गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

प्रवास - एक वर्ष आणि दहा किलो मीटर रेसचा


जानेवारी २०१३ -


जुनं वर्ष संपता संपता वजनाचा आकडा वाढायला लागला होता. २०१२ मधे अधेमधेच कधी तरी केलेलं रनिंग आता २०१३ मधे अगदी मनापासून आणि नियमित करायचं ठरवलं.
आधी बरेचदा कधी खूप ऊन आहे तर कधी पाऊस आहे ह्या सबबींखाली रनिंगला दांडी मारली जायची.  ह्या सबबी नसतील तेंव्हा "कंटाळा आला" ही सबब असायचीच :) 
त्याचवेळी मियाझावा केन्जी लिखित "आमे नी मो माकेझु - काझे नी मो माकेझु......"
(雨にもまけず 風にもまけず) ही पूर्ण कविता वाचनात आली.
"मला स्वत: अशी व्यक्ती व्हायला आवडेल" असा मतितार्थ असलेल्या ह्या कवितेच्या पहिल्या दोन ओळी आहेत - "वार्‍याची तमा न बाळगणारं, पावसाला न घाबरणारं, बर्फाला, उन्हाच्या काहिलीला न डगमगणारं माझं शरीर असेल ".
ही कविता वाचनात येणं हा नियमितपणे रनिंगला जाण्याच्या अनेक दट्ट्यांपैकी एक म्हणायला हरकत नाही.

२०१२ मधे साधारण ३ ते ४ किलोमीटरचा टप्पा गाठुन झाला होता.  पण गॅप पडल्यामुळे परत सुरुवात केली ती २.५ किलोमीटर पासून.  तीन किलोमीटर सलग पळता येणं ही कितीतरी दिवस मोठी achievement वाटायची. जपानमधे बाराही महिने कुठल्याही प्रकारच्या हवामानात कुठल्याही वेळेला अनेकजण पळताना दिसतात. जॉगिंग ट्रॅक वर रोज विविध लोकं दिसायची. त्यात रोज येणारी ठराविक माणसंही असायचीच. विशेषतः म्हातारी माणसं. त्यांच्या चालण्या/धावण्याच्या स्पीड मधला नियमितपणा, रोजच्या येण्यामधला नियमितपणा पाहुन सतत स्वतःला motivate करत राहिले.


शैलेशनी दिलेल्या एका रनरच्या ब्लॉगवर वाचनात आलं की "there is no such thing as bad weather, just bad clothes". ह्या वाक्यामुळे "आमे नी मो माकेझु - काझे नी मो माकेझु" वर जास्त focus करता आलं. आता रनिंगला जाण्यात बर्‍यापैकी नियमितपणा आला होता. मग नवीन शूज, सिझन प्रमाणे कपडे ह्याची खरेदी वाढायला लागली.
आता हळुहळू जास्त अंतर धावता यायला लागलं होतं. फेब्रुवारी मधे पहिल्यांदा ५ किलोमीटरचा पल्ला गाठला आणि मार्चच्या पहिला आठवड्यात ६ किलोमीटरचा!
एकदा ६ किलोमीटर केल्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस धाडस करुन ८ किलोमीटर रनिंग झालं. २ महिन्यांपूर्वी माझ्यासाठी ही केवळ अशक्य गोष्ट होती.  एकदा इतकं अंतर केल्यानंतर खूपच confidence आला. आता पुढच्या वर्षी कधीतरी १० किलोमीटरच्या रेस मधे भाग घेता येईल अशी अंधुकशी शक्यता आता वाटायला लागली होती.

एप्रिल २०१३ -
२०१२ मधे हेमंत आणि शैलेशनी यामानाशी प्रिफेक्चर मधे "कात्सुनुमा" ह्या ठिकाणी होणार्‍या फ्रुट्स मॅरेथॉन मधे भाग घेतला होता. तिथेच १० कि.मी. च्या रेसही असतात असं कळलं. मग येत्या ऑक्टोबर मधे त्यामधे भाग घेण्यासाठी प्रयत्न सुरु करावेत का, असा विचार सुरु झाला.
आणि एक दिवस पावसात पळायला गेलेलं असताना ४ किलोमीटर पळुन झाल्यावर अचानक डावा पाय दुखायला लागला. तसंच हळुहळु अजुन एक किलोमीटर अंतर गेले. पाय खूपच दुखायला लागला होता. त्यानंतर एक दिवस आराम केला आणि परत दुसर्‍या दिवशी धावायला गेले. पण........ अजिबातच २ पावलंही पुढे धावायला जमेना. शेवटी २ दिवस ५-५ किलोमीटर चालायचं ठरवलं. दुखणं सहन होईनासं झालं तेंव्हा डॉक्टर गाठला. डॉक्टरांनी किमान महिनाभरची सक्तीची विश्रांती सांगितली. त्यामुळे रनिंग तर सोडाच, कुठे बाहेर येण्याजाण्यावरही बंदी आली.
मग पाय बरा झाल्यानंतर हळुहळू चालायला सुरुवात केली. धावण्याचा आत्मविश्वास परत येईपर्यंत जवळजवळ महिना गेला. 

