बुधवार, २ एप्रिल, २०१४

संयुक्ता पाऊल "पळते" पुढे - एक अनोखं गेट-टुगेदर

२०१३ च्या जानेवारी महिन्यापासून मी आणि मेघनाने आपापल्या देशात नियमित रनिंग करायला सुरुवात केली. आम्ही एकमेकींना आमच्या रोजच्या रनिंगचे अपडेट्स देत होतो, प्रोत्साहन देत होतो, नवनवीन टार्गेट्स देत होतो. सहा महिने प्रॅक्टिस झाल्यानंतर एक दिवस दोघींना वाटलं की आपापल्याच देशात म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी का होईना, पण एकाच वेळी धावलो तर ....? दोघींच्या टाईमझोनमध्ये ५ तासांचा फरक असूनसुध्दा हे जमवलं. मेघनाने तिच्या सकाळी ६.०० वाजता घरातुन ट्रॅककडे निघताना मला पिंग केलं आणि मी पण त्याचवेळी घरातुन बाहेर पडले. इप्सित स्थळी पोचून स्ट्रेचिंग करुन झाल्यावर फोन वरुन "गेट-सेट-गो" चा सिग्नल देऊन पळायला सुरुवात केली. थँक्स टू आयफोन आणि थँक्स टू टेक्नॉलॉजी स्मित २०१४ च्या फेब्रुवारी पर्यंत कधी ५के, कधी ७के, कधी १०के अशी वेगवेगळ्या अंतराची पाच-सहा वेळेस 'रनिंग गेट-टुगेदर्स' झाली. मनात विचार आला की जर आम्ही दोघी ह्या दोन टाईमझोन्समध्ये जमवू शकतो तर यात "मायबोली" वरच्या इतर "संयुक्तांना" सहभागी केलं तर??
विचार आल्यावर लगेच ठरवून संयुक्तामध्ये या कल्पनेचं सुतोवाच केलं आणि महिला दिनाच्या मुहुर्तावर लगेच धागा सुरु केला. मेघनाला खरंतर खूप रिस्पॉन्सची अपेक्षा नव्हती. पण सांगायला आनंद होतोय की तिचा चांगलाच अपेक्षाभंग झाला. फिदीफिदी
आणि सुरुवात झाली एका अनोख्या संयुक्ता गेट-टुगेदरच्या प्लॅनिंगला! आत्तापर्यंत आम्ही दोघीच करत असलेल्या गेट-टुगेदरला आता थोडं मोठं स्वरुप येणार होतं. त्यानुसारच साधारण कल्पना होती 'एक वेळ - वेगवेगळी ठिकाणं'. म्हणजे एकाच वेळेस वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या संयुक्तांनी या 'रनिंग गेट-टुगेदर' मध्ये भाग घ्यायचा. अंतर ठरलं ५ किमी. आणि तारीख ३० मार्च २०१४! जपानमध्ये मी सकाळी ११.०० वाजता रनिंग सुरु करणार तेव्हा भारतात सकाळचे ७.३० झालेले असतील तर मध्य पूर्वेत सकाळचे ६.००. यातच अजून ५ वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या संयुक्तांनी भाग घेऊन आमच्या उत्साहात भर घातली. सिंगापूर, युके, अमेरिका (इस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट) आणि ऑस्ट्रेलिया.
काही जणींना रनिंगची सवय होती तर काही जणींना रोजच्या चालण्याच्या व्यायामाची. काही जणींनी आत्तापर्यंत कधी सुरुवात केली नव्हती पण ह्या गेट-टुगेदर मधे भाग घ्यायच्या निमित्तानी सुरुवात करायची होती. काही जणींना आपण हे अंतर चालत निश्चित पार करु असं वाटत होतं परंतू धावण्याबद्दल विश्वास नव्हता. मग हे फक्त "रनिंग गेट-टुगेदर" न करता "रनिंग/वॉकिंग गेट-टुगेदर" करायचं ठरलं. म्हणता म्हणता ५२ जणी जमल्या.
इथे एक बाब आम्हांला खूप कौतुकाची वाटली. भारतात एक तर उन्हाळा सुरु झालेला आणि तसं म्हटलं तर चालण्या-पळण्यासाठी घराच्या अगदी जवळपास सोयीची जागा असेलच असं नाही. पण असं असूनसुद्धा भारतातल्या संयुक्तांनीच मोठ्या संख्येने या रनिंग/वॉकिंग गेट-टुगेदरमध्ये भाग घेतला.
