसेजेस ग्रूपमध्ये आले. आणि हे गेट-टुगेदर खर्‍या अर्थाने यशस्वी झालं.
ह्या अनोख्या गेट-टुगेदर मध्ये आम्ही सगळ्या "संयुक्तांनी" मिळून आज काही तासात जगभरातील २५० कि.मी.पेक्षा जास्त परिसर पायाखालून घातला. स्मित
आत्तापर्यंत आम्ही दोघीच असं ठरवून धावत होतो त्यामुळे आमच्यात को-ऑर्डिनेशन उत्तम आहे हे कळलं होतंच. पण आता वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या इतक्या जणी असणार होत्या. इतका सगळा घाट तर घातलाय, नीट पार पडेल नां? याची धास्ती होती खरंतर थोडी. पण सगळ्या भाग घेतलेल्या संयुक्तांनी ती भिती व्यर्थ ठरवली. स्मित त्यांचा उत्साह बघून आम्हांलाही हुरूप आला. या गेट-टुगेदर नंतर असं गेट-टुगेदर पुढेही करत राहू असा रिस्पॉन्स जवळपास सगळ्याच संयुक्तांकडून आला. त्यांच्या या सुचनेचा विचार नक्की करणार आणि पुढचं गेट-टुगेदर अजून थोडं टार्गेट वाढवून करणार म्हणजे त्या निमित्ताने सगळ्यांचा नियमित सराव चालू राहील.
उत्साहाने भाग घेऊन हे गेट-टुगेदर यशस्वी केल्याबद्दल संयुक्तातील सगळ्याच मैत्रिणींचे मनापासून आभार. तुम्ही नसतात तर आम्हांला इतका उत्साह आला ही नसता. स्मित त्यामुळे हे अश्या प्रकारचं गेट-टुगेदर ठरवण्याची कल्पना आणि प्लॅनिंग आमचं असलं तरी ती कल्पना प्रत्यक्षात उतरली ती सगळ्या संयुक्तांच्या सक्रिय आणि शिस्तबद्ध सहभागामुळेच!

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

प्रवास - एक वर्ष आणि दहा किलो मीटर रेसचा


जानेवारी २०१३ -


जुनं वर्ष संपता संपता वजनाचा आकडा वाढायला लागला होता. २०१२ मधे अधेमधेच कधी तरी केलेलं रनिंग आता २०१३ मधे अगदी मनापासून आणि नियमित करायचं ठरवलं.
आधी बरेचदा कधी खूप ऊन आहे तर कधी पाऊस आहे ह्या सबबींखाली रनिंगला दांडी मारली जायची.  ह्या सबबी नसतील तेंव्हा "कंटाळा आला" ही सबब असायचीच :) 
त्याचवेळी मियाझावा केन्जी लिखित "आमे नी मो माकेझु - काझे नी मो माकेझु......"
(雨にもまけず 風にもまけず) ही पूर्ण कविता वाचनात आली.
"मला स्वत: अशी व्यक्ती व्हायला आवडेल" असा मतितार्थ असलेल्या ह्या कवितेच्या पहिल्या दोन ओळी आहेत - "वार्‍याची तमा न बाळगणारं, पावसाला न घाबरणारं, बर्फाला, उन्हाच्या काहिलीला न डगमगणारं माझं शरीर असेल ".
ही कविता वाचनात येणं हा नियमितपणे रनिंगला जाण्याच्या अनेक दट्ट्यांपैकी एक म्हणायला हरकत नाही.

२०१२ मधे साधारण ३ ते ४ किलोमीटरचा टप्पा गाठुन झाला होता.  पण गॅप पडल्यामुळे परत सुरुवात केली ती २.५ किलोमीटर पासून.  तीन किलोमीटर सलग पळता येणं ही कितीतरी दिवस मोठी achievement वाटायची. जपानमधे बाराही महिने कुठल्याही प्रकारच्या हवामानात कुठल्याही वेळेला अनेकजण पळताना दिसतात. जॉगिंग ट्रॅक वर रोज विविध लोकं दिसायची. त्यात रोज येणारी ठराविक माणसंही असायचीच. विशेषतः म्हातारी माणसं. त्यांच्या चालण्या/धावण्याच्या स्पीड मधला नियमितपणा, रोजच्या येण्यामधला नियमितपणा पाहुन सतत स्वतःला motivate करत राहिले.


शैलेशनी दिलेल्या एका रनरच्या ब्लॉगवर वाचनात आलं की "there is no such thing as bad weather, just bad clothes". ह्या वाक्यामुळे "आमे नी मो माकेझु - काझे नी मो माकेझु" वर जास्त focus करता आलं. आता रनिंगला जाण्यात बर्‍यापैकी नियमितपणा आला होता. मग नवीन शूज, सिझन प्रमाणे कपडे ह्याची खरेदी वाढायला लागली.
आता हळुहळू जास्त अंतर धावता यायला लागलं होतं. फेब्रुवारी मधे पहिल्यांदा ५ किलोमीटरचा पल्ला गाठला आणि मार्चच्या पहिला आठवड्यात ६ किलोमीटरचा!
एकदा ६ किलोमीटर केल्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस धाडस करुन ८ किलोमीटर रनिंग झालं. २ महिन्यांपूर्वी माझ्यासाठी ही केवळ अशक्य गोष्ट होती.  एकदा इतकं अंतर केल्यानंतर खूपच confidence आला. आता पुढच्या वर्षी कधीतरी १० किलोमीटरच्या रेस मधे भाग घेता येईल अशी अंधुकशी शक्यता आता वाटायला लागली होती.

एप्रिल २०१३ -
२०१२ मधे हेमंत आणि शैलेशनी यामानाशी प्रिफेक्चर मधे "कात्सुनुमा" ह्या ठिकाणी होणार्‍या फ्रुट्स मॅरेथॉन मधे भाग घेतला होता. तिथेच १० कि.मी. च्या रेसही असतात असं कळलं. मग येत्या ऑक्टोबर मधे त्यामधे भाग घेण्यासाठी प्रयत्न सुरु करावेत का, असा विचार सुरु झाला.
आणि एक दिवस पावसात पळायला गेलेलं असताना ४ किलोमीटर पळुन झाल्यावर अचानक डावा पाय दुखायला लागला. तसंच हळुहळु अजुन एक किलोमीटर अंतर गेले. पाय खूपच दुखायला लागला होता. त्यानंतर एक दिवस आराम केला आणि परत दुसर्‍या दिवशी धावायला गेले. पण........ अजिबातच २ पावलंही पुढे धावायला जमेना. शेवटी २ दिवस ५-५ किलोमीटर चालायचं ठरवलं. दुखणं सहन होईनासं झालं तेंव्हा डॉक्टर गाठला. डॉक्टरांनी किमान महिनाभरची सक्तीची विश्रांती सांगितली. त्यामुळे रनिंग तर सोडाच, कुठे बाहेर येण्याजाण्यावरही बंदी आली.
मग पाय बरा झाल्यानंतर हळुहळू चालायला सुरुवात केली. धावण्याचा आत्मविश्वास परत येईपर्यंत जवळजवळ महिना गेला. 

जुलै २०१३ ते सप्टेंबर २०१३-
२४ जूनला कात्सुनुमा फ्रुट्स मॅरेथॉनच्या entries सुरु झाल्या.  ह्या वर्षीची रेसची तारीख २० ऑक्टोबर होती. पहिल्याच दिवशी उत्साहानी entry केली. मी १०के साठी दिली आणि हेमंत आणि शैलेशनी हाफ मॅरेथॉनसाठी. आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात कमरेत उसण भरली. ह्या दुखण्यानी पण जवळ जवळ तीन आठवडे खाल्ले. आता कात्सुनुमा मधे पळणं शक्य होईल असं वाटेना.  तीन आठवड्यांनी पुन्हा नव्यानी सुरुवात केली. स्वत:ला motivate करत सराव सुरु केला.
सप्टेंबर मधे घराचं शिफ्टिंग केलं त्यात परत २ आठवडे सुट्टी झाली. जुलै ते सप्टेंबर मधे ७ किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची प्रॅक्टिस झाली नव्हती त्यामुळे टेन्शन वाढायला लागलं.
आता शेवटचा एक महिना कोणतीही दुखापत होऊ न देता धावायचं असं मनाला पक्कं बजावलं.
महिन्याभरात २ वेळा १० किलोमीटरची practice करुन झाली आणि आपण नक्कीच ही रेस पूर्ण करु शकतो असा आत्मविश्वासही आला.  मात्र ऐन रेसच्या दिवशीचं टेन्शन होतंच. नेमकी त्यादिवशी काही दुखापत होणार नाही ना, ही भीती मनात होतीच.