जुलै २०१३ ते सप्टेंबर २०१३-
२४ जूनला कात्सुनुमा फ्रुट्स मॅरेथॉनच्या entries सुरु झाल्या.  ह्या वर्षीची रेसची तारीख २० ऑक्टोबर होती. पहिल्याच दिवशी उत्साहानी entry केली. मी १०के साठी दिली आणि हेमंत आणि शैलेशनी हाफ मॅरेथॉनसाठी. आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात कमरेत उसण भरली. ह्या दुखण्यानी पण जवळ जवळ तीन आठवडे खाल्ले. आता कात्सुनुमा मधे पळणं शक्य होईल असं वाटेना.  तीन आठवड्यांनी पुन्हा नव्यानी सुरुवात केली. स्वत:ला motivate करत सराव सुरु केला.
सप्टेंबर मधे घराचं शिफ्टिंग केलं त्यात परत २ आठवडे सुट्टी झाली. जुलै ते सप्टेंबर मधे ७ किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची प्रॅक्टिस झाली नव्हती त्यामुळे टेन्शन वाढायला लागलं.
आता शेवटचा एक महिना कोणतीही दुखापत होऊ न देता धावायचं असं मनाला पक्कं बजावलं.
महिन्याभरात २ वेळा १० किलोमीटरची practice करुन झाली आणि आपण नक्कीच ही रेस पूर्ण करु शकतो असा आत्मविश्वासही आला.  मात्र ऐन रेसच्या दिवशीचं टेन्शन होतंच. नेमकी त्यादिवशी काही दुखापत होणार नाही ना, ही भीती मनात होतीच.