आत्ता पर्यंत आम्ही दोघीच जेंव्हा हे रनिंग गेट-टुगेदर करत होतो तेंव्हा जपान आणि युएई ह्या दोनच देशातल्या वेळा आणि ऋतुंची चिंता करावी लागत होती. पण आता सगळ्याजणी मिळुन वेगवेगळ्या आठ टाईमझोनमधल्या संयुक्ता होत्या. त्यातुन सगळीकडचे ऋतुही पूर्ण वेगळे. जपानमध्ये मी ३० मार्चला सकाळी ११.०० वाजता सुरु करणार तेंव्हा ऑस्ट्रेलियाची लोकल वेळ होत होती भर दुपारी १.०० आणि सिंगापुरला लोकल वेळ सकाळी १०.००. पण अमेरिकेच्या इस्ट कोस्टवर तेंव्हा होत होते २९ मार्चच्या रात्रीचे १०.०० व वेस्ट कोस्टला संध्याकाळचे ७.००. तर युके मधे तेंव्हा वाजणार होते ३० मार्चच्या पहाटेचे ३.००. त्यामुळे अगदी एकाच वेळी सगळ्यांनी धावण्याचं गणित थोडं अवघड वाटायला लागलं. मग सगळ्यांच्या वेळेचा आणि त्या-त्या देशातल्या ऋतुंचा विचार करून तीन ग्रूप पाडले. पहिल्या ग्रूपमधल्या म्हणजे सिंगापूर, अमेरिकेतल्या पूर्व किनार्‍यावरच्या व ऑस्ट्रेलियामधील संयुक्ता आत्ता ठरलेल्या वेळेच्या तीन तास आधी एकत्र सुरु करतील. ठरलेल्या वेळेवर दुसर्‍या ग्रूपमधल्या संयुक्ता ज्या जपान, भारत, मध्य पूर्व व अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर होत्या त्या ठरवून एका वेळेस धावतील. युकेतल्या संयुक्तांची वेळ कोणाबरोबरच जमत नव्हती त्यामुळे त्या त्यांच्या ३० मार्चला रविवारी सकाळी ७.३० ला एकत्र धावतील असं ठरवलं.
मध्य पूर्वेचे देश सोडल्यास सगळ्यांना सोईचा म्हणून रविवार ठरवला होता. पण कुवेतच्या एका संयुक्ताने आपल्याला रविवारी जमणार नाही म्हणुन शनिवारी एकटीने चालेन असं सांगून अप्रत्यक्ष भाग घेतला तर भारतातल्या एका संयुक्तेला सकाळी चालणं जमणार नव्हतं म्हणून तिनेही संध्याकाळी चालेन पण ठरलेलं अंतर चालून पूर्ण करेन असा संकल्प केला. त्या अगदी गेट-टुगेदर मध्ये सगळ्यांच्या वेळेला सहभागी नसल्या तरी त्यांनी चालण्याचं ठरवलं होतं हेच पॉझिटिव्ह होतं.
बुलेटिन बोर्ड उघडला, नावनोंदणी पण व्हायला लागली. तरी सगळ्यांना सतत मोटिवेट करत राहाणं खूपच गरजेचं होतं. त्यामुळे दर ३-४ दिवसांनी याच्याशी संबंधित चित्रं व त्याबरोबर संदेश टाकायचा असं ठरवलं जेणेकरून भाग घेतलेल्या संयुक्तांना ३० मार्चची, पर्यायाने सरावाची आठवण राहील आणि संयुक्तांचा उत्साहही वाढायला मदत होईल. मग एकमेकींचा उत्साह वाढवणं, टिप्स देणं, एकाच शहरात असणार्‍या संयुक्तांना भेटुन एकत्रच कुठे धावता/चालता येईल ह्या बद्दल चर्चा झडु लागल्या. हल्ली स्मार्टफोन्सवर चालण्या-धावण्याशी संबंधित बरीच चांगली चांगली अ‍ॅप्स मिळतायत. अंतराचा अंदाज येण्यासाठी हे गरजेचंही होतं. बहुतांशी जणी हे असं पहिल्यांदाच करणार होत्या त्यामुळे कोणतं अ‍ॅप चांगलं वगैरेची चर्चाही झालीच. ज्या आधीपासूनच अशी अ‍ॅप्स वापरत होत्या त्यांनी त्यांच्या अनुभवाची देवाण-घेवाण केली.