ऑक्टोबर २०१३ -
 १९ ऑक्टोबरला म्हणजे रेसच्या आदल्या दिवशी आम्ही सगळे सहाजणं कात्सुनुमाला रवाना झालो. २ वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी म्हणुन ह्या भागात आलो होतो. तेंव्हा "शिझेन-गाक्को" मधे राहिलो होतो, तिथेच ह्यावेळी राहिलो.
आदल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजताच जेवणाची वेळ होती.  भात-मासे-मिसो सूप असं अगदी टिपिकल जपानी जेवण होतं.
दुसर्‍या दिवशी म्हणजे २० तारखेला सकाळी ब्रेकफास्टची वेळ ६.३० होती. त्यामुळे रेसच्या आधी ३ तास जपानी ब्रेकफास्ट करुन तयार होतो.  आदल्या रात्री पासून मस्त पाऊस पडत होता. एप्रिल मधल्या पावसातल्या पळण्यानी झालेल्या दुखापतीची आठवण होऊन पुन्हा धडधडायला लागलं. ७.३० ला "शिझेन गाक्को" मधुन प्रस्थान केलं आणि नेमुन दिलेल्या पार्किंग लॉट मधे गाडी लावली. पार्किंग लॉट म्हणजे खरं तर द्राक्षांच्या मळेच होते. द्राक्षाच्या मांडवाखालची रिकामी जागा स्पर्धकांच्या गाड्यांसाठी तात्पुरती राखुन ठेवली होती.
इतक्या पावसातही स्पर्धकांचा उत्साह, आणि आयोजकांची शिस्त वाखाणण्यासारखी होती. बुथ वर जाऊन नंबरचं बिब घेतलं. ते लावुन toilet च्या लांबलचक रांगेत जाऊन उभी राहिले. घड्याळाचे काटे ज्या वेगानी पुढे पुढे सरकत होते तितक्याच संथ गतीनी ती रांग पुढे सरकत होती. या रांगेत उभं राहुनच stretching केलं.  toilet पासून चालत साधारण १० मिनिटाच्या अंतरावर १०के ची स्टार्ट लाईन होती. कसंबसं पळतच  स्टार्ट लाईन गाठली. इतकं ऐनवेळी धावत पळत गेल्यावर स्थिर व्हायला तर वेळ मिळाला नाहीच पण इतक्या गर्दी मधे स्टार्ट लाईन पासून बराच मागे नंबर लागला.  ह्या सगळ्यामुळे टेन्शनचा पारा अगदी वर गेला होता :)
आयपॉड वर गाणी सुरु झाली. एरवी रनिंगसाठी म्हणुन खास उडत्या चालीची गाणी असतात. पण ह्यावेळी playlist मधे थोडे बदल करुन सुरुवातीला "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा....", "उड जायेगा..." आणि "अवघा रंग एक झाला..." ही गाणी सुरुवातीला टाकली होती. आणि ह्या गाण्यांचा अपेक्षित परिणाम होऊन आलेलं टेन्शन कधी गेलं हे कळलंच नाही :) आता आजुबाजुच्या वातावरणाकडे लक्ष जायला लागलं. मस्त रिमझिम पाउस पडत होता. आजुबाजुचे द्राक्षांचे मळे आणि वाइनरीज बघत धावणं हा खरोखरच नयनरम्य अनुभव होता. ज्यांना काही records करायची होती, ती सगळी लोकं वेळेत जाऊन स्टार्ट लाईनला थांबली होती. त्यामुळे तसा लोंढा केंव्हाच पुढे गेला होता. बाकी माझ्या सारखी असंख्य मंडळी सगळा परिसर मनमुराद बघत बघत धावत होती. तितक्यात माझ्यापुढे मला २ माणसं एकमेकांचे हात धरुन (दोरीनी बांधलेले) पळताना दिसली. नंतर कळलं की त्यातला एक जण अंध आहे, आणि त्यानी रेसमधे भाग घेतलाय. त्यामुळे बरोबरचा माणुस त्याचा दिशादर्शक आहे. ह्या माणसाला बघुन मला आत्तापर्यंत मी केलेला व्यायामाचा कंटाळा आठवला आणि लाज वाटली. एव्हाना आता हाफ मॅरेथॉन सुरु झाली होती. तितक्यात मागुन सुचना आली की पट्टीचे रनर्स आता वेगात जातील. त्यामुळे १०के वाल्यांनी डाव्या बाजुने धावा. आणि पुढच्या ५ मिनिटातच बंदुकीतुन गोळी जावी तसे ते top runners सटासट आमच्या उजव्या बाजुने पुढे गेले. मला आठवलं प्राथमिक शाळेत असताना हायस्कुलच्या ताया टेचात शेजारुन गेल्या की आम्ही मंत्रमुग्ध होऊन बघत रहायचो. तसंच ह्या रनर्स कडे काही वेळ बघत राहिलो :)
कात्सुनुमाचे सगळे रस्ते चढ-उतारांचे आहेत. इतक्या चढावर मी आतापर्यंत कधीच धावले नव्हते. त्यामुळे चांगलचाच दम लागला आणि वेगही मंदावला. 
इतक्या पावसात कात्सुनुमाचे रहिवासी सगळ्यांना प्रोत्साहन द्यायला आले होते. लहानांपासून अगदी कमरेत वाकलेल्या आजी-आजोबांचं "गांबारे~~ गांबारे" ऐकुन मस्त वाटत होतं. जिथे खूपच चढावर आम्ही अगदी ढपुन जात होतो तिथे ही माणसं "अजुन ३०० मीटरच चढ राहिलाय, मग उतार आहे...." असं सांगत होती. 
शेवटी एकदाचे सगळे चढ संपले आणि मस्त उतार सुरु झाला.  ९ किलोमीटरचा बोर्ड पाहिला आणि जीवात जीव आला. शेवटचा एक किलोमीटर पूर्ण सपाट रस्ता होता. शेवटी १ तास १६ मिनिटात फिनिशलाईन वर पाय ठेवला :) म्हणजे नेहमीपेक्षा ६ मिनिटं कमी लागली होती.
आपण अगदीच शेवटचे येऊ नये, आपल्या नंतर निदान चार तरी लोक असावेत असं वाटत होतं. १०८२ लोकांमधे ६११ वा नंबर आला. सर्टिफिकेट बरोबर वाइन ची बाटली आणि द्राक्षाचे घड बक्षिस मिळाले. खर्‍या अर्थानी स्वमेहनतीची द्राक्ष आणि वाईन म्हणता येईल ह्याला :)

जानेवारी २०१४ 
ह्या पहिल्या रेसच्या आनंदाचा भर जरा ओसरल्यावर पुन्हा एकदा "रननेट"च्या साइट वर जाऊन तोक्यो भागातच काही १०के च्या रेस आहेत का ह्याचा शोध घेतला. आणि १ जानेवारीच्या सकाळी १०के ची रेस "तामागावा" च्या काठावरच आहे असं कळलं. तिथे लहान मुलांसाठी पण २ किलोमीटरची रेस होती. मग अवनीचं नाव २के आणि माझं १०के साठी दिलं. ३१ डिसेंबरला पार्टी करुन उशिरा झोपुन १ जानेवारीला उशिरा उठणं ह्यापेक्षा मला ह्या रेसची कल्पना खूपच आवडली (यामुळे घरातल्या बाकी लोकांना पार्टी नाही करता आली, त्यामुळे ही कल्पना त्यांना नसावी तितकी पसंत ;) ) १ तारखेला सकाळी ७ वाजता मी, हेमंत आणि अवनी निघालो. नवीन वर्षाची अशी उत्साहात सुरुवात करणारी गर्दी बघुन मस्त वाटलं :) 
मात्र ह्या रेसमधे माझ्या समजुतीचा थोडा घोटाळाच झाला. रेसची जी वेळ, म्हणजे सकाळी १०:००, सांगितली होती ती फक्त लहान मुलं आणि पुरुष गटाची होती. महिला गटाची वेळ सकाळी ११.३० होती. आता इतक्या सकाळपासून इथे येऊन ११.३० पर्यंत नुसतंच बसुन राहण्यात काहीच राम वाटेना. शेवटी पुरुष गटात पळणं म्हणजे फक्त तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही, पण पळायला परवानगी नाहीच असं नाही, हे शेवटच्या क्षणाला कळलं. आणि सगळे पुरुष मेंबर्स पळायला लागल्यावर मी देखील मागुन सामील झाले.
सगळे एकसे एक पट्टीचे रनर्स होते. आणि त्यात मी शेवटी पळायला सुरुवात केलेली. पहिला किलोमीटर जीव खाऊन धावले. घड्याळानी वेळ दाखवली ५ मि. ५५ सेकंद :) स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना! मग पुन्हा एकदा उत्साह संचारला आणि ही रेस १ तास ५ मिनिटात पूर्ण केली. म्हणजे आधीच्या रेसपेक्षा तब्बल ११ मिनिटांची प्रगती :)



नियमित रनिंगला सुरुवात केली तेंव्हा ऐन शिशिरातली थंडी होती. तेंव्हा बागेत, नदीकाठी सगळीकडे फक्त निष्पर्ण झाडंच होती. मग रोज ती झाडं आकाशाच्या छटा जशा असतील त्याप्रमाणे वेगवेगळी दिसायची. ज्यावेळी आपल्याला आता सलग पाऊण तास रनिंग करता येतं हे उमगलं, त्याचवेळी अचानक एक दिवस त्याच झाडांमधल्या एका प्लमला अचानक गुलाबी बहर आलेला दिसला. रांगेतली सगळी झाडं निष्पर्ण आणि हे एखादंच फुललेलं झाड दिमाखात उभं असायचं. मग ते झाड आता सारखं बघता यावं म्हणुन रनिंगला दांड्या मारणंही कमी झालं. हळुहळू वसंत ऋतु आला. भोवतालची साकुराची झाडं पूर्ण बहरली. बाकी झाडं हिरव्या पानांनी सजली. दिवसाची सुरुवात अशी साकुराच्या झाडांखालुन आणि वेगवेगळ्या रंगांचे फुलांचे ताटवे बघत करताना फारच भारी वाटायचं. स्वतःच्या रनिंग मधल्या प्रगतीचं  हे प्रतिबिंब की ह्या निसर्गाच्या किमयेमुळे स्वतःमधे हा प्रगतीच्या दिशेनी बदल झालाय हा विचार सारखा डोक्यात यायचा.  उन्हाळ्यात सकाळी ६.३० चं ऊन पण सहन होईनासं झालं. मग तेव्हा फक्त संध्याकाळी रनिंग केलं. पुढे हवेत गारवा यायला लागला आणि हेमंतऋतुची रंगांची उधळण पानांवर झाली.  निसर्गातला हा बदल रोजच्या रोज टिपताना एक वेगळाच आनंद मिळायला लागला. ह्याआधी कदाचित मी निसर्गातले हे बदल इतक्या जवळुन, इतक्या नियमितपणे कधीच टिपले नसतील.
मग जानेवारीची दुसरी १०के रेस आली तोवर "शिशिरऋतुच्या पुनरागमने" झाडाचं एकेक पान परत गळायला लागलं होतं. वर्षाचं एक चक्र पूर्ण झालं. आणि आता ह्या रनिंगच्या चक्रात मी स्वतःहुन पूर्ण अडकुन गेल्ये.

माझ्या रनिंगच्या ह्या वर्षभराच्या सगळ्या प्रवासाची UAE मधुन मेघना ऑनलाइन साक्षीदार होती आणि ऑनलाइन भागीदार देखील. आम्ही गेले वर्षभर एकमेकीना motivate करत राहिलो. जमेल तसं वेगळ्या टाइम झोन मधे असुन सुद्धा वेळ ठरवुन एकाच वेळी रनिंगही केलं. ही ब्लॉगपोस्ट पण ती मागे लागली नसती तर कदचित लिहुन झाली नसती. थँक्स मेघना! :)

मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

गांबारोऽ निप्पोन!

११ मार्च २०११ - शुक्रवार. दिवस नेहमीसारखाच उजाडला. सकाळपासून हवा मस्त होती. आज अवनीला ट्रेन ऐवजी स्वत:च्या सायकलवरुन शाळेत जायचं होतं. त्यामुळे सकाळी दोघी आपापल्या सायकलवरून गेलो. आता दुपारी पण तिला आणायला जावं लागणार, ह्या कल्पनेने नाही म्हटलं तरी जरा कंटाळाच आला होता.

दुपारी २.४५ च्या सुमाराला घाईघाईने निघाले. तेवढ्यात अचानक आभाळ भरुन यायला लागलं. हवामान खात्याचा अंदाज चुकून अचानक पाऊस पडणार की काय ही चिंता आणि निघायला झालेला उशीर, ह्यामुळे जरा जोरातच सायकल मारायला लागले. सिग्नलला थांबले आणि अचानक वाटायला लागलं की मला चक्कर येतेय आणि मी सायकल वरून खाली पडणार. समोरचा सिग्नल, झाडं, इमारती सगळंच हलताना दिसायला लागलं. एवढंच काय, तर मागच्या बागेत इतका वेळ निवांत बसलेली मांजरंसुद्धा सैरावैरा पळत सुटली. क्षणभराने जाणवलं, ही चक्कर नाही, हा भूकंप होतोय. असेल नेहमी सारखाच साधा भूकंप, म्हणून आधी दुर्लक्ष केलं पण हलण्याचा जोर वाढतच चालला होता. इतका की मी घाबरून हातातली सायकल रस्त्यावर आडवी केली आणि एका ठिकाणी उभी राहिले. कधी नव्हे ती आजूबाजूच्या इमारतींमधून माणसं बाहेर पडली, रस्त्यावरून जाणारी वाहनं थांबली. भूकंपाचा इतका मोठा हादरा गेल्या ११ वर्षात पहिल्यांदाच अनुभवत होते. हादरे कमी कमी होत थांबले असं वाटल्यावर पुन्हा सायकल उचलून शाळेत निघाले.

अवनीच्या शाळेची इमारत तशी जुनी आहे त्यामुळे शाळेतली सगळी मुलं सुखरूप असतील ना, हा विचार सारखा मनात येत होता. शक्य तितकी जोरात सायकल चालवत शाळेत पोचले. पहिला धक्का बसल्यानंतर लगेच सगळ्या मुलांना आपापली Disaster hoods डोक्यावर घेऊन वर्गांमधून शाळेच्या मैदानावर आणून बसवलं होतं. सगळेच जण घाबरून गेले होते. अवनीजवळ गेले आणि लक्षात आलं की पुन्हा एकदा सगळं हादरतय. असं चार पाच वेळा झालं. समोर शाळेची इमारतही अगदी झुलताना दिसत होती. फोनचं नेटवर्क बंद झाल्यामुळे आम्ही दोघी सोडून बाकी सगळे कसे आहेत हे कळतच नव्हतं. थोड्यावेळानी आयफोनवरून अगदी थोड्या वेळासाठी इ-मेलला लॉग-इन होता आलं. पण निदान तेवढ्यात घरचे सगळे सुरक्षित आहेत हे तरी कळलं.

