पुस्तकाचं नाव : लीझ माइटनर
लेखिका : वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन, पुणे
पृ. सं. : ११६
किंमत : रुपये १००/-
लेखिका : वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन, पुणे
पृ. सं. : ११६
किंमत : रुपये १००/-
मागच्या वर्षीच्या भारतभेटीत जेंव्हा पुस्तकं घ्यायला गेले तेंव्हा वीणा गवाणकरांचं "लीझ माइटनर" हे पुस्तक दिसलं. सांगायला लाज वाटते, पण तेंव्हा लीझ माइटनर ह्या व्यक्तीविषयी मला काहीही माहिती नव्हती. केवळ वीणा गवाणकरांचं पुस्तक म्हणजे ते चांगलं आणि हटके विषयावर असणार ह्या खात्रीनी मी ते घेतलं.
-------
लीझ माइटनर - थोडक्यात सांगायचं तर विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ भौतिक शास्त्रज्ञ. हिनं किरणोत्सर्ग आणि अणुगर्भ विज्ञानात पायाभूत संशोधन केलं. १९२४ ते १९४८ ह्या काळात एकदा, दोनदा नाही तर तब्बल पंधरा वेळा नामांकन होवुनही जिला नोबेल पुरस्कार मिळाला नाही, अशी ही शास्त्रज्ञ.
-------
७ नोव्हेंबर १८७८ रोजी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथे एका ज्यू कुटुंबात लीझ माइटनरचा जन्म झाला. लीझचं शालेय शिक्षण चालू असतानाच्या काळात ऑस्ट्रियामधे स्त्रियांनी विद्यापीठात शिक्षण घेण्यावर कायद्याने बंदी होती. ऑस्ट्रियन मुलींना वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंतच तिथल्या पब्लिक स्कूल मधे शिकता येई. त्याप्रमाणे लीझचं शिक्षणही चौदाव्या वर्षी थांबलं.
१८९७ साली ऑस्ट्रियामधे स्त्रियांना उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. लीझनं १८९९ मधे विद्यापीठ प्रवेशाला पात्र ठरवणार्या "मॅच्युरा" परिक्षेची तयारी सुरु केली. १९०१ मधे म्हणजेच वयाच्या तेवीसाव्या वर्षी ती मॅच्युरा परिक्षा उत्तीर्ण झाली. व्हिएना विद्यापीठात प्रवेश घेऊन तिनं एकाच वेळी भौतिक शास्त्र, कलन शास्त्र, रसायन शास्त्र, वनस्पती शास्त्र यांचा अभ्यास सुरु केला. वाया गेलेली सगळी वर्षं भरुन काढण्याच्या जिद्दीनी तिला झपाटुन टाकलं होतं. विद्यापीठातील प्रोफेसर एक्सनर आणि प्रोफेसर बोल्ट्झमन ह्या दोन भौतिकशास्त्रज्ञांमुळे "भौतिकशास्त्र म्हणजे बुद्धी, शक्ती, निष्ठा पणाला लावुन करायचा अभ्यास आहे, ते एक व्रत आहे" हे लीझला उमगलं.
फेब्रुवारी १९०६ मधे लीझला डॉक्टरेट मिळाली. तिच्या प्रबंधाचा विषय होता "Conduction of Heat in Inhomogeneous Solids". व्हिएन्ना विद्यापीठातून भौतिकशास्त्राची डॉक्टरेट मिळवणारी लीझ ही दुसरी स्त्री. (१९०३ साली ओल्गा स्टेंईडलरने अशी डॉक्टरेट मिळवली. पण पुढे ती त्या क्षेत्रात राहिली नाही.)