गेट-टुगेदर च्या दिवशी त्या-त्या ग्रूपमधल्या सगळ्यांनी एकाच वेळेस धावणं/चालणं अपेक्षित होतं. त्यामुळे गेट-टुगेदर साठी "गेट-सेट-गो" चा सिग्नल द्यायला व्हॉट्सअॅप वर ग्रूप्स करायचे असं ठरलं. पुन्हा एकदा थँक्स टू द टेक्नॉलॉजी स्मित त्याप्रमाणे दहा बारा दिवस आधीच बुलेटिन बोर्डवर लिहून नंतर वेळेत फोन नंबर्स मिळून ग्रूप करता यावा यासाठी सगळ्यांना संपर्कातून मेल टाकून फोन नंबर्स मागवले.
बुलेटिन बोर्ड वेगळ्या अर्थाने पेटला होता. सगळ्याच जणी खूप उत्साहात होत्या. आणि मर्फीच्या नियमांनुसार १०-१२ दिवस आधी स्वत:चं आजारपण, मुलांचं आजारपण, ऑफिसमधल्या कामाचा ताण अश्या एकेक अडचणी यायला लागल्या. असं असलं तरी ठरलेल्या दिवशी धावायचा/चालायचा निश्चय अटळ होता.
ठरल्याप्रमाणे बरोब्बर दोन दिवस आधी व्हॉट्सअ‍ॅपवर तीन ग्रूप्स पाडले गेले. आणि तिथे चर्चेला सुरुवात झाली. टाईमझोनप्रमाणे जसं धावायचं/चालायचं ठरलं होतं, त्याचप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवर तीन ग्रूप्स तयार केले. सगळ्यांचे फोन नंबर्स त्यावर अ‍ॅड केल्यावर तिथे एकच गडबड सुरु झाली. फिदीफिदी मायबोलीवर असतात त्याप्रमाणे इथेही बर्‍याच जणी वाचनमात्र होत्या. डोळा मारा
हां-हां म्हणता गेट-टुगेदर चा रविवार उजाडला. सिंगापूरमध्ये सकाळचे ७ वाजत होते तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये सकाळचे १० तर अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर शनिवारची संध्याकाळ. तिथल्या संयुक्ता त्यांच्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता सुरु करणार होत्या. पहिला ग्रूप जपानच्या वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता सुरु करणार होता. ठरल्याप्रमाणे मी माझ्या ७.३० वाजता म्हणजे अर्धा तास आधी त्यांना पिंग करणार होते. पण त्या सगळ्या जवळजवळ तासभर आधीपासूनच उत्साहात तयार होऊन वेळ होण्याची वाट बघत होत्या त्यांचा उत्साह बघुनच हे गेट-टुगेदर नक्की यशस्वी होणार ह्याचे सिग्नल्स मिळाले.
आमच्या ग्रूपची वेळ जवळ येत गेली तसे व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजेस यायला लागले. सगळ्यांना स्टार्टिंग पॉईंटला १५ मिनीटे आधी पोचून स्ट्रेचिंग करून तयार रहा अशी सूचना दिली होती त्याप्रमाणे सगळ्याजणी एकदम जय्यत तयारीत होत्या. माझ्या जपानच्या टाईमझोनबरोबर इतर ३ टाईमझोनमधल्या (भारत, युएई व अमेरिकेचा पश्चिम किनारा) संयुक्ता माझ्याबरोबर भाग घेणार होत्या. आम्ही ट्रॅकवर जायला निघायच्या आधीच पहिल्या ग्रूपमधल्या संयुक्तांचे कामगिरी फत्ते झाल्याचे मेसेजेस यायला सुरुवात झाली होती. मी १०.४० ला ट्रॅकवर जायला निघाले, भारतातल्या संयुक्ताही त्यांच्या नियोजित ठिकाणी जायला निघाल्या होत्याच. बरोबर ११ च्या ठोक्याला मेघनाने 'गेट सेट गो' चा सिग्नल दिला आणि एका मोठ्या ग्रूपच्या गेट-टुगेदर ला सुरुवात झाली. सगळ्यांचा उत्साह ऊतू जात असल्याने काहीजणी प्रत्येक कि.मी.चा अपडेट देत होत्या तर काहीजणींनी ठरलेलं अंतर पूर्ण झाल्यावरच अपडेट्स दिले. तासाभरात व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजेसचा पूर यायला लागला. ठरल्याप्रमाणे जवळ जवळ सगळ्यांनीच या गेट-टुगेदर मध्ये भाग घेऊन ते यशस्वी करून दाखवलं.