साधारण दीड तास तसेच शाळेत बसून राहिलो. मुलांना गडबडीने वर्गातून मैदानात आणल्यामुळे जॅकेट्स, टोप्या सगळं काही वर्गातच होतं. त्यामुळे त्यांना थंडी वाजायला लागली. आता हळूहळू अंधार पडायला लागल्यावर थंडी अजूनच वाढेल, दुपारनंतर अचानक भरुन आलेलं आभाळ कधीही कोसळायला लागेल ह्याची चिंता वाटायला लागली. भूकंपामुळे सगळ्या लोकल गाड्या थांबवल्याचं कळलं. शाळेने पालक बरोबर असतील तरच मुलांना घरी जायची परवानगी दिली. (दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजता शेवटचा विद्यार्थी घरी जाईपर्यंत शिक्षक शाळेतच होते.) आम्ही दोघींच्या सायकली शाळेतच ठेवल्या आणि मिळेल त्या वाहनाने घरी जायचा निर्णय घेतला. रस्त्यावर आलो तर एकही टॅक्सी रिकामी दिसेना. शेवटी घरापर्यंत चालतच गेलो. चालता चालता एकीकडे टॅक्सी मिळते का, कोणाला फोन लागतोय का ह्याची चाचपणी आणि विरुद्ध दिशेने शाळेत निघालेल्या पालकांना शाळेत सगळं ठीक असल्याचं सांगून धीर देणं हे सुरु होतं. चालतानाही मधूनच बसणारे भूकंपाचे हादरे जाणवतच होते.

घरी पोचेपर्यंत पाऊण तास लागला. आणि पोचल्यावर टीव्हीवर बघितला तो जपानच्या पूर्व किनार्‍याला, तोक्यो पासून ३७३ किलोमीटर अंतरावर, निसर्गाने दिलेला एक जबरदस्त हादरा! ९.० मॅग्निट्युडचा भूकंप आणि पाठोपाठ त्सुनामीचा तडाखा! एका जबरदस्त ताकदवान लाटेच्या फटकार्‍याने अगणित घरं, माणसं, जनावरं आणि वाहनं गिळंकृत केली होती, होत्याची नव्हती करुन टाकली होती. भूकंपानंतर दिलेल्या त्सुनामीच्या इशार्‍यानंतर घरातून पळून जरा उंचावर गेलेली माणसं आपली घरं, गाड्या डोळ्यासमोर वाहून जाताना बघूनसुद्धा काहीही करू शकत नव्हती. एक जहाज, काही गाड्या तर घराच्या छपरांवर गेल्या होत्या. कित्येक ठिकाणाचे रस्ते, रेल्वेचे ट्रॅक्स पाण्याखाली गेले, उद्‌ध्वस्त झाले. नकाशावरून ते गाव जवळजवळ पुसलं गेल्यासारखंच झालं होतं.

म्हणजे मी जेंव्हा, आपण अवनीला धीर देत देत इतकं अंतर चालून सुखरूप घरी आलो असा निःश्वास टाकत होते, तेंव्हा अनेक लोक ह्या त्सुनामीच्या तडाख्यापासून स्वत:चा आणि इतरांचा जीव वाचावा म्हणून आकांताने पळत सुटले होते. जेव्हा मला माझी लेक थंडी-पावसाने गारठेल, आपण लवकर घरी पोचलेलं बरं ही चिंता वाटत होती; तेंव्हा कित्येक लहान मुलांचा निवाराच कायमचा उद्‌ध्वस्त झाला होता. घरातली माणसं समोर दिसल्यावर मला जेंव्हा अत्यानंद झाला तेंव्हा अनेकांची घरं, माणसं त्यांना लाटांनी गिळंकृत करताना दिसत होती. आज लेकीने नेहमीसारखं ट्रेनने न जाता सायकलने जाण्याचा हट्ट केला, म्हणून भूकंपानंतरच्या दहाव्या मिनिटाला मी तिच्याकडे पोचू शकले म्हणून जेव्हा मी सुस्कारा टाकत होते, तेंव्हा आपले कुटुंबीय नक्की जिवंत आहेत की नाही ह्या प्रश्नाने कित्येक जण व्याकुळ झाले होते. जेंव्हा मला घरी येताना "अरे बापरे, अजून किती वेळ ट्रेन्स बंद ठेवणार? लोकांचे घरी जाताना हाल होणार!" असं वाटत होतं, तेंव्हा कित्येक ठिकाणी रेल्वेचे रुळच्या रुळच उद्‌ध्वस्त झाले होते.

मी घरी पोचले म्हणून मला वाटलेलं समाधान किती क्षुल्लक आणि क्षणिक होतं ह्याची जाणीव झाली.

तोक्योमध्ये लोक ऑफिसमधून घरी जायला बाहेर तर पडले होते. पण ट्रेन बंद, टॅक्सी आणि बसच्या प्रचंड रांगा, एरवीपेक्षा अनेक गाड्या रस्त्यावर आल्यामुळे रस्त्यावर झालेली गर्दी, ह्यामुळे अनेकांना चालत घरी जाण्यावाचून इलाज नव्हता. तोक्योमधला माणूस कामाच्या ठिकाणी सबवे आणि ट्रेनमधूनच प्रवास करतो. त्यामुळे आपल्या घराची दिशा नक्की कोणती हे बरेचदा त्यांनी रस्त्यावर येऊन बघितलेलंच नसतं. नेमकी हीच गरज लक्षात घेऊन विविध ठिकाणी काही स्वयंसेवक तोक्यो आणि उपनगराचे नकाशे घेऊन उभे राहिले होते आणि पादचार्‍यांना मार्गदर्शन करत होते. छोटीशीच कृती पण चार-पाच तासांच्या पायपिटीसाठी अनेकांना त्याची मदत झाली. आज पादचार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे त्यांना पदपथ पुरत नव्हते. मग ह्या सगळ्या गर्दीमुळे रस्त्यावर गोंधळ माजला का? तर, अजिबात नाही! दोन्ही दिशांच्या वाहनचालकांनी स्वेच्छेने आपापल्या बाजूची एकेक लेन पादचार्‍यांसाठी मोकळी करुन दिली. कुठेही आरडाओरडा नाही, धक्काबुक्की नाही की बेशिस्त वर्तन नाही!

शारीरिक आणि मानसिकरीत्या दमलेलो असूनही त्या रात्री आम्हाला झोप लागत नव्हती. एक कारण म्हणजे त्सुनामीची दुर्घटना डोळ्यासमोरून जात नव्हती आणि रात्रभर भूकंपाचे धक्के (आफ्टरशॉक्स) बसतच होते. शुक्रवारपासून पुढच्या ३ दिवसात १५० आफ्टरशॉक्स झाले आणि त्यानंतर पुढच्या दीड महिन्यात त्यांची संख्या हजारावर गेली होती.

दुसर्‍या दिवसापासून तोक्योमधील रेल्वेचं वेळापत्रक हळूहळू मार्गावर येताना दिसत होतं. आज शनिवार असल्याने शाळा आणि ऑफिसेसला सुट्टी. त्यामुळे त्या धक्क्यातून लोकांना सावरायला वेळ मिळतोय, सुट्टीचा दिवस असल्यामुळे ह्या आफ्टरशॉक्समध्येही आपापल्या कुटुंबाबरोबर राहता येतंय असा दिलासा मनाला वाटत होता. पण सकाळी ८.३० नंतर लक्षात आलं की आपला हा विचार फक्त आयटी किंवा तत्सम ठिकाणी काम करणार्‍या लोकांनाच लागू होतोय. कारण शेजारच्या इमारतीचं नूतनीकरण करणारे कामगार ट्रॉलीवर चढून त्यांचं काम करतायत, elevators चालू नसले तरी कुरिअरवाली माणसं प्रसंगी ३० मजले चढून एखादं पार्सल पोचवण्याचं काम करतायत. "ग्राहक देवो भव!" चा ह्यापेक्षा वेगळा नमुना कुठे बघायला मिळणार?

"तोक्यो स्काय ट्री" हा जगातला सर्वात उंच टि.व्ही टॉवर म्हणून ओळखला जाईल. १ मार्च २०११ ला टॉवरच्या बांधकामाने ६०० मीटर उंची गाठली होती. भूकंप झाला तेव्हा त्याची बांधणी अगदी निर्णायक टप्प्यावर आली होती. पण १२ मार्च २०११ ला पूर्वयोजनेप्रमाणे त्याच्या बांधकामाची ६२५ मीटर पर्यंत उंची गाठली गेली. आणि १८ मार्च २०११ ला ६३४ मीटरचा अंतिम टप्पा गाठून त्याचं काम पूर्ण झालं.

त्सुनामीग्रस्त भागातल्या लोकांची पर्यायी व्यवस्था तात्काळ मोठ्या शाळांमधून वगैरे केली गेली होती. पर्यायी व्यवस्था म्हणजे काय? तर त्या क्षणी त्यांच्या डोक्यावर केवळ छप्पर होतं. पहिले दोन दिवस रस्ते बंद झाल्यामुळे पुरेसं अन्नपाणी नाही, अचानक कोसळलेल्या मोठ्या प्रमाणावरच्या आपत्तीमुळे टॉयलेट्सची अपुरी व्यवस्था, हीटिंगची अपुरी सुविधा ह्या सगळ्याबद्दल कोणी साधी तक्रारही केली नाही. हे सगळं सोसणारे आपण एकटेच नाही, हा एक विचारही त्यांच्यासाठी पुरेसा होता. जे मिळेल ते सगळ्यांनी समसमान वाटून घ्यायचं. मग ते अंथरुण-पांघरुण असो की जेवण-खाण असो. एकदा तर एका evacuation center मधे जेवणाला फक्त एक केळं आणि एक स्ट्रॉबेरी इतकाच अन्नपुरवठा होऊ शकला. तर काही ठिकाणी फक्त एक ओ-निगिरी (राइसबॉल) किंवा ओ-बेन्तो (जपानी जेवणाचा डबा) किंवा कप-नूडल्स आणि पाण्याची बाटली. 'मिनामी-सानरिकु' नावाच्या ठिकाणी एका माणसाचं घर समुद्रापासून जवळ असल्यामुळे वाहून गेलं. पण त्याचं रामेनचं; म्हणजे जपानी नूडल्सचं उपाहारगृह मात्र सुरक्षित होतं. त्या माणसाने दुकानातला माल संपेपर्यंत तिथल्या शक्य तितक्या लोकांना विनामूल्य रामेन खायला दिल्या. स्वत:चं घर नष्ट झाल्यावरसुद्धा इतकं नि:स्वार्थी राहणं कसं जमू शकतं ह्या माणसांना?

नेहमीच्या आयुष्यात अतिशय शिस्तबद्ध वागणारे जपानी लोक नेहमीच पाहिले होते. पण ह्या आणीबाणीच्या प्रसंगीदेखील एकानेही आपल्यातलं माणूसपण सोडलं नाही. मग ती लहान मुलं असोत की वयोवृद्ध. तिथे सहनशीलतेला वयाची मर्यादा नव्हती. ज्यांचे आईबाबा घ्यायला येऊ शकले नाहीत अशी आठ ते बारा वयोगटातली ३० मुलं, ३ दिवस शाळेत बसून होती. "आईबाबा कधी येणार?" असं विचारून शिक्षकांना भंडावून न सोडता लायब्ररीमधली पुस्तकं वाचत, एकमेकांशी कार्डगेम्स खेळत आपापला जीव रमवत होती. कुठून आला असेल ह्या चिमुरड्यांमधे इतका पराकोटीचा समजूतदारपणा?