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु व्हायला अजुन अवकाश होता. म्हणुन त्या फावल्या वेळात तिनं ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ लोर्ड रॅली यांच्या प्रकाश परावर्तना संबधीच्या प्रयोगाचं स्पष्टिकरण देणारं संशोधनात्मक लिखाण केलं. याखेरीज प्रोफेसर बोल्ट्झमन यांचा कनिष्ठ सहकारी स्टिफन मेयर ह्याच्या मार्गदर्शनाखाली किरणोत्सर्गासंबधी अध्ययन आणि संशोधनात्मक काम केलं. १९०६ आणि १९०७ साली अल्फा बीटा किरणांचं प्रारण (radiation), विकिरण (scattering) ह्यात संशोधन केलं. पण तरीही भौतिकशास्त्र क्षेत्रात आपलं भवितव्य काय, ह्याचा अंदाज तिला येईना. कारण अमेरिकेत जशी शास्त्रज्ञ महिलांना वाव देणारी महाविद्यालयं होती, तशी परिस्थिती ऑस्ट्रियात नव्हती. आता व्हिएन्नामधे राहुन काही साध्य होईल असं दिसेना म्हणुन लीझनी बर्लिनला जायचं ठरवलं. १९०७ साली बर्लीन मधल्या विद्यापीठात लीझनं पाऊल टाकलं खरं, पण जर्मनीतील समाज धारणा अजुनही स्त्रियांनी चूल, मूल आणि चर्च ह्या त्रिकोणातच जगावं अशीच होती. बर्लिनला आल्यावर लीझ मॅक्स प्लँक कडुन पुंजसिद्धांता (Quantum theory) विषयी अधिक माहिती मिळवु लागली.
त्यावेळी जेष्ठ ऑरगॅनिक केमिस्ट एमिल फिशर यांच्या बर्लिन मधील संस्थेत डॉ. ऑटो हान हा नावाजलेला रेडिओ केमिस्ट काम करत होता. रसायनशास्त्राची पदवी घेतल्यानंतर ऑटो हाननं "रेडिओथोरियम" हे किरणोत्सर्गी द्रव्य शोधलं होतं. त्यानंतर त्यानं "रेडिओकेमिस्ट" म्हणुनच संशोधन पार पाडायचं ठरवलं. लीझला ऑटो हानबरोबर संशोधन करण्याची संधी मिळाली. यामुळे एक रेडिओ-फिजिसिस्ट आणि एक रेडिओ-केमिस्ट एकत्र येऊन किरणोत्सर्गावर संशोधन करणार होते. परंतू एमिल फिशरनं आपल्या संस्थेत स्त्रीला प्रवेश देणं नाकारलं. शेवटी बरीच रदबदली होवुन लीझनं अन्यत्र कुठेही पाऊल न टाकता संस्थेच्या तळघरातल्या एका खोलीत काम करायचं, अशी तोड निघाली. तिनी अगदी वरच्याच मजल्यावरच्या ऑटो हानच्या प्रयोगशाळेतही पाऊल टाकायचं नाही, इतर तरुणांशी संपर्क येऊ द्यायचा नाही अशी अट होती. तळघरातल्या ह्या खोलीला प्रसाधनगृहाची सोय देखील नव्हती. तिला रस्त्यापलिकडच्या हॉटेलच्या प्रसाधनगृहाचा वापर करावा लागे.
कालांतरानी फिशरनी लीझचं कर्तृत्व मान्य केलं. त्याचा विरोध मावळला आणि त्यानं लीझवरची बंदीही उठवली. पण संस्थेतल्या इतरांच्या लेखी मात्र लीझला अस्तित्वच नव्हतं. ते लीझकडे संपूर्ण दुर्लक्ष करत (साधं अभिवादनही करत नसत). पण त्याही परिस्थितीत लीझनं आपलं काम चालूच ठेवलं. मानसिकरित्या त्रास होणार्या घटनांबरोबरच लीझला अनेक आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावं लागत होतं. एक स्त्री असल्यामुळे स्विकारलं न जाण्याची खंतही होतीच.
