मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

गांबारोऽ निप्पोन!

११ मार्च २०११ - शुक्रवार. दिवस नेहमीसारखाच उजाडला. सकाळपासून हवा मस्त होती. आज अवनीला ट्रेन ऐवजी स्वत:च्या सायकलवरुन शाळेत जायचं होतं. त्यामुळे सकाळी दोघी आपापल्या सायकलवरून गेलो. आता दुपारी पण तिला आणायला जावं लागणार, ह्या कल्पनेने नाही म्हटलं तरी जरा कंटाळाच आला होता.

दुपारी २.४५ च्या सुमाराला घाईघाईने निघाले. तेवढ्यात अचानक आभाळ भरुन यायला लागलं. हवामान खात्याचा अंदाज चुकून अचानक पाऊस पडणार की काय ही चिंता आणि निघायला झालेला उशीर, ह्यामुळे जरा जोरातच सायकल मारायला लागले. सिग्नलला थांबले आणि अचानक वाटायला लागलं की मला चक्कर येतेय आणि मी सायकल वरून खाली पडणार. समोरचा सिग्नल, झाडं, इमारती सगळंच हलताना दिसायला लागलं. एवढंच काय, तर मागच्या बागेत इतका वेळ निवांत बसलेली मांजरंसुद्धा सैरावैरा पळत सुटली. क्षणभराने जाणवलं, ही चक्कर नाही, हा भूकंप होतोय. असेल नेहमी सारखाच साधा भूकंप, म्हणून आधी दुर्लक्ष केलं पण हलण्याचा जोर वाढतच चालला होता. इतका की मी घाबरून हातातली सायकल रस्त्यावर आडवी केली आणि एका ठिकाणी उभी राहिले. कधी नव्हे ती आजूबाजूच्या इमारतींमधून माणसं बाहेर पडली, रस्त्यावरून जाणारी वाहनं थांबली. भूकंपाचा इतका मोठा हादरा गेल्या ११ वर्षात पहिल्यांदाच अनुभवत होते. हादरे कमी कमी होत थांबले असं वाटल्यावर पुन्हा सायकल उचलून शाळेत निघाले.

अवनीच्या शाळेची इमारत तशी जुनी आहे त्यामुळे शाळेतली सगळी मुलं सुखरूप असतील ना, हा विचार सारखा मनात येत होता. शक्य तितकी जोरात सायकल चालवत शाळेत पोचले. पहिला धक्का बसल्यानंतर लगेच सगळ्या मुलांना आपापली Disaster hoods डोक्यावर घेऊन वर्गांमधून शाळेच्या मैदानावर आणून बसवलं होतं. सगळेच जण घाबरून गेले होते. अवनीजवळ गेले आणि लक्षात आलं की पुन्हा एकदा सगळं हादरतय. असं चार पाच वेळा झालं. समोर शाळेची इमारतही अगदी झुलताना दिसत होती. फोनचं नेटवर्क बंद झाल्यामुळे आम्ही दोघी सोडून बाकी सगळे कसे आहेत हे कळतच नव्हतं. थोड्यावेळानी आयफोनवरून अगदी थोड्या वेळासाठी इ-मेलला लॉग-इन होता आलं. पण निदान तेवढ्यात घरचे सगळे सुरक्षित आहेत हे तरी कळलं.

साधारण दीड तास तसेच शाळेत बसून राहिलो. मुलांना गडबडीने वर्गातून मैदानात आणल्यामुळे जॅकेट्स, टोप्या सगळं काही वर्गातच होतं. त्यामुळे त्यांना थंडी वाजायला लागली. आता हळूहळू अंधार पडायला लागल्यावर थंडी अजूनच वाढेल, दुपारनंतर अचानक भरुन आलेलं आभाळ कधीही कोसळायला लागेल ह्याची चिंता वाटायला लागली. भूकंपामुळे सगळ्या लोकल गाड्या थांबवल्याचं कळलं. शाळेने पालक बरोबर असतील तरच मुलांना घरी जायची परवानगी दिली. (दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजता शेवटचा विद्यार्थी घरी जाईपर्यंत शिक्षक शाळेतच होते.) आम्ही दोघींच्या सायकली शाळेतच ठेवल्या आणि मिळेल त्या वाहनाने घरी जायचा निर्णय घेतला. रस्त्यावर आलो तर एकही टॅक्सी रिकामी दिसेना. शेवटी घरापर्यंत चालतच गेलो. चालता चालता एकीकडे टॅक्सी मिळते का, कोणाला फोन लागतोय का ह्याची चाचपणी आणि विरुद्ध दिशेने शाळेत निघालेल्या पालकांना शाळेत सगळं ठीक असल्याचं सांगून धीर देणं हे सुरु होतं. चालतानाही मधूनच बसणारे भूकंपाचे हादरे जाणवतच होते.