म्हणजे जपानी लोकांनी त्यांचं दु:ख व्यक्त केलंच नाही का? असं नक्कीच नाही. डोळ्यात पाणी निश्चितच होतं, पण त्या रडण्यात कुठेही अगतिकता नव्हती, आक्रोश नव्हता. झालेल्या हानीचं दु:ख अपरिमित होतं, पण त्यासाठी कोणालाही त्यांनी दोष दिला नाही.

उद्‌ध्वस्त भागांमध्ये स्वयंसेवक सतत झटत होते. स्वयंसेवक म्हणजे फक्त उत्साहाच्या भरात गेलेले कार्यकर्ते नव्हेत. तर सरकारी, तसंच विविध स्वयंसेवी संस्थांमधे नाव नोंदणी केलेल्या कार्यकर्त्यांच्या उभारलेल्या फळ्या. ठराविक संख्यांनी केलेले त्यांचे गट आणि त्यांना वाटून दिलेली कामं. प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेलं काम चोखपणे करायचं. मग ते चिखलातून, राडारोड्यातून एखादं घर साफ करून पूर्ववत करणं असो की evacuation center मधल्या अनेकशे माणसांसाठी स्वैंपाक करण्याचं असो. कधी नव्हे ते मार्च अर्धा संपल्यानंतरही त्या भागात बर्फ पाडून निसर्ग त्यांच्या कामात अडथळे आणत होताच. पण ह्या अडथळ्यांना भीक घालेल तो जपानी माणूस कुठला? काही ठिकाणी स्वयंसेवकांच्या मदतीला होती तीच माणसं ज्यांची घरंदारं, कुटुंब ह्या त्सुनामीच्या तडाख्यात उद्‌ध्वस्त झाली होती. साफसफाई करताना त्यातल्या एखाद्याच्या हाती कधी कुटुंबाचा चिखलात दडलेला एखादा फोटो सापडला किंवा अगदी मुलीची एखादी हेअरपिन सापडली तरी त्यांच्या लेखी तो आनंद अवर्णनीय होता.

एकीकडे चिखलात सापडलेल्या फोटोंचं नक्की काय करायचं, हे कळत नसताना काही फोटोग्राफर्स मदतीला आले. त्यांनी ते फोटो स्वच्छ करून धुवून फ्रेम करून दिले. कोणी त्या स्वच्छ फोटोंचे डिजिटल कॅमेर्‍यानी फोटो काढून ते कायमस्वरूपी डिजिटल स्वरुपात राहतील ह्याची व्यवस्था केली.

कधी कधी स्वयंसेवकांना तो परिसर बघून नैराश्य येत होतं. पण कधी त्यांना अवचित दैवी चमत्कारानं ढिगार्‍याखाली एखादं चार महिन्यांचं तान्हं बाळ जिवंत सापडलं, तर कधी नऊ दिवसांनंतर एक ८० वर्षाची आजी आणि तिचा १६ वर्षाचा नातू घरातल्या कपाटाखाली सुखरूप सापडला. तेंव्हा मात्र ते नैराश्य, ती वेदना अगदी सहज पुसली जात होती. कारण त्यांच्या तनामनात घुमत होता एकच घोष - "गांबारोऽ निप्पोन !" (सगळे जपानवासी एकजुटीने प्रयत्न करूयात - धीर न सोडता लढूयात!)

मामोरू ओकिनावा नावाचा तीस वर्षीय युवक. त्सुनामीमुळे बेपत्ता झालेल्या आपल्या बायकोला आणि सव्वा वर्षाच्या मुलीला कित्येक दिवस शोधत होता - हातात केवळ त्याचा फॅमिली फोटो आणि एक फावडं घेऊन, सतत फोटोमधल्या बायकोला, मुलीला म्हणत होता, "मला माफ करा. मी तुम्हाला शोधण्यात अपयशी ठरलोय. माझ्या नावाला मीच काळिमा फासलाय" - कारण "मामोरू" चा अर्थ आहे "रक्षण करणे".

जपानी लोकांच्या कार्यक्षमतेला दाद द्यावीशी वाटली जेंव्हा पुढच्या पाच ते सहा दिवसात खचलेले रस्ते दुरुस्त झाले. लोकांकडे रसद पोचू लागली.

ही दुर्घटना झाल्यानंतर अवघ्या पन्नास दिवसातच; म्हणजे २९ एप्रिलला तोक्योमधून आकिताला जाणारी शिनकानसेन, म्हणजेच बुलेट ट्रेन, पुन्हा चालू करण्यात आली. एरवी जपानच्या जवळजवळ सर्व भागातून दर काही मिनिटांनी ये-जा करणार्‍या ह्या शिनकानसेनचं खरं तर कोणालाच अप्रूप नाही म्हटलं तरी चालेल. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र २९ एप्रिलला आकिताला जाणारी पहिली गाडी जेंव्हा तोक्योमधून निघाली, तेंव्हा तोक्यो स्टेशनवर जमून लोकांनी तिला आनंदाने निरोप दिला. मधल्या सेनदाई स्टेशनवर आणि शेवटच्या आकिता स्टेशनवरही लोकांनी उत्साहाने गर्दी केली होती. जणू एखाद्या समारंभाला उपस्थित रहावं अशा कपड्यात स्त्री-पुरुष तिथे आले होते. अक्षरश: वाद्यांच्या आणि टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत झालं. तसंच जिथून-जिथून ती गाडी जाताना दिसते, तिथे रस्त्यांवर उभे राहून लोक आनंदाने हात हलवत गाडीचं स्वागत करत होते, शुभेच्छा देत होते. कोणाच्या हातात झेंडे होते तर कोणाच्या हातात कापडी 'कोई' मासे ('कोई' हा मासा प्रवाहाविरुद्ध पोहणारा. म्हणून जपानमधे त्याला सांस्कृतिक महत्त्व आहे), तर बर्‍याच जणांच्या हातात मोठे कापडी फलक होते ज्यावर लिहिलं होतं " गांबारोऽ निप्पोन!". हा आनंद पुन्हा एकदा अंशत: का होईना पण एक सुरळीत सुरुवात होतेय, ह्याचा होता. डोळ्यात त्या सर्वांसाठी कृतज्ञता होती, ज्यांनी शिनकानसेन ट्रॅक्सच्या अंदाजे ५०० किलोमीटरच्या विस्तारातले १२०० ठिकाणचे fault points शोधून, रात्रंदिवस राबून ते दुरुस्त केले होते.

"हायाबुसा" ही, तोक्यो-आओमोरी दरम्यान धावणारी, जपानमधली सर्वात वेगवान शिनकानसेन. भूकंपाच्या अवघ्या काही दिवस आधी म्हणजे ५ मार्चला तिचं मोठ्या जल्लोषात उद्घाटन झालं होतं. भूकंपामुळे ती ट्रेन बंद करावी लागली. आता अवघ्या सहा महिन्यात पुन्हा एकदा ही हायाबुसा धावायला लागली आहे.

त्सुनामीमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या सेन्दाई भागामधे देखील २९ एप्रिलला फुटबॉलचं स्टेडियम चालू झालं. त्या पहिल्या मॅचला २०००० लोकांनी हजेरी लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. मॅच सुरू करण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणताना कोणालाच अश्रू आवरता आले नाहीत.

जपानी शाळांमधे जुनं शैक्षणिक वर्ष मार्चमध्ये संपून एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होतं. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अगदी बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंत सगळ्यांचंच graduation असतं. विस्कटलेली घडी बसवायचीच, ह्या हेतूने आता काही आठवडे उशीरा का होईना, पण त्सुनामीग्रस्त भागातल्या शाळां-महाविद्यालयांचं graduation व्हायला सुरुवात झाली. एका गावातल्या बालवाडीचं graduation होतं, ज्याला एक जपानी आई उपस्थित होती. तिच्या दोन्ही मुली, वय सहा आणि दोन, ह्या त्सुनामीच्या तडाख्यात कुठे गेल्या होत्या ते त्सुनामीच्या लाटांनाच ठाऊक! आज तिचीही मुलगी खरं तर ह्या समारंभात graduation चा गाऊन, टोपी घालून दिमाखात उभी असायची. तरीही ती आई आज समारंभाला उपस्थित राहिली. का? तर तिचं म्हणणं की "माझी मुलगी आज असती तर मी इथे तिचं कौतुक करायला, टाळ्या वाजवायला आलेच असते ना? मग आज ती नाही म्हणून बाकीच्या चिमुरड्यांचा हा समारंभ कमी महत्त्वाचा ठरतो का?" कसं आणि कुठून आलं असेल एका सर्वसामान्य गृहिणीमध्ये हे मानसिक बळ?

दुर्घटनेनंतर अवघ्या चार महिन्यात आता तात्पुरती घरं उभारली आहेत. तात्पुरती असली तरी त्यांचा दर्जा मात्र मुळीच कमी नाहीये. काही ठिकाणी घरं बांधल्यावर आराखड्यात काही चुका आहेत असं आढळलं. चुका म्हणजे बांधकामाच्या दर्जाविषयक नाहीत, तर घरांच्या रचनेसंदर्भात. आधीच्या रचनेनुसार आजूबाजूच्या घरांशी फारसा संपर्क येत नव्हता. आधीच इथे राहणारे सगळे लोक त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर फेकले गेल्यामुळे मानसिकरित्या खचून गेले होते. त्यात काही वृद्ध एकेकटेच रहात होते. त्यांचं दुखलं-खुपलं एकमेकांना बघता यावं, त्यांना सोबत मिळावी म्हणून पुढच्या बांधणार्‍या घरांची रचना त्यांची दारं एकमेकांसमोर येतील अशी केली. घरं बांधण्याच्या जोडीने ठिकठिकाणी 'साकुरा' म्हणजे चेरीची रोपं आणि सूर्यफुलाच्या बिया लावल्या. म्हणजे पुनर्वसन करताना तिथली फुलं बघितली की लोकांच्या चेहर्‍यावर आनंद उमटेल. नागरिकांचा केलेला इतका लहानसहान विचार ह्या सरकारविषयी खूप काही सांगून जातो.

त्सुनामीच्या तडाख्यामुळे फुकुशिमाचं अणूऊर्जाकेंद्र बंद करावं लागलं. ह्या संकटामुळे आता कधी नव्हे ती वीजबचत करावी लागणार होती. खरं म्हणजे तोक्यो अजून वीजबचत क्षेत्रात आलंच नव्हतं. पण तरीही तोक्योकरांनी आपणहून उत्स्फूर्तपणे वीजबचत करण्याचा निर्णय घेतला. वीजबचत म्हणजे नक्कीच रोज चार ते सहा तास घरातली वीज जाणार, ह्यापेक्षा वेगळं काही माझ्या भारतीय मनाला सुचलंदेखील नाही. पण हळूहळू लक्षात येत गेलं की वीजबचत म्हणजे काही फक्त वीज पुरवठा बंद ठेवून कामं ठप्प करणं नाही; तर कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींमधून वीजबचत करून आपली रोजची कामं सुरळीत ठेवता येतात.