१९०८ ते १९१० या काळात लीझनं ऑटो हान आणि ऑटो फॉन बेयर समवेत किरणोत्सर्ग विषयक संशोधन केलं. महत्वाचे असे नऊ शास्त्रीय लेख प्रकाशित केले. ह्याच काळात तिनं किरणोत्सर्ग तपासणीसाठी "रेडिओ अॅक्टिव रिकॉइल" पद्धत शोधली. वैज्ञानिक जगतात ही पध्द्त मान्य होऊन तिचा बराच बोलबाला झाला. तिचे लेख चर्चेले, वाचले जाऊ लागले. ती एकाच वेळी बीटा प्रारणांवर, वायुरुप किर्णोत्सर्गी आयनकणांवर आणि थेरिअम वर संशोधन करत होती. पाच वर्ष ऑटो हान समवेत काम केल्यानंतर तिनं हानच्या तुलनेत एक शास्त्रज्ञ म्हणुन स्वतंत्र दर्जा, लौकीक मिळवला होता.
१९११-१२ ह्या काळात लीझ माइटनर आणि ऑटो हानचा गृप नव्यानं स्थापन झालेल्या "कायझर विल्हम्स इन्स्टिट्युट" इथे गेला. परंतू तिथेही पुन्हा स्त्री असल्यामुळे लीझला कुठलंही पद मिळालेलं नव्हतं. एक "बिनपगारी अतिथी" म्हणुनच तिला तिथे काम करावं लागलं. पुढे वर्षभरानी तिला हानच्या समदर्जाचं पद मिळालं. पण वेतन मात्र त्याच्या तुलनेत अतिशय अल्प, म्हणजे त्याच्या पगाराच्या फक्त एक पंचमांश!
पहिल्या महायुद्धाच्या काळात, म्हणजे १९१४ साली अनेक शास्त्रज्ञांप्रमाणे ऑटो हान देखील युद्ध आघाडीवर गेला. तर लीझनं क्ष-किरण परिक्षणासाठी नाव नोंदवलं. त्यानंतर ती क्ष-किरण तंत्रज्ञ परिचारिका म्हणुन ऑस्ट्रियन सैन्यात रुजु झाली. ऑक्टोबर १९१६ मधे लीझ बर्लिनला परतली. मात्र आता कायझर विल्हम्स इन्स्टिट्युट पूर्णपणे युद्धोपयोगी संशोधनात गुंतलेली असल्याचं तिच्या लक्षात आलं. कारण लष्करी संस्थेने इमारतीतले काही महत्वाचे विभाग ताब्यात घेतले होते आणि आपल्या कामासाठी त्यांना हान-माइटनर दोघांचं सहकार्य हवं होतं. लीझला युद्धोपयोगी संशोधनात गुंतायचं नव्हतं. संस्थेनी प्रस्ताव दिलेलं सवेतन उच्चपद तिनं नाकारलं. मग जानेवारी १९१७ मधे एमिल फिशरनं हान-माइटनर प्रयोगशाळेचे दोन भाग केले आणि लीझला तिचा स्वतंत्र भौतिकशास्त्र विभाग सुरु करुन दिला.
जानेवारी १९१८ मधे तिच्या आणि हानच्या पाच वर्षांच्या कष्टांचं फलित म्हणुन "अॅक्टिनियम" ह्या मूलद्रव्याचं जनक मूलद्रव्य सापडलं. त्याला नाव दिलं प्रोटॅक्टिनियम (Protactinium) Pa. बर्लिन अॅकॅडमी ऑफ सायन्स आणि ओस्टिअन अॅकॅडमी ऑफ सायन्सनं खास पुरस्कार देऊन लीझचा गौरव केला. जर्मन केमिस्ट संघानी ऑटो हानला प्रोटॅक्टिनियमच्या संशोधनासाठी "एमिल फिशर मेडल" बहाल केलं आणि त्या पदकाची फक्त प्रतिकृती लीझला दिली. प्रोटॅक्टिनियमच्या शोधासंबधी जे लेख प्रकाशित झाले, त्या सर्व लेखांवर लेखक म्हणुन ऑटो हानचं पहिलं नाव असे तर लीझचं दुसरं.
१९२० पासून लीझ आणि ऑटो हान ह्यांचे संशोधनाचे मार्ग वेगळे झाले.