घरी पोचेपर्यंत पाऊण तास लागला. आणि पोचल्यावर टीव्हीवर बघितला तो जपानच्या पूर्व किनार्‍याला, तोक्यो पासून ३७३ किलोमीटर अंतरावर, निसर्गाने दिलेला एक जबरदस्त हादरा! ९.० मॅग्निट्युडचा भूकंप आणि पाठोपाठ त्सुनामीचा तडाखा! एका जबरदस्त ताकदवान लाटेच्या फटकार्‍याने अगणित घरं, माणसं, जनावरं आणि वाहनं गिळंकृत केली होती, होत्याची नव्हती करुन टाकली होती. भूकंपानंतर दिलेल्या त्सुनामीच्या इशार्‍यानंतर घरातून पळून जरा उंचावर गेलेली माणसं आपली घरं, गाड्या डोळ्यासमोर वाहून जाताना बघूनसुद्धा काहीही करू शकत नव्हती. एक जहाज, काही गाड्या तर घराच्या छपरांवर गेल्या होत्या. कित्येक ठिकाणाचे रस्ते, रेल्वेचे ट्रॅक्स पाण्याखाली गेले, उद्‌ध्वस्त झाले. नकाशावरून ते गाव जवळजवळ पुसलं गेल्यासारखंच झालं होतं.

म्हणजे मी जेंव्हा, आपण अवनीला धीर देत देत इतकं अंतर चालून सुखरूप घरी आलो असा निःश्वास टाकत होते, तेंव्हा अनेक लोक ह्या त्सुनामीच्या तडाख्यापासून स्वत:चा आणि इतरांचा जीव वाचावा म्हणून आकांताने पळत सुटले होते. जेव्हा मला माझी लेक थंडी-पावसाने गारठेल, आपण लवकर घरी पोचलेलं बरं ही चिंता वाटत होती; तेंव्हा कित्येक लहान मुलांचा निवाराच कायमचा उद्‌ध्वस्त झाला होता. घरातली माणसं समोर दिसल्यावर मला जेंव्हा अत्यानंद झाला तेंव्हा अनेकांची घरं, माणसं त्यांना लाटांनी गिळंकृत करताना दिसत होती. आज लेकीने नेहमीसारखं ट्रेनने न जाता सायकलने जाण्याचा हट्ट केला, म्हणून भूकंपानंतरच्या दहाव्या मिनिटाला मी तिच्याकडे पोचू शकले म्हणून जेव्हा मी सुस्कारा टाकत होते, तेंव्हा आपले कुटुंबीय नक्की जिवंत आहेत की नाही ह्या प्रश्नाने कित्येक जण व्याकुळ झाले होते. जेंव्हा मला घरी येताना "अरे बापरे, अजून किती वेळ ट्रेन्स बंद ठेवणार? लोकांचे घरी जाताना हाल होणार!" असं वाटत होतं, तेंव्हा कित्येक ठिकाणी रेल्वेचे रुळच्या रुळच उद्‌ध्वस्त झाले होते.

मी घरी पोचले म्हणून मला वाटलेलं समाधान किती क्षुल्लक आणि क्षणिक होतं ह्याची जाणीव झाली.

तोक्योमध्ये लोक ऑफिसमधून घरी जायला बाहेर तर पडले होते. पण ट्रेन बंद, टॅक्सी आणि बसच्या प्रचंड रांगा, एरवीपेक्षा अनेक गाड्या रस्त्यावर आल्यामुळे रस्त्यावर झालेली गर्दी, ह्यामुळे अनेकांना चालत घरी जाण्यावाचून इलाज नव्हता. तोक्योमधला माणूस कामाच्या ठिकाणी सबवे आणि ट्रेनमधूनच प्रवास करतो. त्यामुळे आपल्या घराची दिशा नक्की कोणती हे बरेचदा त्यांनी रस्त्यावर येऊन बघितलेलंच नसतं. नेमकी हीच गरज लक्षात घेऊन विविध ठिकाणी काही स्वयंसेवक तोक्यो आणि उपनगराचे नकाशे घेऊन उभे राहिले होते आणि पादचार्‍यांना मार्गदर्शन करत होते. छोटीशीच कृती पण चार-पाच तासांच्या पायपिटीसाठी अनेकांना त्याची मदत झाली. आज पादचार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे त्यांना पदपथ पुरत नव्हते. मग ह्या सगळ्या गर्दीमुळे रस्त्यावर गोंधळ माजला का? तर, अजिबात नाही! दोन्ही दिशांच्या वाहनचालकांनी स्वेच्छेने आपापल्या बाजूची एकेक लेन पादचार्‍यांसाठी मोकळी करुन दिली. कुठेही आरडाओरडा नाही, धक्काबुक्की नाही की बेशिस्त वर्तन नाही!

शारीरिक आणि मानसिकरीत्या दमलेलो असूनही त्या रात्री आम्हाला झोप लागत नव्हती. एक कारण म्हणजे त्सुनामीची दुर्घटना डोळ्यासमोरून जात नव्हती आणि रात्रभर भूकंपाचे धक्के (आफ्टरशॉक्स) बसतच होते. शुक्रवारपासून पुढच्या ३ दिवसात १५० आफ्टरशॉक्स झाले आणि त्यानंतर पुढच्या दीड महिन्यात त्यांची संख्या हजारावर गेली होती.