ऑक्टोबर २०१३ -
 १९ ऑक्टोबरला म्हणजे रेसच्या आदल्या दिवशी आम्ही सगळे सहाजणं कात्सुनुमाला रवाना झालो. २ वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी म्हणुन ह्या भागात आलो होतो. तेंव्हा "शिझेन-गाक्को" मधे राहिलो होतो, तिथेच ह्यावेळी राहिलो.
आदल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजताच जेवणाची वेळ होती.  भात-मासे-मिसो सूप असं अगदी टिपिकल जपानी जेवण होतं.
दुसर्‍या दिवशी म्हणजे २० तारखेला सकाळी ब्रेकफास्टची वेळ ६.३० होती. त्यामुळे रेसच्या आधी ३ तास जपानी ब्रेकफास्ट करुन तयार होतो.  आदल्या रात्री पासून मस्त पाऊस पडत होता. एप्रिल मधल्या पावसातल्या पळण्यानी झालेल्या दुखापतीची आठवण होऊन पुन्हा धडधडायला लागलं. ७.३० ला "शिझेन गाक्को" मधुन प्रस्थान केलं आणि नेमुन दिलेल्या पार्किंग लॉट मधे गाडी लावली. पार्किंग लॉट म्हणजे खरं तर द्राक्षांच्या मळेच होते. द्राक्षाच्या मांडवाखालची रिकामी जागा स्पर्धकांच्या गाड्यांसाठी तात्पुरती राखुन ठेवली होती.
इतक्या पावसातही स्पर्धकांचा उत्साह, आणि आयोजकांची शिस्त वाखाणण्यासारखी होती. बुथ वर जाऊन नंबरचं बिब घेतलं. ते लावुन toilet च्या लांबलचक रांगेत जाऊन उभी राहिले. घड्याळाचे काटे ज्या वेगानी पुढे पुढे सरकत होते तितक्याच संथ गतीनी ती रांग पुढे सरकत होती. या रांगेत उभं राहुनच stretching केलं.  toilet पासून चालत साधारण १० मिनिटाच्या अंतरावर १०के ची स्टार्ट लाईन होती. कसंबसं पळतच  स्टार्ट लाईन गाठली. इतकं ऐनवेळी धावत पळत गेल्यावर स्थिर व्हायला तर वेळ मिळाला नाहीच पण इतक्या गर्दी मधे स्टार्ट लाईन पासून बराच मागे नंबर लागला.  ह्या सगळ्यामुळे टेन्शनचा पारा अगदी वर गेला होता :)
आयपॉड वर गाणी सुरु झाली. एरवी रनिंगसाठी म्हणुन खास उडत्या चालीची गाणी असतात. पण ह्यावेळी playlist मधे थोडे बदल करुन सुरुवातीला "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा....", "उड जायेगा..." आणि "अवघा रंग एक झाला..." ही गाणी सुरुवातीला टाकली होती. आणि ह्या गाण्यांचा अपेक्षित परिणाम होऊन आलेलं टेन्शन कधी गेलं हे कळलंच नाही :) आता आजुबाजुच्या वातावरणाकडे लक्ष जायला लागलं. मस्त रिमझिम पाउस पडत होता. आजुबाजुचे द्राक्षांचे मळे आणि वाइनरीज बघत धावणं हा खरोखरच नयनरम्य अनुभव होता. ज्यांना काही records करायची होती, ती सगळी लोकं वेळेत जाऊन स्टार्ट लाईनला थांबली होती. त्यामुळे तसा लोंढा केंव्हाच पुढे गेला होता. बाकी माझ्या सारखी असंख्य मंडळी सगळा परिसर मनमुराद बघत बघत धावत होती. तितक्यात माझ्यापुढे मला २ माणसं एकमेकांचे हात धरुन (दोरीनी बांधलेले) पळताना दिसली. नंतर कळलं की त्यातला एक जण अंध आहे, आणि त्यानी रेसमधे भाग घेतलाय. त्यामुळे बरोबरचा माणुस त्याचा दिशादर्शक आहे. ह्या माणसाला बघुन मला आत्तापर्यंत मी केलेला व्यायामाचा कंटाळा आठवला आणि लाज वाटली. एव्हाना आता हाफ मॅरेथॉन सुरु झाली होती. तितक्यात मागुन सुचना आली की पट्टीचे रनर्स आता वेगात जातील. त्यामुळे १०के वाल्यांनी डाव्या बाजुने धावा. आणि पुढच्या ५ मिनिटातच बंदुकीतुन गोळी जावी तसे ते top runners सटासट आमच्या उजव्या बाजुने पुढे गेले. मला आठवलं प्राथमिक शाळेत असताना हायस्कुलच्या ताया टेचात शेजारुन गेल्या की आम्ही मंत्रमुग्ध होऊन बघत रहायचो. तसंच ह्या रनर्स कडे काही वेळ बघत राहिलो :)
कात्सुनुमाचे सगळे रस्ते चढ-उतारांचे आहेत. इतक्या चढावर मी आतापर्यंत कधीच धावले नव्हते. त्यामुळे चांगलचाच दम लागला आणि वेगही मंदावला. 
इतक्या पावसात कात्सुनुमाचे रहिवासी सगळ्यांना प्रोत्साहन द्यायला आले होते. लहानांपासून अगदी कमरेत वाकलेल्या आजी-आजोबांचं "गांबारे~~ गांबारे" ऐकुन मस्त वाटत होतं. जिथे खूपच चढावर आम्ही अगदी ढपुन जात होतो तिथे ही माणसं "अजुन ३०० मीटरच चढ राहिलाय, मग उतार आहे...." असं सांगत होती. 
शेवटी एकदाचे सगळे चढ संपले आणि मस्त उतार सुरु झाला.  ९ किलोमीटरचा बोर्ड पाहिला आणि जीवात जीव आला. शेवटचा एक किलोमीटर पूर्ण सपाट रस्ता होता. शेवटी १ तास १६ मिनिटात फिनिशलाईन वर पाय ठेवला :) म्हणजे नेहमीपेक्षा ६ मिनिटं कमी लागली होती.
आपण अगदीच शेवटचे येऊ नये, आपल्या नंतर निदान चार तरी लोक असावेत असं वाटत होतं. १०८२ लोकांमधे ६११ वा नंबर आला. सर्टिफिकेट बरोबर वाइन ची बाटली आणि द्राक्षाचे घड बक्षिस मिळाले. खर्‍या अर्थानी स्वमेहनतीची द्राक्ष आणि वाईन म्हणता येईल ह्याला :)