छोट्या दुकानापासून ते अगदी मोठ्या मॉल्सपर्यंत सगळीकडे रोज जितके दिवे लावलेले असत, त्यापेक्षा जवळपास निम्म्याने दिवे कमी केले. रेल्वे स्टेशन्सवरही तेच. विविध ठिकाणी असलेले escalators बंद ठेवले गेले. ज्यांना अगदीच जिने चढता येणं शक्य नाही त्यांनी elevators चा वापर करावा. रोज दर तीन ते चार मिनिटांनी धावणार्‍या लोकल गाड्या आता पाच ते सहा मिनिटांच्या अंतराने धावू लागल्या. सर्व ऑफिसेसमध्ये संध्याकाळी सहा नंतर एसी बंद करायला सुरुवात झाली.

ऑगस्ट महिना म्हणजे तोक्योमध्ये उन्हाळ्याची अगदी परिसीमा असते. त्या दिवसात विजेचा वापर सर्वाधिक होतो. त्यामुळे बर्‍याच कंपन्यांनी असा निर्णय घेतलाय की ऑगस्टमध्ये २ आठवडे सर्व कर्मचार्‍यांना सुट्टी द्यायची. ते दिवस सप्टेंबर मधले शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी भरुन द्यायचे. जेणेकरुन त्याकाळात वीजव्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊ नये. सगळ्यांच्या मनात एकच ध्यास होता "गांबारोऽ निप्पोन!" आणि अक्षरश: 'थेंबेथेंबे तळे साचे' ह्या उक्तीप्रमाणे बाकी ठिकाणी तेवढा वीज तुटवडा भासेनासा झाला.

तोशिबा, मित्सुबिशीसारख्या कंपन्यांनी ह्या काळात स्वत:च्या उत्पादनाची जाहिरात करतानाच जनजागृतीचं कामही केलं. एसीची जाहिरात करताना तापमान २४ ते २६ डिग्री ठेवलं तर कमी वीज खर्च होते हे ठसवण्याचा प्रयत्न केला; तर रेफ्रिजरेटरची जाहिरात करताना तो शक्य तितक्या कमी वेळा उघड-बंद करुन वीज वाचवा हे सांगितलं. त्याचबरोबर "पॅनासॉनिक" सारख्या कंपनीने लोकांच्या चेहर्‍यावर हसू फुलावं, आशावाद निर्माण व्हावा म्हणून भूकंपानंतर घडलेल्या सकारात्मक घटना (शिनकानसेनची, बोटींची सेवा परत सुरु झाली, मुलं पुन्हा शाळेत जाऊन हसू-खेळू लागली) एकत्र करुन त्याची सुंदर चित्रफीत तयार केली. जगाला हाच संदेश द्यायला; की "आम्ही पुन्हा आनंदाच्या दिशेने एकेक पाऊल पुढे टाकतोय"!

राखेतून उठलेल्या फिनिक्स पक्ष्याचा संदर्भ आजवर अनेकदा फक्त वाचला. खुद्द जपानच्या संदर्भातही महायुद्धातून फिनिक्स पक्षाप्रमाणे घेतलेल्या भरारीचे उल्लेख आहेत. हा पक्षी फक्त दंतकथांमधेच असतो असं म्हणतात. पण जपानला आज ह्या संकटातून बाहेर पडताना बघितलं आणि मी याची देही याची डोळा तो फिनिक्स पक्षी बघितला.

कुसुमाग्रज म्हणतात तसं,

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून फक्त ’लढ’ म्हणा”

हा दृष्टिकोनच ह्या पक्षाला राखेतून पुन्हा उभारी घेण्याची हिंमत देत असेल का?

सोमवार, २५ जुलै, २०११

लीझ माइटनर



पुस्तकाचं नाव : लीझ माइटनर
लेखिका : वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन, पुणे
पृ. सं. : ११६
किंमत : रुपये १००/-



मागच्या वर्षीच्या भारतभेटीत जेंव्हा पुस्तकं घ्यायला गेले तेंव्हा वीणा गवाणकरांचं "लीझ माइटनर" हे पुस्तक दिसलं. सांगायला लाज वाटते, पण तेंव्हा लीझ माइटनर ह्या व्यक्तीविषयी मला काहीही माहिती नव्हती. केवळ वीणा गवाणकरांचं पुस्तक म्हणजे ते चांगलं आणि हटके विषयावर असणार ह्या खात्रीनी मी ते घेतलं.

-------
लीझ माइटनर - थोडक्यात सांगायचं तर विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ भौतिक शास्त्रज्ञ. हिनं किरणोत्सर्ग आणि अणुगर्भ विज्ञानात पायाभूत संशोधन केलं. १९२४ ते १९४८ ह्या काळात एकदा, दोनदा नाही तर तब्बल पंधरा वेळा नामांकन होवुनही जिला नोबेल पुरस्कार मिळाला नाही, अशी ही शास्त्रज्ञ.
-------
७ नोव्हेंबर १८७८ रोजी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथे एका ज्यू कुटुंबात लीझ माइटनरचा जन्म झाला. लीझचं शालेय शिक्षण चालू असतानाच्या काळात ऑस्ट्रियामधे स्त्रियांनी विद्यापीठात शिक्षण घेण्यावर कायद्याने बंदी होती. ऑस्ट्रियन मुलींना वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंतच तिथल्या पब्लिक स्कूल मधे शिकता येई. त्याप्रमाणे लीझचं शिक्षणही चौदाव्या वर्षी थांबलं.
१८९७ साली ऑस्ट्रियामधे स्त्रियांना उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. लीझनं १८९९ मधे विद्यापीठ प्रवेशाला पात्र ठरवणार्‍या "मॅच्युरा" परिक्षेची तयारी सुरु केली. १९०१ मधे म्हणजेच वयाच्या तेवीसाव्या वर्षी ती मॅच्युरा परिक्षा उत्तीर्ण झाली. व्हिएना विद्यापीठात प्रवेश घेऊन तिनं एकाच वेळी भौतिक शास्त्र, कलन शास्त्र, रसायन शास्त्र, वनस्पती शास्त्र यांचा अभ्यास सुरु केला. वाया गेलेली सगळी वर्षं भरुन काढण्याच्या जिद्दीनी तिला झपाटुन टाकलं होतं. विद्यापीठातील प्रोफेसर एक्सनर आणि प्रोफेसर बोल्ट्झमन ह्या दोन भौतिकशास्त्रज्ञांमुळे "भौतिकशास्त्र म्हणजे बुद्धी, शक्ती, निष्ठा पणाला लावुन करायचा अभ्यास आहे, ते एक व्रत आहे" हे लीझला उमगलं.
फेब्रुवारी १९०६ मधे लीझला डॉक्टरेट मिळाली. तिच्या प्रबंधाचा विषय होता "Conduction of Heat in Inhomogeneous Solids". व्हिएन्ना विद्यापीठातून भौतिकशास्त्राची डॉक्टरेट मिळवणारी लीझ ही दुसरी स्त्री. (१९०३ साली ओल्गा स्टेंईडलरने अशी डॉक्टरेट मिळवली. पण पुढे ती त्या क्षेत्रात राहिली नाही.)
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु व्हायला अजुन अवकाश होता. म्हणुन त्या फावल्या वेळात तिनं ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ लोर्ड रॅली यांच्या प्रकाश परावर्तना संबधीच्या प्रयोगाचं स्पष्टिकरण देणारं संशोधनात्मक लिखाण केलं. याखेरीज प्रोफेसर बोल्ट्झमन यांचा कनिष्ठ सहकारी स्टिफन मेयर ह्याच्या मार्गदर्शनाखाली किरणोत्सर्गासंबधी अध्ययन आणि संशोधनात्मक काम केलं. १९०६ आणि १९०७ साली अल्फा बीटा किरणांचं प्रारण (radiation), विकिरण (scattering) ह्यात संशोधन केलं. पण तरीही भौतिकशास्त्र क्षेत्रात आपलं भवितव्य काय, ह्याचा अंदाज तिला येईना. कारण अमेरिकेत जशी शास्त्रज्ञ महिलांना वाव देणारी महाविद्यालयं होती, तशी परिस्थिती ऑस्ट्रियात नव्हती. आता व्हिएन्नामधे राहुन काही साध्य होईल असं दिसेना म्हणुन लीझनी बर्लिनला जायचं ठरवलं. १९०७ साली बर्लीन मधल्या विद्यापीठात लीझनं पाऊल टाकलं खरं, पण जर्मनीतील समाज धारणा अजुनही स्त्रियांनी चूल, मूल आणि चर्च ह्या त्रिकोणातच जगावं अशीच होती. बर्लिनला आल्यावर लीझ मॅक्स प्लँक कडुन पुंजसिद्धांता (Quantum theory) विषयी अधिक माहिती मिळवु लागली.
त्यावेळी जेष्ठ ऑरगॅनिक केमिस्ट एमिल फिशर यांच्या बर्लिन मधील संस्थेत डॉ. ऑटो हान हा नावाजलेला रेडिओ केमिस्ट काम करत होता. रसायनशास्त्राची पदवी घेतल्यानंतर ऑटो हाननं "रेडिओथोरियम" हे किरणोत्सर्गी द्रव्य शोधलं होतं. त्यानंतर त्यानं "रेडिओकेमिस्ट" म्हणुनच संशोधन पार पाडायचं ठरवलं. लीझला ऑटो हानबरोबर संशोधन करण्याची संधी मिळाली. यामुळे एक रेडिओ-फिजिसिस्ट आणि एक रेडिओ-केमिस्ट एकत्र येऊन किरणोत्सर्गावर संशोधन करणार होते. परंतू एमिल फिशरनं आपल्या संस्थेत स्त्रीला प्रवेश देणं नाकारलं. शेवटी बरीच रदबदली होवुन लीझनं अन्यत्र कुठेही पाऊल न टाकता संस्थेच्या तळघरातल्या एका खोलीत काम करायचं, अशी तोड निघाली. तिनी अगदी वरच्याच मजल्यावरच्या ऑटो हानच्या प्रयोगशाळेतही पाऊल टाकायचं नाही, इतर तरुणांशी संपर्क येऊ द्यायचा नाही अशी अट होती. तळघरातल्या ह्या खोलीला प्रसाधनगृहाची सोय देखील नव्हती. तिला रस्त्यापलिकडच्या हॉटेलच्या प्रसाधनगृहाचा वापर करावा लागे.
कालांतरानी फिशरनी लीझचं कर्तृत्व मान्य केलं. त्याचा विरोध मावळला आणि त्यानं लीझवरची बंदीही उठवली. पण संस्थेतल्या इतरांच्या लेखी मात्र लीझला अस्तित्वच नव्हतं. ते लीझकडे संपूर्ण दुर्लक्ष करत (साधं अभिवादनही करत नसत). पण त्याही परिस्थितीत लीझनं आपलं काम चालूच ठेवलं. मानसिकरित्या त्रास होणार्‍या घटनांबरोबरच लीझला अनेक आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावं लागत होतं. एक स्त्री असल्यामुळे स्विकारलं न जाण्याची खंतही होतीच.
१९०८ ते १९१० या काळात लीझनं ऑटो हान आणि ऑटो फॉन बेयर समवेत किरणोत्सर्ग विषयक संशोधन केलं. महत्वाचे असे नऊ शास्त्रीय लेख प्रकाशित केले. ह्याच काळात तिनं किरणोत्सर्ग तपासणीसाठी "रेडिओ अ‍ॅक्टिव रिकॉइल" पद्धत शोधली. वैज्ञानिक जगतात ही पध्द्त मान्य होऊन तिचा बराच बोलबाला झाला. तिचे लेख चर्चेले, वाचले जाऊ लागले. ती एकाच वेळी बीटा प्रारणांवर, वायुरुप किर्णोत्सर्गी आयनकणांवर आणि थेरिअम वर संशोधन करत होती. पाच वर्ष ऑटो हान समवेत काम केल्यानंतर तिनं हानच्या तुलनेत एक शास्त्रज्ञ म्हणुन स्वतंत्र दर्जा, लौकीक मिळवला होता.
१९११-१२ ह्या काळात लीझ माइटनर आणि ऑटो हानचा गृप नव्यानं स्थापन झालेल्या "कायझर विल्हम्स इन्स्टिट्युट" इथे गेला. परंतू तिथेही पुन्हा स्त्री असल्यामुळे लीझला कुठलंही पद मिळालेलं नव्हतं. एक "बिनपगारी अतिथी" म्हणुनच तिला तिथे काम करावं लागलं. पुढे वर्षभरानी तिला हानच्या समदर्जाचं पद मिळालं. पण वेतन मात्र त्याच्या तुलनेत अतिशय अल्प, म्हणजे त्याच्या पगाराच्या फक्त एक पंचमांश!
पहिल्या महायुद्धाच्या काळात, म्हणजे १९१४ साली अनेक शास्त्रज्ञांप्रमाणे ऑटो हान देखील युद्ध आघाडीवर गेला. तर लीझनं क्ष-किरण परिक्षणासाठी नाव नोंदवलं. त्यानंतर ती क्ष-किरण तंत्रज्ञ परिचारिका म्हणुन ऑस्ट्रियन सैन्यात रुजु झाली. ऑक्टोबर १९१६ मधे लीझ बर्लिनला परतली. मात्र आता कायझर विल्हम्स इन्स्टिट्युट पूर्णपणे युद्धोपयोगी संशोधनात गुंतलेली असल्याचं तिच्या लक्षात आलं. कारण लष्करी संस्थेने इमारतीतले काही महत्वाचे विभाग ताब्यात घेतले होते आणि आपल्या कामासाठी त्यांना हान-माइटनर दोघांचं सहकार्य हवं होतं. लीझला युद्धोपयोगी संशोधनात गुंतायचं नव्हतं. संस्थेनी प्रस्ताव दिलेलं सवेतन उच्चपद तिनं नाकारलं. मग जानेवारी १९१७ मधे एमिल फिशरनं हान-माइटनर प्रयोगशाळेचे दोन भाग केले आणि लीझला तिचा स्वतंत्र भौतिकशास्त्र विभाग सुरु करुन दिला.