बीटा आणि गॅमा वर्णपटातील संशोधनानं तिला प्रयोगवादी भौतिकशास्त्रज्ञांच्या प्रथम श्रेणीत नेऊन बसवलं. तिच्या संस्थेला आंतरराष्ट्रीय लौकीक मिळवुन देण्यास तिचं संशोधन कारणीभूत ठरलं.
१९२२ साली बर्लिन विद्यापीठानं तिला अध्यापक पद दिलं. हा दर्जा मिळवणारी ती जर्मनीतली दुसरी स्त्री. १९२६ मधे पदोन्नती होऊन ती जर्मनीतली भौतिकशास्त्राची पहिली स्री प्रोफेसर झाली. एकदा विद्यापीठाच्या समारंभाच्या वेळी तिचं व्याख्यान होतं. विषय होता "The significance of Radioactivity for Cosmic Process". विद्यापीठाच्या प्रकाशन विभागनं त्याचं नामकरण केलं "The significance of Radioactivity for Cosmetic Process". ही महिला शास्त्रज्ञ, ती Cosmetic Process बद्दलच बोलणार हा ठाम विश्वास!
१९३३ सालापर्यंत लीझनं बीटा-गॅमा वर्णपट, अल्फाकण, तसंच कॉस्मोलॉजी, न्युट्रॉन्स, पॉझिट्रॉन्स वगैरे अणुगर्भ विज्ञानाच्या विविधांगावर संशोधन केलं.
मात्र १९३३ मधे जर्मनीत हिटलर सत्तेवर आल्यावर अनेक ज्यू शास्त्रज्ञांना त्यागपत्र द्यावं लागलं किंवा जर्मनी सोडुन जावं लागलं. लीझनं खरंतर १९०८ मधेच ज्यू धर्म त्यागुन प्रोटेस्टंट धर्मपंथ स्विकारला होता. जर्मनीला पितृभूमी म्हणुन स्विकारलं होतं. तरी ६ सप्टेंबर १९३३ ला नात्झी सरकारनं लीझ माइटनरचा विद्यापीठीय अध्यापनाचा अधिकार काढुन घेतला. कोणत्याही सभांमधुन, चर्चासत्रांमधुन भाग घेण्यावर बंदी घालण्यात आली. अपुर्या अन्न-वस्त्र-निवार्या विषयी लीझची कधीच तक्रार नव्हती. संशोधन कार्य चालू ठेवता न येणं हीच तिच्या लेखी सगळ्यात कठोर शिक्षा होती. १९३६ पर्यंत तिचं नावही सगळीकडुन पुसलं गेलं. आपल्याला आता जर्मनीमधे राहता येणं अवघड आहे हे लक्षात आल्यावर अखेर अनेक अडचणींवर मात करत, पलायन करुन ती हॉलंडला आणि नंतर स्वीडनला गेली. १९०७ मधे लीझ माइटनर जर्मनीत आली होती ती एक गरीब विद्यार्थिनी म्हणून. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची भौतिकशास्त्रज्ञ, अणुगर्भ वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळाल्यावर ३१ वर्षांनी ती जर्मनी सोडत होती. सप्टेंबर १९३८ मधे ती स्टॉकहोममधे सीगबानच्या संस्थेत रुजु झाली.
अणुविखंडनाचे (Nuclear Fission) प्रयोग :
इकडे बर्लिनमधे ऑटो हान आणि फ्रिटझ स्ट्रासमन हे दोघे अणुविखंडनाच्या प्रयोगात जुंपले होते. राजकीय परिस्थितीमुळे लीझला त्यात प्रत्यक्ष सहभाग घेता येत नव्हता. तरीदेखील पत्रव्यवहारातुन ती सतत ह्या प्रयोगात गुंतली होती. अणुकेंद्राचं विखंडन होऊ शकतं, हे सर्वप्रथम लीझनं ओळखलं. ते कसं आणि का होतं त्याचं स्पष्टीकरणही सर्वप्रथम तिनीच दिलं. परंतू ह्याचं श्रेय मात्र ऑटो हान जाहीरपणे तिला देऊ शकला नाही. तिचा सहभाग अप्रत्यक्ष असल्यामुळे सर्व श्रेयापासून तिला वंचित रहावं लागलं.