दुसर्‍या आणि तिसर्‍या ग्रूपच्या वेळेत तसं बरंच अंतर होतं. तिसर्‍या ग्रूपमध्ये फक्त युकेमधल्या संयुक्ता भाग घेणार होत्या. त्या त्यांच्या सकाळी ७.३० वाजता सुरु करणार होत्या. त्याप्रमाणे बरोबर ६.३० वाजता त्यांना पिंग करून तयारीला लागायची आठवण करून दिली. वेळेच्या आधी १५ मिनीटं पोचून स्ट्रेचिंग करायची आठवण करायलाही विसरलो नाही. बरोबर ७.३० वाजता त्यांनाही 'गेट सेट गो' चा सिग्नल दिला आणि त्यांच्या अपडेट्सची वाट बघत बसलो. ह्या गेट-टुगेदर चा गड सर होण्याचा हा शेवटचा टप्पाच राहिला होता.तासाभरात त्यांचेही टार्गेट पूर्ण केल्याचे मेसेजेस ग्रूपमध्ये आले. आणि हे गेट-टुगेदर खर्‍या अर्थाने यशस्वी झालं.
ह्या अनोख्या गेट-टुगेदर मध्ये आम्ही सगळ्या "संयुक्तांनी" मिळून आज काही तासात जगभरातील २५० कि.मी.पेक्षा जास्त परिसर पायाखालून घातला. स्मित
आत्तापर्यंत आम्ही दोघीच असं ठरवून धावत होतो त्यामुळे आमच्यात को-ऑर्डिनेशन उत्तम आहे हे कळलं होतंच. पण आता वेगवेगळ्या टाईमझोनमधल्या इतक्या जणी असणार होत्या. इतका सगळा घाट तर घातलाय, नीट पार पडेल नां? याची धास्ती होती खरंतर थोडी. पण सगळ्या भाग घेतलेल्या संयुक्तांनी ती भिती व्यर्थ ठरवली. स्मित त्यांचा उत्साह बघून आम्हांलाही हुरूप आला. या गेट-टुगेदर नंतर असं गेट-टुगेदर पुढेही करत राहू असा रिस्पॉन्स जवळपास सगळ्याच संयुक्तांकडून आला. त्यांच्या या सुचनेचा विचार नक्की करणार आणि पुढचं गेट-टुगेदर अजून थोडं टार्गेट वाढवून करणार म्हणजे त्या निमित्ताने सगळ्यांचा नियमित सराव चालू राहील.
उत्साहाने भाग घेऊन हे गेट-टुगेदर यशस्वी केल्याबद्दल संयुक्तातील सगळ्याच मैत्रिणींचे मनापासून आभार. तुम्ही नसतात तर आम्हांला इतका उत्साह आला ही नसता. स्मित त्यामुळे हे अश्या प्रकारचं गेट-टुगेदर ठरवण्याची कल्पना आणि प्लॅनिंग आमचं असलं तरी ती कल्पना प्रत्यक्षात उतरली ती सगळ्या संयुक्तांच्या सक्रिय आणि शिस्तबद्ध सहभागामुळेच!

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

प्रवास - एक वर्ष आणि दहा किलो मीटर रेसचा


जानेवारी २०१३ -


जुनं वर्ष संपता संपता वजनाचा आकडा वाढायला लागला होता. २०१२ मधे अधेमधेच कधी तरी केलेलं रनिंग आता २०१३ मधे अगदी मनापासून आणि नियमित करायचं ठरवलं.
आधी बरेचदा कधी खूप ऊन आहे तर कधी पाऊस आहे ह्या सबबींखाली रनिंगला दांडी मारली जायची.  ह्या सबबी नसतील तेंव्हा "कंटाळा आला" ही सबब असायचीच :) 
त्याचवेळी मियाझावा केन्जी लिखित "आमे नी मो माकेझु - काझे नी मो माकेझु......"
(雨にもまけず 風にもまけず) ही पूर्ण कविता वाचनात आली.
"मला स्वत: अशी व्यक्ती व्हायला आवडेल" असा मतितार्थ असलेल्या ह्या कवितेच्या पहिल्या दोन ओळी आहेत - "वार्‍याची तमा न बाळगणारं, पावसाला न घाबरणारं, बर्फाला, उन्हाच्या काहिलीला न डगमगणारं माझं शरीर असेल ".