जानेवारी १९१८ मधे तिच्या आणि हानच्या पाच वर्षांच्या कष्टांचं फलित म्हणुन "अ‍ॅक्टिनियम" ह्या मूलद्रव्याचं जनक मूलद्रव्य सापडलं. त्याला नाव दिलं प्रोटॅक्टिनियम (Protactinium) Pa. बर्लिन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स आणि ओस्टिअन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सनं खास पुरस्कार देऊन लीझचा गौरव केला. जर्मन केमिस्ट संघानी ऑटो हानला प्रोटॅक्टिनियमच्या संशोधनासाठी "एमिल फिशर मेडल" बहाल केलं आणि त्या पदकाची फक्त प्रतिकृती लीझला दिली. प्रोटॅक्टिनियमच्या शोधासंबधी जे लेख प्रकाशित झाले, त्या सर्व लेखांवर लेखक म्हणुन ऑटो हानचं पहिलं नाव असे तर लीझचं दुसरं.
१९२० पासून लीझ आणि ऑटो हान ह्यांचे संशोधनाचे मार्ग वेगळे झाले.
बीटा आणि गॅमा वर्णपटातील संशोधनानं तिला प्रयोगवादी भौतिकशास्त्रज्ञांच्या प्रथम श्रेणीत नेऊन बसवलं. तिच्या संस्थेला आंतरराष्ट्रीय लौकीक मिळवुन देण्यास तिचं संशोधन कारणीभूत ठरलं.
१९२२ साली बर्लिन विद्यापीठानं तिला अध्यापक पद दिलं. हा दर्जा मिळवणारी ती जर्मनीतली दुसरी स्त्री. १९२६ मधे पदोन्नती होऊन ती जर्मनीतली भौतिकशास्त्राची पहिली स्री प्रोफेसर झाली. एकदा विद्यापीठाच्या समारंभाच्या वेळी तिचं व्याख्यान होतं. विषय होता "The significance of Radioactivity for Cosmic Process". विद्यापीठाच्या प्रकाशन विभागनं त्याचं नामकरण केलं "The significance of Radioactivity for Cosmetic Process". ही महिला शास्त्रज्ञ, ती Cosmetic Process बद्दलच बोलणार हा ठाम विश्वास!
१९३३ सालापर्यंत लीझनं बीटा-गॅमा वर्णपट, अल्फाकण, तसंच कॉस्मोलॉजी, न्युट्रॉन्स, पॉझिट्रॉन्स वगैरे अणुगर्भ विज्ञानाच्या विविधांगावर संशोधन केलं.
मात्र १९३३ मधे जर्मनीत हिटलर सत्तेवर आल्यावर अनेक ज्यू शास्त्रज्ञांना त्यागपत्र द्यावं लागलं किंवा जर्मनी सोडुन जावं लागलं. लीझनं खरंतर १९०८ मधेच ज्यू धर्म त्यागुन प्रोटेस्टंट धर्मपंथ स्विकारला होता. जर्मनीला पितृभूमी म्हणुन स्विकारलं होतं. तरी ६ सप्टेंबर १९३३ ला नात्झी सरकारनं लीझ माइटनरचा विद्यापीठीय अध्यापनाचा अधिकार काढुन घेतला. कोणत्याही सभांमधुन, चर्चासत्रांमधुन भाग घेण्यावर बंदी घालण्यात आली. अपुर्‍या अन्न-वस्त्र-निवार्‍या विषयी लीझची कधीच तक्रार नव्हती. संशोधन कार्य चालू ठेवता न येणं हीच तिच्या लेखी सगळ्यात कठोर शिक्षा होती. १९३६ पर्यंत तिचं नावही सगळीकडुन पुसलं गेलं. आपल्याला आता जर्मनीमधे राहता येणं अवघड आहे हे लक्षात आल्यावर अखेर अनेक अडचणींवर मात करत, पलायन करुन ती हॉलंडला आणि नंतर स्वीडनला गेली. १९०७ मधे लीझ माइटनर जर्मनीत आली होती ती एक गरीब विद्यार्थिनी म्हणून. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची भौतिकशास्त्रज्ञ, अणुगर्भ वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळाल्यावर ३१ वर्षांनी ती जर्मनी सोडत होती. सप्टेंबर १९३८ मधे ती स्टॉकहोममधे सीगबानच्या संस्थेत रुजु झाली.

अणुविखंडनाचे (Nuclear Fission) प्रयोग :

इकडे बर्लिनमधे ऑटो हान आणि फ्रिटझ स्ट्रासमन हे दोघे अणुविखंडनाच्या प्रयोगात जुंपले होते. राजकीय परिस्थितीमुळे लीझला त्यात प्रत्यक्ष सहभाग घेता येत नव्हता. तरीदेखील पत्रव्यवहारातुन ती सतत ह्या प्रयोगात गुंतली होती. अणुकेंद्राचं विखंडन होऊ शकतं, हे सर्वप्रथम लीझनं ओळखलं. ते कसं आणि का होतं त्याचं स्पष्टीकरणही सर्वप्रथम तिनीच दिलं. परंतू ह्याचं श्रेय मात्र ऑटो हान जाहीरपणे तिला देऊ शकला नाही. तिचा सहभाग अप्रत्यक्ष असल्यामुळे सर्व श्रेयापासून तिला वंचित रहावं लागलं.
अणुविखंडनामुळे भौतिकशास्त्र क्षेत्रात खळबळ उडाली होती. अमेरिकेतही अनेक शास्त्रज्ञांनी विखंडन पडताळुन घेतलं.
अणुगर्भ विज्ञानासंबधी नवीन प्रयोग करुन पहावेत तर तर लीझच्या हाताशी उपकरणं नव्हती. त्यामुळे तिच्या हाता-तोंडाशी आलेलं यश निसटुन जाई.
१९४३ साली लीझला "लॉस अ‍ॅलांओस"च्या अणुबॉम्ब निर्मिती प्रकल्पात सहभागी होण्याचं निमंत्रण मिळालं होतं. ते जर तिनं स्विकारलं असतं, तर ती पुन्हा एकदा मान्यवरांच्या प्रभावळीत झळकली असती. पण आपल्या ज्ञानाचा उपयोग अणुबॉम्ब निर्मितीसाठी करणं तिनं साफ नाकारलं. मृत्यू घडवुन आणणार्‍या कोणत्याही प्रकल्पात तिनं स्वत:च्या भौतिकशास्त्राच्या ज्ञानाला उपयोगात आणू दिलं नाही. ज्याच्यावर आपलं नियंत्रण उरणार नाही, अशी कुठलीही गोष्ट तिला निर्माण करायची नव्हती.

१९४३ साली अमेरिकेनी ALSOS नावाचं खास शोधपथक तयार केलं. जर्मनांची अण्वस्त्रनिर्मितीबाबत काय प्रगती आहे, तसे काही असल्यास ते प्रकल्प उध्वस्त करायचे ही मुख्य कामगिरी ह्या पथकावर होती. जर्मनीमधले शास्त्रज्ञ अण्वस्त्र तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत हे कळल्यावर लिओ झीलार्ड ह्या दोस्तराष्ट्रात आश्रय घेतलेल्या शास्त्रज्ञानी अमेरिकेनी आपलं अण्वस्त्र संशोधन गुप्त ठेवावं, असा आग्रह धरला. अमेरिकन गुप्तचर विभागातला एक एजंट जून १९४५ मधे स्टॉकहोम मधे लीझला भेटायला आला. जर्मनीतल्या विखंडन प्रकल्पाविषयी तिला कितपत माहिती आहे हे जाणण्यासाठी, तसंच ती सोविएत युनियन मधे जाणार आहे का, हे आजमवण्यासाठी तो आला होता. तो एजंट पुढे बर्लिनला जाऊन ऑटो हानला भेटणार होता. लीझनी त्याच्याकडे हान साठी एक पत्र दिलं. ह्यामधे ज्यू लोकांवरचे अत्याचार, शास्त्रज्ञांनी नात्झींसाठी केलेल्या कामाचा राग आदी गोष्टी व्यक्त झाल्या होत्या. ते पत्र हानला मिळालंच नाही. पुढे ते अमेरिकन गुप्तचर खात्याच्या दप्तरी गेलं.
६ ऑगस्ट १९४५ ला हिरोशिमावर पहिला युरेनियम अणुबॉम्ब पडला. बातमी ऐकताच लीझ सुन्न झाली. दुसर्‍याच दिवशीच्या एका लेखात लीझ माइटनरनं स्वत:ची कशी हिटलर पासून सुटका करुन घेतली आणि बॉम्बचं रहस्य दोस्त राष्ट्रांना पुरवलं, अशा स्वरुपाच्या कहाण्या होत्या. लीझ पुरती गोंधळुन गेली. तिला बॉम्ब बनवण्याविषयी, अमेरिका त्यात कशी यशस्वी झाली ह्याविषयी काहीही कल्पना नव्हती. युरेनियमच्या अणुविखंडनाची प्रक्रिया तिनं ओळखली होती, पण आता अणुविज्ञान कोणत्या टप्प्यावर पोचलंय ह्याचं तिला आकलन होत नव्हतं. खर्‍या-खोट्याचं मिश्रण होऊन दंतकथांना ऊत आला होता. लीझला "बॉम्बची ज्यू जननी" म्हणुन तिचा उल्लेख होऊ लागला. ९ ऑगस्टला दुसरा अणुबाँब नागासाकीवर पडला. त्याच रात्री एलिनॉर रुझवेल्टनं न्यूयॉर्कहून रेडिओद्वारा लीझची मुलाखत घेतली. त्यात लीझनं वारंवार स्पष्ट केलं की अण्विकशक्तीचा वापर विचारपूर्वक आणि शांततामय कार्यासाठी झाला पाहिजे.
शांततेच्या काळात, वर्णद्वेषविरहित परिस्थितीत अणुविखंडनाचा शोध लागला असता तर तो लीझ माइटनरच्या कारकीर्दीचा मुकुटमणी ठरला असता. पण तो लागला दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरच्या टप्प्यात. आणि मग शास्त्रज्ञांनी त्याच्यावर हक्क सांगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