अणुविखंडनामुळे भौतिकशास्त्र क्षेत्रात खळबळ उडाली होती. अमेरिकेतही अनेक शास्त्रज्ञांनी विखंडन पडताळुन घेतलं.
अणुगर्भ विज्ञानासंबधी नवीन प्रयोग करुन पहावेत तर तर लीझच्या हाताशी उपकरणं नव्हती. त्यामुळे तिच्या हाता-तोंडाशी आलेलं यश निसटुन जाई.
१९४३ साली लीझला "लॉस अॅलांओस"च्या अणुबॉम्ब निर्मिती प्रकल्पात सहभागी होण्याचं निमंत्रण मिळालं होतं. ते जर तिनं स्विकारलं असतं, तर ती पुन्हा एकदा मान्यवरांच्या प्रभावळीत झळकली असती. पण आपल्या ज्ञानाचा उपयोग अणुबॉम्ब निर्मितीसाठी करणं तिनं साफ नाकारलं. मृत्यू घडवुन आणणार्या कोणत्याही प्रकल्पात तिनं स्वत:च्या भौतिकशास्त्राच्या ज्ञानाला उपयोगात आणू दिलं नाही. ज्याच्यावर आपलं नियंत्रण उरणार नाही, अशी कुठलीही गोष्ट तिला निर्माण करायची नव्हती.
१९४३ साली अमेरिकेनी ALSOS नावाचं खास शोधपथक तयार केलं. जर्मनांची अण्वस्त्रनिर्मितीबाबत काय प्रगती आहे, तसे काही असल्यास ते प्रकल्प उध्वस्त करायचे ही मुख्य कामगिरी ह्या पथकावर होती. जर्मनीमधले शास्त्रज्ञ अण्वस्त्र तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत हे कळल्यावर लिओ झीलार्ड ह्या दोस्तराष्ट्रात आश्रय घेतलेल्या शास्त्रज्ञानी अमेरिकेनी आपलं अण्वस्त्र संशोधन गुप्त ठेवावं, असा आग्रह धरला. अमेरिकन गुप्तचर विभागातला एक एजंट जून १९४५ मधे स्टॉकहोम मधे लीझला भेटायला आला. जर्मनीतल्या विखंडन प्रकल्पाविषयी तिला कितपत माहिती आहे हे जाणण्यासाठी, तसंच ती सोविएत युनियन मधे जाणार आहे का, हे आजमवण्यासाठी तो आला होता. तो एजंट पुढे बर्लिनला जाऊन ऑटो हानला भेटणार होता. लीझनी त्याच्याकडे हान साठी एक पत्र दिलं. ह्यामधे ज्यू लोकांवरचे अत्याचार, शास्त्रज्ञांनी नात्झींसाठी केलेल्या कामाचा राग आदी गोष्टी व्यक्त झाल्या होत्या. ते पत्र हानला मिळालंच नाही. पुढे ते अमेरिकन गुप्तचर खात्याच्या दप्तरी गेलं.
६ ऑगस्ट १९४५ ला हिरोशिमावर पहिला युरेनियम अणुबॉम्ब पडला. बातमी ऐकताच लीझ सुन्न झाली. दुसर्याच दिवशीच्या एका लेखात लीझ माइटनरनं स्वत:ची कशी हिटलर पासून सुटका करुन घेतली आणि बॉम्बचं रहस्य दोस्त राष्ट्रांना पुरवलं, अशा स्वरुपाच्या कहाण्या होत्या. लीझ पुरती गोंधळुन गेली. तिला बॉम्ब बनवण्याविषयी, अमेरिका त्यात कशी यशस्वी झाली ह्याविषयी काहीही कल्पना नव्हती. युरेनियमच्या अणुविखंडनाची प्रक्रिया तिनं ओळखली होती, पण आता अणुविज्ञान कोणत्या टप्प्यावर पोचलंय ह्याचं तिला आकलन होत नव्हतं. खर्या-खोट्याचं मिश्रण होऊन दंतकथांना ऊत आला होता. लीझला "बॉम्बची ज्यू जननी" म्हणुन तिचा उल्लेख होऊ लागला. ९ ऑगस्टला दुसरा अणुबाँब नागासाकीवर पडला. त्याच रात्री एलिनॉर रुझवेल्टनं न्यूयॉर्कहून रेडिओद्वारा लीझची मुलाखत घेतली. त्यात लीझनं वारंवार स्पष्ट केलं की अण्विकशक्तीचा वापर विचारपूर्वक आणि शांततामय कार्यासाठी झाला पाहिजे.