ही कविता वाचनात येणं हा नियमितपणे रनिंगला जाण्याच्या अनेक दट्ट्यांपैकी एक म्हणायला हरकत नाही.

२०१२ मधे साधारण ३ ते ४ किलोमीटरचा टप्पा गाठुन झाला होता.  पण गॅप पडल्यामुळे परत सुरुवात केली ती २.५ किलोमीटर पासून.  तीन किलोमीटर सलग पळता येणं ही कितीतरी दिवस मोठी achievement वाटायची. जपानमधे बाराही महिने कुठल्याही प्रकारच्या हवामानात कुठल्याही वेळेला अनेकजण पळताना दिसतात. जॉगिंग ट्रॅक वर रोज विविध लोकं दिसायची. त्यात रोज येणारी ठराविक माणसंही असायचीच. विशेषतः म्हातारी माणसं. त्यांच्या चालण्या/धावण्याच्या स्पीड मधला नियमितपणा, रोजच्या येण्यामधला नियमितपणा पाहुन सतत स्वतःला motivate करत राहिले.


शैलेशनी दिलेल्या एका रनरच्या ब्लॉगवर वाचनात आलं की "there is no such thing as bad weather, just bad clothes". ह्या वाक्यामुळे "आमे नी मो माकेझु - काझे नी मो माकेझु" वर जास्त focus करता आलं. आता रनिंगला जाण्यात बर्‍यापैकी नियमितपणा आला होता. मग नवीन शूज, सिझन प्रमाणे कपडे ह्याची खरेदी वाढायला लागली.
आता हळुहळू जास्त अंतर धावता यायला लागलं होतं. फेब्रुवारी मधे पहिल्यांदा ५ किलोमीटरचा पल्ला गाठला आणि मार्चच्या पहिला आठवड्यात ६ किलोमीटरचा!
एकदा ६ किलोमीटर केल्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस धाडस करुन ८ किलोमीटर रनिंग झालं. २ महिन्यांपूर्वी माझ्यासाठी ही केवळ अशक्य गोष्ट होती.  एकदा इतकं अंतर केल्यानंतर खूपच confidence आला. आता पुढच्या वर्षी कधीतरी १० किलोमीटरच्या रेस मधे भाग घेता येईल अशी अंधुकशी शक्यता आता वाटायला लागली होती.

एप्रिल २०१३ -
२०१२ मधे हेमंत आणि शैलेशनी यामानाशी प्रिफेक्चर मधे "कात्सुनुमा" ह्या ठिकाणी होणार्‍या फ्रुट्स मॅरेथॉन मधे भाग घेतला होता. तिथेच १० कि.मी. च्या रेसही असतात असं कळलं. मग येत्या ऑक्टोबर मधे त्यामधे भाग घेण्यासाठी प्रयत्न सुरु करावेत का, असा विचार सुरु झाला.
आणि एक दिवस पावसात पळायला गेलेलं असताना ४ किलोमीटर पळुन झाल्यावर अचानक डावा पाय दुखायला लागला. तसंच हळुहळु अजुन एक किलोमीटर अंतर गेले. पाय खूपच दुखायला लागला होता. त्यानंतर एक दिवस आराम केला आणि परत दुसर्‍या दिवशी धावायला गेले. पण........ अजिबातच २ पावलंही पुढे धावायला जमेना. शेवटी २ दिवस ५-५ किलोमीटर चालायचं ठरवलं. दुखणं सहन होईनासं झालं तेंव्हा डॉक्टर गाठला. डॉक्टरांनी किमान महिनाभरची सक्तीची विश्रांती सांगितली. त्यामुळे रनिंग तर सोडाच, कुठे बाहेर येण्याजाण्यावरही बंदी आली.
मग पाय बरा झाल्यानंतर हळुहळू चालायला सुरुवात केली. धावण्याचा आत्मविश्वास परत येईपर्यंत जवळजवळ महिना गेला. 

जुलै २०१३ ते सप्टेंबर २०१३-
२४ जूनला कात्सुनुमा फ्रुट्स मॅरेथॉनच्या entries सुरु झाल्या.  ह्या वर्षीची रेसची तारीख २० ऑक्टोबर होती. पहिल्याच दिवशी उत्साहानी entry केली. मी १०के साठी दिली आणि हेमंत आणि शैलेशनी हाफ मॅरेथॉनसाठी. आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात कमरेत उसण भरली. ह्या दुखण्यानी पण जवळ जवळ तीन आठवडे खाल्ले. आता कात्सुनुमा मधे पळणं शक्य होईल असं वाटेना.  तीन आठवड्यांनी पुन्हा नव्यानी सुरुवात केली. स्वत:ला motivate करत सराव सुरु केला.