जानेवारी २०१४ 
ह्या पहिल्या रेसच्या आनंदाचा भर जरा ओसरल्यावर पुन्हा एकदा "रननेट"च्या साइट वर जाऊन तोक्यो भागातच काही १०के च्या रेस आहेत का ह्याचा शोध घेतला. आणि १ जानेवारीच्या सकाळी १०के ची रेस "तामागावा" च्या काठावरच आहे असं कळलं. तिथे लहान मुलांसाठी पण २ किलोमीटरची रेस होती. मग अवनीचं नाव २के आणि माझं १०के साठी दिलं. ३१ डिसेंबरला पार्टी करुन उशिरा झोपुन १ जानेवारीला उशिरा उठणं ह्यापेक्षा मला ह्या रेसची कल्पना खूपच आवडली (यामुळे घरातल्या बाकी लोकांना पार्टी नाही करता आली, त्यामुळे ही कल्पना त्यांना नसावी तितकी पसंत ;) ) १ तारखेला सकाळी ७ वाजता मी, हेमंत आणि अवनी निघालो. नवीन वर्षाची अशी उत्साहात सुरुवात करणारी गर्दी बघुन मस्त वाटलं :) 
मात्र ह्या रेसमधे माझ्या समजुतीचा थोडा घोटाळाच झाला. रेसची जी वेळ, म्हणजे सकाळी १०:००, सांगितली होती ती फक्त लहान मुलं आणि पुरुष गटाची होती. महिला गटाची वेळ सकाळी ११.३० होती. आता इतक्या सकाळपासून इथे येऊन ११.३० पर्यंत नुसतंच बसुन राहण्यात काहीच राम वाटेना. शेवटी पुरुष गटात पळणं म्हणजे फक्त तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही, पण पळायला परवानगी नाहीच असं नाही, हे शेवटच्या क्षणाला कळलं. आणि सगळे पुरुष मेंबर्स पळायला लागल्यावर मी देखील मागुन सामील झाले.
सगळे एकसे एक पट्टीचे रनर्स होते. आणि त्यात मी शेवटी पळायला सुरुवात केलेली. पहिला किलोमीटर जीव खाऊन धावले. घड्याळानी वेळ दाखवली ५ मि. ५५ सेकंद :) स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना! मग पुन्हा एकदा उत्साह संचारला आणि ही रेस १ तास ५ मिनिटात पूर्ण केली. म्हणजे आधीच्या रेसपेक्षा तब्बल ११ मिनिटांची प्रगती :)



नियमित रनिंगला सुरुवात केली तेंव्हा ऐन शिशिरातली थंडी होती. तेंव्हा बागेत, नदीकाठी सगळीकडे फक्त निष्पर्ण झाडंच होती. मग रोज ती झाडं आकाशाच्या छटा जशा असतील त्याप्रमाणे वेगवेगळी दिसायची. ज्यावेळी आपल्याला आता सलग पाऊण तास रनिंग करता येतं हे उमगलं, त्याचवेळी अचानक एक दिवस त्याच झाडांमधल्या एका प्लमला अचानक गुलाबी बहर आलेला दिसला. रांगेतली सगळी झाडं निष्पर्ण आणि हे एखादंच फुललेलं झाड दिमाखात उभं असायचं. मग ते झाड आता सारखं बघता यावं म्हणुन रनिंगला दांड्या मारणंही कमी झालं. हळुहळू वसंत ऋतु आला. भोवतालची साकुराची झाडं पूर्ण बहरली. बाकी झाडं हिरव्या पानांनी सजली. दिवसाची सुरुवात अशी साकुराच्या झाडांखालुन आणि वेगवेगळ्या रंगांचे फुलांचे ताटवे बघत करताना फारच भारी वाटायचं. स्वतःच्या रनिंग मधल्या प्रगतीचं  हे प्रतिबिंब की ह्या निसर्गाच्या किमयेमुळे स्वतःमधे हा प्रगतीच्या दिशेनी बदल झालाय हा विचार सारखा डोक्यात यायचा.  उन्हाळ्यात सकाळी ६.३० चं ऊन पण सहन होईनासं झालं. मग तेव्हा फक्त संध्याकाळी रनिंग केलं. पुढे हवेत गारवा यायला लागला आणि हेमंतऋतुची रंगांची उधळण पानांवर झाली.  निसर्गातला हा बदल रोजच्या रोज टिपताना एक वेगळाच आनंद मिळायला लागला. ह्याआधी कदाचित मी निसर्गातले हे बदल इतक्या जवळुन, इतक्या नियमितपणे कधीच टिपले नसतील.
मग जानेवारीची दुसरी १०के रेस आली तोवर "शिशिरऋतुच्या पुनरागमने" झाडाचं एकेक पान परत गळायला लागलं होतं. वर्षाचं एक चक्र पूर्ण झालं. आणि आता ह्या रनिंगच्या चक्रात मी स्वतःहुन पूर्ण अडकुन गेल्ये.

माझ्या रनिंगच्या ह्या वर्षभराच्या सगळ्या प्रवासाची UAE मधुन मेघना ऑनलाइन साक्षीदार होती आणि ऑनलाइन भागीदार देखील. आम्ही गेले वर्षभर एकमेकीना motivate करत राहिलो. जमेल तसं वेगळ्या टाइम झोन मधे असुन सुद्धा वेळ ठरवुन एकाच वेळी रनिंगही केलं. ही ब्लॉगपोस्ट पण ती मागे लागली नसती तर कदचित लिहुन झाली नसती. थँक्स मेघना! :)