शांततेच्या काळात, वर्णद्वेषविरहित परिस्थितीत अणुविखंडनाचा शोध लागला असता तर तो लीझ माइटनरच्या कारकीर्दीचा मुकुटमणी ठरला असता. पण तो लागला दुसर्या महायुद्धाच्या अखेरच्या टप्प्यात. आणि मग शास्त्रज्ञांनी त्याच्यावर हक्क सांगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
१९४४ साली ऑटो हानला रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्याला रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिल्याबद्दल लीझच्या मित्रपरिवाराची/पाठीराख्यांची कोणतीच तक्रार नव्हती. पण भौतिकशास्त्रक्षेत्रातला नोबेल पुरस्कार त्यावर्षी लीझ माइटनरलाच मिळायला हवा होता, असं त्यांचं आग्रहपूर्वक म्हणणं होतं. कारण युरेनियम विखंडनाच्या बाबतीत "ते कसं आणि का होतं" ह्याचं स्पष्टिकरण सर्वात आधी लीझनं दिलं होतं, भौतिकशास्त्राच्या आधारे. हानला नोबेल पुरस्कार मिळाल्यावर त्याच्यावरील लेखांमधुन लीझ माइटनरचा उल्लेख "त्याची साहाय्यक" म्हणुन होऊ लागला. हाननं जरी स्वत: कधी तिचा उल्लेख "मदतनीस" म्हणुन केला नसला तरी तशी झालेली विधानं, करुन दिली गेलेली समजूत दूर करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.
लीझ माइटनरला ऑस्ट्रिया, जर्मनी, अमेरिका आदी राष्ट्रांकडुन बाकी अनेक पुरस्कार, मानसन्मान मिळाले. पण जर्मनीनं अणुविखंडनशोधाबाबत तिला कायम काठावरचंच स्थान दिलं. ही खंत तिला शेवटपर्यंत होती.
तिच्या ९० व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी २७ ऑक्टोबर १९६८ रोजी लीझ माइटनरचा मृत्यू झाला.
१९९२ साली पीटर आर्मब्रुस्टरनी शोधुन काढलेल्या १०९ क्रमांकाच्या मूलद्रव्याला तिचं नाव दिलं गेलं meitnerium (Mt).
------------------------------------
माझं आणि शास्त्राचं, खास करुन भौतिकशास्त्राचं, कधीच सख्य नव्हतं. त्यामुळे पुस्तकातले अनेकसे संदर्भ, लीझ माइटरनी मांडलेली गणितं, तिनी बांधलेले आडाखे हे थोडंसं डोक्यावरुन गेलं. पण तरीही पुस्तक वाचताना ते समजल्या वाचुन तसं अडलं नाही.