१९४४ साली ऑटो हानला रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्याला रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिल्याबद्दल लीझच्या मित्रपरिवाराची/पाठीराख्यांची कोणतीच तक्रार नव्हती. पण भौतिकशास्त्रक्षेत्रातला नोबेल पुरस्कार त्यावर्षी लीझ माइटनरलाच मिळायला हवा होता, असं त्यांचं आग्रहपूर्वक म्हणणं होतं. कारण युरेनियम विखंडनाच्या बाबतीत "ते कसं आणि का होतं" ह्याचं स्पष्टिकरण सर्वात आधी लीझनं दिलं होतं, भौतिकशास्त्राच्या आधारे. हानला नोबेल पुरस्कार मिळाल्यावर त्याच्यावरील लेखांमधुन लीझ माइटनरचा उल्लेख "त्याची साहाय्यक" म्हणुन होऊ लागला. हाननं जरी स्वत: कधी तिचा उल्लेख "मदतनीस" म्हणुन केला नसला तरी तशी झालेली विधानं, करुन दिली गेलेली समजूत दूर करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.

लीझ माइटनरला ऑस्ट्रिया, जर्मनी, अमेरिका आदी राष्ट्रांकडुन बाकी अनेक पुरस्कार, मानसन्मान मिळाले. पण जर्मनीनं अणुविखंडनशोधाबाबत तिला कायम काठावरचंच स्थान दिलं. ही खंत तिला शेवटपर्यंत होती.

तिच्या ९० व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी २७ ऑक्टोबर १९६८ रोजी लीझ माइटनरचा मृत्यू झाला.

१९९२ साली पीटर आर्मब्रुस्टरनी शोधुन काढलेल्या १०९ क्रमांकाच्या मूलद्रव्याला तिचं नाव दिलं गेलं meitnerium (Mt).

------------------------------------
माझं आणि शास्त्राचं, खास करुन भौतिकशास्त्राचं, कधीच सख्य नव्हतं. त्यामुळे पुस्तकातले अनेकसे संदर्भ, लीझ माइटरनी मांडलेली गणितं, तिनी बांधलेले आडाखे हे थोडंसं डोक्यावरुन गेलं. पण तरीही पुस्तक वाचताना ते समजल्या वाचुन तसं अडलं नाही.
लीझ माइटनरची हुशारी, तिनं केलेलं संशोधन कार्य, नंतर कुटुंबापासून तिची झालेली ताटातुट, तिनं झेललेली आर्थिक संकटं, तिला करावं लागलेलं देशांतर, ऑटो हाननी तिच्या समवेत तीस वर्ष केलेल्या संशोधन कामाविषयी नंतर नंतर केलेला अनुल्लेख, नोबेल पुरस्कारापासून वंचित राहणं, तिला तिच्या संशोधनाचं योग्य श्रेय न मिळणं, युरेनियमचं विखंडन, अणुबॉम्ब करण्यासाठी शास्त्रज्ञांमधे चाललेली अहम-अहमिका, जर्मनीमधे ज्यूंवरचे अत्याचार, ह्या सगळ्याविषयी पुस्तकात बरंच सविस्तर वर्णन दिलं आहे. लीझच्या आयुष्यात घडलेल्या अनेकानेक घटना इतक्या गुंतागुंतीच्या आणि वेगवान आहेत, की ह्या छोट्याश्या पुस्तकात त्या अक्षरश: झंझावातासारख्या समोर येत राहतात. उपेक्षा-अपमान आणि मानसन्मान-कौतुक हे ऋतुचक्र तिच्या आयुष्यात सतत फिरतच राहिलं. त्या सगळ्याचाच आढावा मला नाही घेता आलेला. (आणि ते एक प्रकारे बरंही झालं असं वाटलं. कारण मग बाकीच्यांना हे पुस्तक वाचताना त्यातली रंगत कमी झाली असं वाटु शकलं असतं.)
एक प्रश्न सारखा पडतो की लीझ माइटनरला एक शास्त्रज्ञ म्हणुन, देशांतरीत म्हणुन बराच संघर्ष करावा लागला. पण तिचा हा संघर्ष जर ती स्त्री नसती तर कित्येक पटींनी कमी झाला असता का? एक शास्त्रज्ञ म्हणुन स्वत:ला सिद्ध करताना तिला इतकं झगडावं लागलं असतं का? म्हणजे अगदी एमिल फिशर आणि मॅक्स प्लँक सारख्या शास्त्रज्ञांकडुनही आधी "तू एक स्त्री आहेस" अशा उपेक्षेला सामोरं जावं लागलं. खरं तर लीझ माइटनर ही साधारण मादाम मेरी क्युरीच्याच काळातली. मेरी क्युरी पेक्षा ११ वर्षांनी लहान. आईन्स्टाईन तर तिला "अवर मादाम क्युरी" म्हणे. मग स्री असुनही मेरी क्युरीला विज्ञान जगतात मिळालेलं यश, तिला मिळालेली मान्यता ह्या दुसर्‍या मेरी क्युरीच्या वाट्याला संघर्षानंतरही का येऊ नये?

ह्या पुस्तकावर लिहायला घेतलं आणि योगायोग लक्षात आला की लीझ माइटनर म्हणजे एक अणुशास्त्रज्ञ. जिला आपल्या ज्ञानाचा, संशोधनाचा उपयोग कधीही विध्वंसक कार्यासाठी करायचा नव्हता. तिच्या ध्यानीमनी नसताना अणूर्जेचा पहिला वाईट वापर केला गेला तो जपानवर. त्या घटनेला नुकतीच ६६ वर्षं पूर्ण झाली. आणि आजच म्हणजे १५ ऑगस्ट २०११ ला जपाननी शरणागती पत्करल्यावर हे विनाशकारी युद्ध संपुन ६६ वर्षं झाली. तसंच आत्तादेखील फुकुशिमा प्लँट्मुळे पुन्हा एकदा जपानला किरणोत्सर्गाच्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतय. आणि जपानमधेच बसुन मी लीझ माइटनर आणि अणुविखंडनातलं तिचं योगदान ह्याविषयी लिहित्ये. किरणोत्सर्ग आणि अणुगर्भाशी तिचं नातं अतुटच असावं.

-------------------------------
डॉ. रुथ लेविन साइम ह्या रसायन शास्त्रज्ञ लेखिकेने लीझ माइटनरचा पत्रव्यवहार, संशोधना संबधीचे पुरावे, दैनंदिनी, अनेक ग्रंथ, मुलाखती, खाजगी पत्र ह्यांच्या आधारानी संशोधन केलं आणि त्यातुन चरित्रग्रंथ लिहिला "Lise Meitner, a life in physics". ह्यातुनच काळाच्या उदरात गडप झालेला लिझ माइटनर विषयीचा अमुल्य ठेवा जगाच्या हाती लागला. वीणाताईंनी मुख्यत्वेकरुन ह्याच ग्रंथाच्या आधारे त्यांचं हे पुस्तक लिहिलय.
-------------------------------

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०१०

माणसं: दुसऱ्या चष्म्यातुन

आई इथे जपानला तीन महिन्यांसाठी आली होती. त्यात नेमकी शेवटचा महिनाभर आजारी पडली. दवाखान्यात अनेक टेस्ट्स झाल्या आणि काविळीचं निदान झालं. जपानमधे आता कावीळ अस्तित्वात नाहीये, त्यामुळे ती का झाली असावी आणि त्यावर औषध योजना काय, ह्यावर इथल्या डॉक्टरांनी भरपूर काथ्याकुट केला. आणि शेवटी ती भारतात जाई पर्यंत म्हणजे पुढचे तीन आठवडे रोज तीन सलाइन घेण्यासाठी तिला दवाखान्यात घेऊन यायला सांगितलं. तिला घेऊन रोज मी आणि वहिनी दवाखान्यात जात होतो.
आई तशी एकदम खंबीर बाई आहे आणि त्यातून ती फारशी आजारी पडत नाही. पण कधी जर क्वचित काही झालं तर मात्र ते आजारपण तिला एरवी सारखं खंबीरपणे घेता येत नाही. आधीच आजारपणामुळे भरपूर अशक्तापणा आलेला. त्यातून परक्या देशात मुलाकडे आणि मुलीकडे आल्यावर आपल्याला आजारपण यावं, हे डॉक्टर आपल्या विषयी काय बोलतायत ते कळत नाही ह्यामुळे ती अजुनच ढेपाळून गेली.
डॉक्टरांनी कुठल्याही नवीन टेस्ट करायला सांगितल्या की ही आधी भीतीनी "नाही" म्हणायची. मग आमच्या दोघींपैकी कोणीतरी एकजण त्या टेस्टलाही तिच्याबरोबर आत जायचो. मधुनच ती "कशाला रोज सलाइन? म्हणतात की कावीळ होते आपोआप बरी" असं म्हणायची. मग आई आणि डॉक्टर ह्या दोघांनाही एकमेकांची मतं समजावून सांगत बसायचो.
रोज तीन सलाइन म्हणजे साधारण पाच तास लागायचे. मग आमच्या मुलांच्या शाळा आणि बाकी अॅकटिविटिजच्या वेळा सांभाळून आम्ही दवाखान्याच्या चकरांचं वेळापत्रक आखलं. शनिवार रविवार नवरा आणि भाऊ हे दोघंही मदतीला असायचे.
दरम्यान रोज दवाखान्यात जाऊन जाऊन पहिल्या आठवड्याभरात तिथले रोज किंवा नेहमी येणारे चहरे ही ओळखायला लागले. सगळ्या जपानी जनतेत आमचं भारतीय कुटुंब, विशेषतः आई तिच्या पंजाबी ड्रेस आणि कुंक ह्यामुळे उठून दिसायची. मग तो सलाइनचा "मोबाइल" स्टँड हातात धरून हळुहळु चालत बाथरुमला वगैरे जायला आम्ही तिला मदत करायचो. बाहेर बसलेले लोक, खास करून म्हातारी माणसं, नेहमी त्या वेळेला आमच्याकडे बघत बसायचे. सुरुवातीला "या भागात परदेशी लोक फारसे दिसत नाहीत म्हणून इतकं कुतुहलानी बघत असतील" असं आम्हाला वाटायचं. पण थोड्याच दिवसात हे "उठून दिसणं" केवळ परदेशी लोक आहेत म्हणून नाही तर आमच्या सतत आईच्या अवतीभवती असण्यामुळे, तिला सगळीकडे कंपनी देण्यामुळे आहे हे हळुहळु लक्षात यायला लागलं.
आजुबाजुला बघितल्यावर जाणवलं ही ह्यातली बहुसंख्य वयस्कर लोकं कोणाच्याही सोबतीशिवायच आलेली असत. मग ते निम-म्हातारे असोत की अगदी जख्ख म्हातारे! कधी कधी एखादं म्हातारं जोडपं एकमेकांच्या साथीनी यायचं. ते दोघंही इतके थकलेले की कोण कोणाला सोबत करतंय हा प्रश्न पडावा. एंडोस्कोपी, सिटी स्कॅन किंवा एक्सरे विभागाच्या बाहेरही ही लोकं इतकी शांतपणे बसलेली असायची की जणू काही विमानात चढायची घोषणा होण्याची वाट बघतायत. काहीजणं आपापला सलाइनचा चालता- फिरता स्टँड घेउन सोफ्यावर निवांत बसून टिव्ही बघत असत. जसं काही टिव्ही बघणं हे खरं काम आहे आणि फावल्या वेळात सलाइन उरकून घेतायत.