सप्टेंबर मधे घराचं शिफ्टिंग केलं त्यात परत २ आठवडे सुट्टी झाली. जुलै ते सप्टेंबर मधे ७ किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची प्रॅक्टिस झाली नव्हती त्यामुळे टेन्शन वाढायला लागलं.
आता शेवटचा एक महिना कोणतीही दुखापत होऊ न देता धावायचं असं मनाला पक्कं बजावलं.
महिन्याभरात २ वेळा १० किलोमीटरची practice करुन झाली आणि आपण नक्कीच ही रेस पूर्ण करु शकतो असा आत्मविश्वासही आला.  मात्र ऐन रेसच्या दिवशीचं टेन्शन होतंच. नेमकी त्यादिवशी काही दुखापत होणार नाही ना, ही भीती मनात होतीच.

ऑक्टोबर २०१३ -
 १९ ऑक्टोबरला म्हणजे रेसच्या आदल्या दिवशी आम्ही सगळे सहाजणं कात्सुनुमाला रवाना झालो. २ वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी म्हणुन ह्या भागात आलो होतो. तेंव्हा "शिझेन-गाक्को" मधे राहिलो होतो, तिथेच ह्यावेळी राहिलो.
आदल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजताच जेवणाची वेळ होती.  भात-मासे-मिसो सूप असं अगदी टिपिकल जपानी जेवण होतं.
दुसर्‍या दिवशी म्हणजे २० तारखेला सकाळी ब्रेकफास्टची वेळ ६.३० होती. त्यामुळे रेसच्या आधी ३ तास जपानी ब्रेकफास्ट करुन तयार होतो.  आदल्या रात्री पासून मस्त पाऊस पडत होता. एप्रिल मधल्या पावसातल्या पळण्यानी झालेल्या दुखापतीची आठवण होऊन पुन्हा धडधडायला लागलं. ७.३० ला "शिझेन गाक्को" मधुन प्रस्थान केलं आणि नेमुन दिलेल्या पार्किंग लॉट मधे गाडी लावली. पार्किंग लॉट म्हणजे खरं तर द्राक्षांच्या मळेच होते. द्राक्षाच्या मांडवाखालची रिकामी जागा स्पर्धकांच्या गाड्यांसाठी तात्पुरती राखुन ठेवली होती.
इतक्या पावसातही स्पर्धकांचा उत्साह, आणि आयोजकांची शिस्त वाखाणण्यासारखी होती. बुथ वर जाऊन नंबरचं बिब घेतलं. ते लावुन toilet च्या लांबलचक रांगेत जाऊन उभी राहिले. घड्याळाचे काटे ज्या वेगानी पुढे पुढे सरकत होते तितक्याच संथ गतीनी ती रांग पुढे सरकत होती. या रांगेत उभं राहुनच stretching केलं.  toilet पासून चालत साधारण १० मिनिटाच्या अंतरावर १०के ची स्टार्ट लाईन होती. कसंबसं पळतच  स्टार्ट लाईन गाठली. इतकं ऐनवेळी धावत पळत गेल्यावर स्थिर व्हायला तर वेळ मिळाला नाहीच पण इतक्या गर्दी मधे स्टार्ट लाईन पासून बराच मागे नंबर लागला.  ह्या सगळ्यामुळे टेन्शनचा पारा अगदी वर गेला होता :)
आयपॉड वर गाणी सुरु झाली. एरवी रनिंगसाठी म्हणुन खास उडत्या चालीची गाणी असतात. पण ह्यावेळी playlist मधे थोडे बदल करुन सुरुवातीला "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा....", "उड जायेगा..." आणि "अवघा रंग एक झाला..." ही गाणी सुरुवातीला टाकली होती. आणि ह्या गाण्यांचा अपेक्षित परिणाम होऊन आलेलं टेन्शन कधी गेलं हे कळलंच नाही :) आता आजुबाजुच्या वातावरणाकडे लक्ष जायला लागलं. मस्त रिमझिम पाउस पडत होता. आजुबाजुचे द्राक्षांचे मळे आणि वाइनरीज बघत धावणं हा खरोखरच नयनरम्य अनुभव होता. ज्यांना काही records करायची होती, ती सगळी लोकं वेळेत जाऊन स्टार्ट लाईनला थांबली होती. त्यामुळे तसा लोंढा केंव्हाच पुढे गेला होता. बाकी माझ्या सारखी असंख्य मंडळी सगळा परिसर मनमुराद बघत बघत धावत होती. तितक्यात माझ्यापुढे मला २ माणसं एकमेकांचे हात धरुन (दोरीनी बांधलेले) पळताना दिसली. नंतर कळलं की त्यातला एक जण अंध आहे, आणि त्यानी रेसमधे भाग घेतलाय. त्यामुळे बरोबरचा माणुस त्याचा दिशादर्शक आहे. ह्या माणसाला बघुन मला आत्तापर्यंत मी केलेला व्यायामाचा कंटाळा आठवला आणि लाज वाटली. एव्हाना आता हाफ मॅरेथॉन सुरु झाली होती. तितक्यात मागुन सुचना आली की पट्टीचे रनर्स आता वेगात जातील. त्यामुळे १०के वाल्यांनी डाव्या बाजुने धावा. आणि पुढच्या ५ मिनिटातच बंदुकीतुन गोळी जावी तसे ते top runners सटासट आमच्या उजव्या बाजुने पुढे गेले. मला आठवलं प्राथमिक शाळेत असताना हायस्कुलच्या ताया टेचात शेजारुन गेल्या की आम्ही मंत्रमुग्ध होऊन बघत रहायचो. तसंच ह्या रनर्स कडे काही वेळ बघत राहिलो :)
कात्सुनुमाचे सगळे रस्ते चढ-उतारांचे आहेत. इतक्या चढावर मी आतापर्यंत कधीच धावले नव्हते. त्यामुळे चांगलचाच दम लागला आणि वेगही मंदावला. 
इतक्या पावसात कात्सुनुमाचे रहिवासी सगळ्यांना प्रोत्साहन द्यायला आले होते. लहानांपासून अगदी कमरेत वाकलेल्या आजी-आजोबांचं "गांबारे~~ गांबारे" ऐकुन मस्त वाटत होतं. जिथे खूपच चढावर आम्ही अगदी ढपुन जात होतो तिथे ही माणसं "अजुन ३०० मीटरच चढ राहिलाय, मग उतार आहे...." असं सांगत होती. 
शेवटी एकदाचे सगळे चढ संपले आणि मस्त उतार सुरु झाला.  ९ किलोमीटरचा बोर्ड पाहिला आणि जीवात जीव आला. शेवटचा एक किलोमीटर पूर्ण सपाट रस्ता होता. शेवटी १ तास १६ मिनिटात फिनिशलाईन वर पाय ठेवला :) म्हणजे नेहमीपेक्षा ६ मिनिटं कमी लागली होती.
आपण अगदीच शेवटचे येऊ नये, आपल्या नंतर निदान चार तरी लोक असावेत असं वाटत होतं. १०८२ लोकांमधे ६११ वा नंबर आला. सर्टिफिकेट बरोबर वाइन ची बाटली आणि द्राक्षाचे घड बक्षिस मिळाले. खर्‍या अर्थानी स्वमेहनतीची द्राक्ष आणि वाईन म्हणता येईल ह्याला :)

जानेवारी २०१४ 
ह्या पहिल्या रेसच्या आनंदाचा भर जरा ओसरल्यावर पुन्हा एकदा "रननेट"च्या साइट वर जाऊन तोक्यो भागातच काही १०के च्या रेस आहेत का ह्याचा शोध घेतला. आणि १ जानेवारीच्या सकाळी १०के ची रेस "तामागावा" च्या काठावरच आहे असं कळलं. तिथे लहान मुलांसाठी पण २ किलोमीटरची रेस होती. मग अवनीचं नाव २के आणि माझं १०के साठी दिलं. ३१ डिसेंबरला पार्टी करुन उशिरा झोपुन १ जानेवारीला उशिरा उठणं ह्यापेक्षा मला ह्या रेसची कल्पना खूपच आवडली (यामुळे घरातल्या बाकी लोकांना पार्टी नाही करता आली, त्यामुळे ही कल्पना त्यांना नसावी तितकी पसंत ;) ) १ तारखेला सकाळी ७ वाजता मी, हेमंत आणि अवनी निघालो. नवीन वर्षाची अशी उत्साहात सुरुवात करणारी गर्दी बघुन मस्त वाटलं :) 
मात्र ह्या रेसमधे माझ्या समजुतीचा थोडा घोटाळाच झाला. रेसची जी वेळ, म्हणजे सकाळी १०:००, सांगितली होती ती फक्त लहान मुलं आणि पुरुष गटाची होती. महिला गटाची वेळ सकाळी ११.३० होती. आता इतक्या सकाळपासून इथे येऊन ११.३० पर्यंत नुसतंच बसुन राहण्यात काहीच राम वाटेना. शेवटी पुरुष गटात पळणं म्हणजे फक्त तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही, पण पळायला परवानगी नाहीच असं नाही, हे शेवटच्या क्षणाला कळलं. आणि सगळे पुरुष मेंबर्स पळायला लागल्यावर मी देखील मागुन सामील झाले.