लीझ माइटनरची हुशारी, तिनं केलेलं संशोधन कार्य, नंतर कुटुंबापासून तिची झालेली ताटातुट, तिनं झेललेली आर्थिक संकटं, तिला करावं लागलेलं देशांतर, ऑटो हाननी तिच्या समवेत तीस वर्ष केलेल्या संशोधन कामाविषयी नंतर नंतर केलेला अनुल्लेख, नोबेल पुरस्कारापासून वंचित राहणं, तिला तिच्या संशोधनाचं योग्य श्रेय न मिळणं, युरेनियमचं विखंडन, अणुबॉम्ब करण्यासाठी शास्त्रज्ञांमधे चाललेली अहम-अहमिका, जर्मनीमधे ज्यूंवरचे अत्याचार, ह्या सगळ्याविषयी पुस्तकात बरंच सविस्तर वर्णन दिलं आहे. लीझच्या आयुष्यात घडलेल्या अनेकानेक घटना इतक्या गुंतागुंतीच्या आणि वेगवान आहेत, की ह्या छोट्याश्या पुस्तकात त्या अक्षरश: झंझावातासारख्या समोर येत राहतात. उपेक्षा-अपमान आणि मानसन्मान-कौतुक हे ऋतुचक्र तिच्या आयुष्यात सतत फिरतच राहिलं. त्या सगळ्याचाच आढावा मला नाही घेता आलेला. (आणि ते एक प्रकारे बरंही झालं असं वाटलं. कारण मग बाकीच्यांना हे पुस्तक वाचताना त्यातली रंगत कमी झाली असं वाटु शकलं असतं.)
एक प्रश्न सारखा पडतो की लीझ माइटनरला एक शास्त्रज्ञ म्हणुन, देशांतरीत म्हणुन बराच संघर्ष करावा लागला. पण तिचा हा संघर्ष जर ती स्त्री नसती तर कित्येक पटींनी कमी झाला असता का? एक शास्त्रज्ञ म्हणुन स्वत:ला सिद्ध करताना तिला इतकं झगडावं लागलं असतं का? म्हणजे अगदी एमिल फिशर आणि मॅक्स प्लँक सारख्या शास्त्रज्ञांकडुनही आधी "तू एक स्त्री आहेस" अशा उपेक्षेला सामोरं जावं लागलं. खरं तर लीझ माइटनर ही साधारण मादाम मेरी क्युरीच्याच काळातली. मेरी क्युरी पेक्षा ११ वर्षांनी लहान. आईन्स्टाईन तर तिला "अवर मादाम क्युरी" म्हणे. मग स्री असुनही मेरी क्युरीला विज्ञान जगतात मिळालेलं यश, तिला मिळालेली मान्यता ह्या दुसर्या मेरी क्युरीच्या वाट्याला संघर्षानंतरही का येऊ नये?
ह्या पुस्तकावर लिहायला घेतलं आणि योगायोग लक्षात आला की लीझ माइटनर म्हणजे एक अणुशास्त्रज्ञ. जिला आपल्या ज्ञानाचा, संशोधनाचा उपयोग कधीही विध्वंसक कार्यासाठी करायचा नव्हता. तिच्या ध्यानीमनी नसताना अणूर्जेचा पहिला वाईट वापर केला गेला तो जपानवर. त्या घटनेला नुकतीच ६६ वर्षं पूर्ण झाली. आणि आजच म्हणजे १५ ऑगस्ट २०११ ला जपाननी शरणागती पत्करल्यावर हे विनाशकारी युद्ध संपुन ६६ वर्षं झाली. तसंच आत्तादेखील फुकुशिमा प्लँट्मुळे पुन्हा एकदा जपानला किरणोत्सर्गाच्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतय. आणि जपानमधेच बसुन मी लीझ माइटनर आणि अणुविखंडनातलं तिचं योगदान ह्याविषयी लिहित्ये. किरणोत्सर्ग आणि अणुगर्भाशी तिचं नातं अतुटच असावं.
-------------------------------
डॉ. रुथ लेविन साइम ह्या रसायन शास्त्रज्ञ लेखिकेने लीझ माइटनरचा पत्रव्यवहार, संशोधना संबधीचे पुरावे, दैनंदिनी, अनेक ग्रंथ, मुलाखती, खाजगी पत्र ह्यांच्या आधारानी संशोधन केलं आणि त्यातुन चरित्रग्रंथ लिहिला "Lise Meitner, a life in physics". ह्यातुनच काळाच्या उदरात गडप झालेला लिझ माइटनर विषयीचा अमुल्य ठेवा जगाच्या हाती लागला. वीणाताईंनी मुख्यत्वेकरुन ह्याच ग्रंथाच्या आधारे त्यांचं हे पुस्तक लिहिलय.
-------------------------------