आम्हाला नेहमी कुतूहल वाटायचं की ह्यांच्या बरोबर दवाखान्यात यायला घरातल्या कोणालाच वेळ कसा नाही? गेल्या १० वर्षात इथल्या जीवन पद्धतीची कितीही सवय झाली असली तरी आजारी माणसानी दवाखान्यात एकटंच यायचं ही कल्पना पचनी पडायला जरा अवघडच गेली.

ह्यामधे कुठेही दोन परस्पर भिन्न समाजाची तुलना करण्याचा हेतु निश्चितच नाही. मला टिपिकल भारतीय चष्म्यातून ह्यांच्याकडे बघताना एकीकडे त्यांचं दवाखान्यात एकट्यानी येउन सगळं आपापलं manage करणं हे किंचित "बिचारं" वाटायचं. पण तरी त्यांच्या वागणुकीतुन मात्र ते कुठेच नाही दिसलं. हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
जपानी लोकांना त्यांच्या चष्म्यातून आम्हा भारतीय रुग्णांकडे बघताना नक्की काय वाटत असेल?

सोमवार, ८ नोव्हेंबर, २०१०

तोत्तोचान

आत्ता पर्यंत काही जपानी पुस्तकं वाचून झाल्येत. त्यात "मादोगीवा-नो-तोत्तोचान" चा ही समावेष आहे.
चेतना सरदेशामुख यांनी मराठीत अनुवाद केलेलं "तोत्तोचान" खुप पूर्वी वाचलं होतं. ते आणि मूळ रुपातलं "तोत्तोचान" वाचण्यात मधे बरीच वर्षं पण गेली होती. आणि दोन्ही रूपं आपापल्या परीनी आवडली सुद्धा होती.
मध्यंतरी "मायबोली" वर गप्पांमधे जपानी पुस्तकं जपानी मधून वाचण्याचा अनुभव कसा वाटला, ह्या विषयी चर्चा झाली. आत्ता पर्यंत ह्या दृष्टीनी कधी विचारच केला नव्हता. तेच पुस्तक फक्त दोन वेगवेगळ्या भाषांमधुन वाचलं. जपानी मधून वाचल्यामुळे जपानी शब्द संग्रहात भर पडली, इतकाच विचार त्यामागे होता.
सद्ध्या अवनीला अनुवादित "तोत्तोचान" वाचायला दिलंय. काल त्यातलं "३२ वेळा चावून खा" हे गाणं तिनी वाचायला सुरुवात केली. अनुवादात गाण्याच्या रचनेविषयी, चाली विषयी फारसं काही वर्णन नाहीये. त्यामुळे "तोत्तोचानच्या शाळेत हे गाणं कसं म्हणत असतील?" हा तिला प्रश्न पडला आणि काही केल्या हे मराठी गाणं छानश्या चालीत म्हणता येईना. मग आम्ही मूळ पुस्तकातून ते गाणं शोधलं. मूळ जपानी गाणं आहे,

"योSकू कामे यो
ताबेमोSनो ओ
कामे यो कामे यो कामे यो कामे यो
ताSबेमोनो ओ"
(शब्दश: अर्थ प्रत्येक घास नीट चावुन खा )

ह्या गाण्याला तोत्तोचान च्या मुख्याध्यापकांनी "रोS रोS रोS योअर बोट ..... " ह्या गाण्याची चाल लावली होती.
झालं! हे सांगितल्यावर अवनीला मस्त एक किल्ली बसली. आणि "योSकू कामे यो....ताबेमोSनो ओ" हे तालासुरात सुरु झालं.

तेंव्हा मला प्रकर्षानी जाणवलं ते मूळ भाषेतलं कथन आणि अनुवादित कथन यातला फरक!
अनुवाद करताना बरेचदा बंधनं येतात. मूळ भाषेतला एखाद्या शब्दाचा, वाक्यरचनेचा अनुवाद कधीतरी चपखल प्रतिशब्द न मिळाल्यामुळे फापटपसारा वाटू शकतो. तर कधी मूळ रूप आणि भावना बाजुला पडतात.

आज पासून पुन्हा एकदा मी जपानीतुन "मादोगीवा नो तोत्तोचान" वाचायला सुरुवात केल्ये. वाचनानी गती अजुन घेतली नाहीये. पण जपानी भाषेचा खास लहेजा अनुभवायला, फक्त जपानीतच चपखल बसणारे शब्द पुन्हा वाचायला, अनुभवायला मजा येत्ये. त्या बद्दलचा अनुभव लिहायला किल्ली बसल्ये. लवकरच त्याबद्दल लिहायला नक्की आवडेल.

रविवार, ४ जुलै, २०१०

मर्मबंधातली ठेव ही!

रोज दुपारी अवनीला शाळेतुन घरी घेऊन येताना letter box मधे डोकवायचं, काही पत्र असतील तर घ्यायची, हा माझा आणि अवनीचा शिरस्ता! हल्ली पत्र म्हणजे काय तर सगळी छापील बीलं नाहीतर कसली तरी माहिती पत्रकं. किती दिवस झाले कुणाचं हस्ताक्षरातलं पत्र आलेलं नाही. मी सुद्धा कोणाला पत्र लिहिलं, त्याला सुद्धा किती दिवस झाले. मागच्या चार पाच वर्षांपर्यंत भारतातून पत्र येत होती. आईची, मावशी-आत्याची, आणि माझ्या मैत्रिणीची आरतीची! अगदी खुप नियमीत नाही पण निदान अधून मधून तरी. मी सुद्धा उत्साहानी लिहायची तेंव्हा. आता सगळीकडे फोन आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे रोजच्या रोज इ-मेल आणि वरचेवर फोन होतातच. मग कशाला येत्ये पत्र लिहायची वेळ?
मला अजुन आठवतय लहानपणी आम्ही काय वाट बघायचो पोस्टमन काकांची! घराच्या खिडकीत बसून लांबवर नजर ठेवायची बरोबर सकाळी ११ वाजता. मग ते काका दिसले की विचारायाचो "काकाssss, दाते आहे?" किंवा कधीकधी आम्ही विचारायच्या आत तेच पुकारा करायचे "दातेsssssss!".
आमचं एकत्र कुटुंब. आणि आमच्या मावश्या, दोन आत्या, आजी आजोबा असे बरेच जणं पुण्याच्या बाहेर होते. त्यामुळे बरेचदा कुणाचं न कुणाचं पत्र असायचंच. आमच्या सगळ्यांच्या वाढदिवसांना, आईबाबांच्या आणि काका-काकुच्या लग्नाच्या वाढदिवसाला कोणाकोणा नातेवाइकांची पत्र यायची. तशीच कधी नुसती खुशालीची पत्र तर कधी खुशखबर देणारी पत्र. परिक्षा जवळ आली की मुंबईची आत्या आम्हा सगळ्या भावंडांना शुभेच्छा द्यायला हमखास पत्र लिहायची. "मन शांत ठेउन पेपर लिहा. प्रश्नपत्रिका नीट वाचा. बरोबर extra पेन-पेन्सिल असु देत. उत्तरं नीट तपासून पहा" असा अगदी ठरलेला मजकुर असायचा. त्यावरून आम्ही भावंडं चेष्टाही करत असु. पण आम्हाला तिचं पत्र आलं की परीक्षेला जाताना छान वाटायचं. मग रिझल्ट लागल्यावर तिचं शाबासकीचं पत्र यायचं.
आईची एक मैत्रिण अमेरिकेला असते. तिचीसुद्धा आईला अधुन मधुन पत्र येत. आईकडे तिच्या पत्रांचा एक गठ्ठा जपून ठेवलेला होता. कधीतरी आई ती पत्र वाचत बसायची. त्यामुळे मला सुद्धा स्वतःला आलेली पत्र जपून ठेवायची सवय लागली ती आजपर्यंत! पत्र पाठवणं, मग आपल्या पत्राला उत्तर येण्याची वाट बघणं, आलेली पत्र परत परत वाचणं ह्यातली एक वेगळीच गंम्मत मी अनुभवायला लागले.
आज अनेक दिवसांनी जुन्या पत्रांचं ते सगळं बाड बाहेर काढलं. एकेक पत्र घेऊन वाचायला लागले. या पत्रांना कसं छान आपापलं व्यक्तिमत्व असतं. प्रत्येकाच्या अक्षराचं वळण वेगळं, लिहिण्याची स्टाइल वेगळी, भाषेचा बाज वेगळा, इतकंच काय तर शाई सुद्धा वेगळी असते. आधी आईच्या पत्रांचा गठ्ठा घेउन वाचून काढला. आम्हाला तिघांना वाढदिवसाला शुभेच्छा देणारी, गरोदरपणात मी इथे एकटी म्हणून मला सूचना देणारी, अनेक पाककृती लिहून पाठवणारी आई भेटली. आई कधीच फारसं शब्द-बंबाळ किंवा इमोशनल बोलत/लिहित नाही. त्यामुळेच खरं तर तिची पत्र परत परत वाचावीशी वाटतात. तशीच काका, काकू, आत्त्या, मावश्यांची पत्र! मी भावंडांमधे सगळ्यात लहान. त्यामुळे अजुनही बरेचदा प्रत्यक्षात आणि पत्रातही सगळ्यांची तीच भावना दिसते. आजही त्यांची पत्रं मला थेट लहानपणातच नेवून सोडतात. आपल्यावर वेगावेगळे संस्कार करणारी, आपल्या अनेक छोट्या मोठ्या यशामधे आपलं कौतुक करणारी, कठीण काळात आपल्या बरोबर असणारी एवढी माणसं देवानी आपल्याला दिल्येत ह्या बद्दल, माझ्या या माणसांना "वाचताना" आज पुन्हा एकदा कृतज्ञता वाटली. माझ्या ह्या खजिन्यात अजुन एका व्यक्तीनी मोलाची भर घातली ती म्हणजे माझी मैत्रिण आरती. तिनी मला इतक्या वर्षात असंख्य पत्र लिहिली होती. काही वर्षांपूर्वी अनपेक्षितपणानी या जगातून ती निघून गेली. पण तिची सगळी जुनी पत्र वाचताना ती आजही मला भेटते. तिच्या आठवणी तर आहेतच मनात. पण त्या सगळ्या तिची जुनी पत्र वाचताना पुन्हा पुन्हा ताज्या होतात.
या सगळ्या जुन्या पत्रांना एक छानशी ऊब आहे, अगदी आजीच्या साडीच्या गोधडी सारखी. जी इ-मेल, ऑरकुट स्कॅप वाचताना कधीच जाणवत नाही.
हल्ली तर नवरयानी सगळी जुनी पत्रं स्कॅन करून ठेवल्यामुळे हा गठ्ठा नाही ठेवला तरी चालेल असं त्याला वाटतं. पण ती स्कॅन केलेली पत्रं मला त्यांचा उबदार स्पर्श कसा देतील?

"आई तुला पत्राची वाट बघायला इतकं का आवडतं?" अवनीच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून तिला सुद्धा या आठवणींचा ठेवा जतन करायची सवय लावायला हवी.