सगळे एकसे एक पट्टीचे रनर्स होते. आणि त्यात मी शेवटी पळायला सुरुवात केलेली. पहिला किलोमीटर जीव खाऊन धावले. घड्याळानी वेळ दाखवली ५ मि. ५५ सेकंद :) स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना! मग पुन्हा एकदा उत्साह संचारला आणि ही रेस १ तास ५ मिनिटात पूर्ण केली. म्हणजे आधीच्या रेसपेक्षा तब्बल ११ मिनिटांची प्रगती :)



नियमित रनिंगला सुरुवात केली तेंव्हा ऐन शिशिरातली थंडी होती. तेंव्हा बागेत, नदीकाठी सगळीकडे फक्त निष्पर्ण झाडंच होती. मग रोज ती झाडं आकाशाच्या छटा जशा असतील त्याप्रमाणे वेगवेगळी दिसायची. ज्यावेळी आपल्याला आता सलग पाऊण तास रनिंग करता येतं हे उमगलं, त्याचवेळी अचानक एक दिवस त्याच झाडांमधल्या एका प्लमला अचानक गुलाबी बहर आलेला दिसला. रांगेतली सगळी झाडं निष्पर्ण आणि हे एखादंच फुललेलं झाड दिमाखात उभं असायचं. मग ते झाड आता सारखं बघता यावं म्हणुन रनिंगला दांड्या मारणंही कमी झालं. हळुहळू वसंत ऋतु आला. भोवतालची साकुराची झाडं पूर्ण बहरली. बाकी झाडं हिरव्या पानांनी सजली. दिवसाची सुरुवात अशी साकुराच्या झाडांखालुन आणि वेगवेगळ्या रंगांचे फुलांचे ताटवे बघत करताना फारच भारी वाटायचं. स्वतःच्या रनिंग मधल्या प्रगतीचं  हे प्रतिबिंब की ह्या निसर्गाच्या किमयेमुळे स्वतःमधे हा प्रगतीच्या दिशेनी बदल झालाय हा विचार सारखा डोक्यात यायचा.  उन्हाळ्यात सकाळी ६.३० चं ऊन पण सहन होईनासं झालं. मग तेव्हा फक्त संध्याकाळी रनिंग केलं. पुढे हवेत गारवा यायला लागला आणि हेमंतऋतुची रंगांची उधळण पानांवर झाली.  निसर्गातला हा बदल रोजच्या रोज टिपताना एक वेगळाच आनंद मिळायला लागला. ह्याआधी कदाचित मी निसर्गातले हे बदल इतक्या जवळुन, इतक्या नियमितपणे कधीच टिपले नसतील.
मग जानेवारीची दुसरी १०के रेस आली तोवर "शिशिरऋतुच्या पुनरागमने" झाडाचं एकेक पान परत गळायला लागलं होतं. वर्षाचं एक चक्र पूर्ण झालं. आणि आता ह्या रनिंगच्या चक्रात मी स्वतःहुन पूर्ण अडकुन गेल्ये.

माझ्या रनिंगच्या ह्या वर्षभराच्या सगळ्या प्रवासाची UAE मधुन मेघना ऑनलाइन साक्षीदार होती आणि ऑनलाइन भागीदार देखील. आम्ही गेले वर्षभर एकमेकीना motivate करत राहिलो. जमेल तसं वेगळ्या टाइम झोन मधे असुन सुद्धा वेळ ठरवुन एकाच वेळी रनिंगही केलं. ही ब्लॉगपोस्ट पण ती मागे लागली नसती तर कदचित लिहुन झाली नसती. थँक्स मेघना! :)