दुसर्‍या दिवसापासून तोक्योमधील रेल्वेचं वेळापत्रक हळूहळू मार्गावर येताना दिसत होतं. आज शनिवार असल्याने शाळा आणि ऑफिसेसला सुट्टी. त्यामुळे त्या धक्क्यातून लोकांना सावरायला वेळ मिळतोय, सुट्टीचा दिवस असल्यामुळे ह्या आफ्टरशॉक्समध्येही आपापल्या कुटुंबाबरोबर राहता येतंय असा दिलासा मनाला वाटत होता. पण सकाळी ८.३० नंतर लक्षात आलं की आपला हा विचार फक्त आयटी किंवा तत्सम ठिकाणी काम करणार्‍या लोकांनाच लागू होतोय. कारण शेजारच्या इमारतीचं नूतनीकरण करणारे कामगार ट्रॉलीवर चढून त्यांचं काम करतायत, elevators चालू नसले तरी कुरिअरवाली माणसं प्रसंगी ३० मजले चढून एखादं पार्सल पोचवण्याचं काम करतायत. "ग्राहक देवो भव!" चा ह्यापेक्षा वेगळा नमुना कुठे बघायला मिळणार?

"तोक्यो स्काय ट्री" हा जगातला सर्वात उंच टि.व्ही टॉवर म्हणून ओळखला जाईल. १ मार्च २०११ ला टॉवरच्या बांधकामाने ६०० मीटर उंची गाठली होती. भूकंप झाला तेव्हा त्याची बांधणी अगदी निर्णायक टप्प्यावर आली होती. पण १२ मार्च २०११ ला पूर्वयोजनेप्रमाणे त्याच्या बांधकामाची ६२५ मीटर पर्यंत उंची गाठली गेली. आणि १८ मार्च २०११ ला ६३४ मीटरचा अंतिम टप्पा गाठून त्याचं काम पूर्ण झालं.

त्सुनामीग्रस्त भागातल्या लोकांची पर्यायी व्यवस्था तात्काळ मोठ्या शाळांमधून वगैरे केली गेली होती. पर्यायी व्यवस्था म्हणजे काय? तर त्या क्षणी त्यांच्या डोक्यावर केवळ छप्पर होतं. पहिले दोन दिवस रस्ते बंद झाल्यामुळे पुरेसं अन्नपाणी नाही, अचानक कोसळलेल्या मोठ्या प्रमाणावरच्या आपत्तीमुळे टॉयलेट्सची अपुरी व्यवस्था, हीटिंगची अपुरी सुविधा ह्या सगळ्याबद्दल कोणी साधी तक्रारही केली नाही. हे सगळं सोसणारे आपण एकटेच नाही, हा एक विचारही त्यांच्यासाठी पुरेसा होता. जे मिळेल ते सगळ्यांनी समसमान वाटून घ्यायचं. मग ते अंथरुण-पांघरुण असो की जेवण-खाण असो. एकदा तर एका evacuation center मधे जेवणाला फक्त एक केळं आणि एक स्ट्रॉबेरी इतकाच अन्नपुरवठा होऊ शकला. तर काही ठिकाणी फक्त एक ओ-निगिरी (राइसबॉल) किंवा ओ-बेन्तो (जपानी जेवणाचा डबा) किंवा कप-नूडल्स आणि पाण्याची बाटली. 'मिनामी-सानरिकु' नावाच्या ठिकाणी एका माणसाचं घर समुद्रापासून जवळ असल्यामुळे वाहून गेलं. पण त्याचं रामेनचं; म्हणजे जपानी नूडल्सचं उपाहारगृह मात्र सुरक्षित होतं. त्या माणसाने दुकानातला माल संपेपर्यंत तिथल्या शक्य तितक्या लोकांना विनामूल्य रामेन खायला दिल्या. स्वत:चं घर नष्ट झाल्यावरसुद्धा इतकं नि:स्वार्थी राहणं कसं जमू शकतं ह्या माणसांना?

नेहमीच्या आयुष्यात अतिशय शिस्तबद्ध वागणारे जपानी लोक नेहमीच पाहिले होते. पण ह्या आणीबाणीच्या प्रसंगीदेखील एकानेही आपल्यातलं माणूसपण सोडलं नाही. मग ती लहान मुलं असोत की वयोवृद्ध. तिथे सहनशीलतेला वयाची मर्यादा नव्हती. ज्यांचे आईबाबा घ्यायला येऊ शकले नाहीत अशी आठ ते बारा वयोगटातली ३० मुलं, ३ दिवस शाळेत बसून होती. "आईबाबा कधी येणार?" असं विचारून शिक्षकांना भंडावून न सोडता लायब्ररीमधली पुस्तकं वाचत, एकमेकांशी कार्डगेम्स खेळत आपापला जीव रमवत होती. कुठून आला असेल ह्या चिमुरड्यांमधे इतका पराकोटीचा समजूतदारपणा?

म्हणजे जपानी लोकांनी त्यांचं दु:ख व्यक्त केलंच नाही का? असं नक्कीच नाही. डोळ्यात पाणी निश्चितच होतं, पण त्या रडण्यात कुठेही अगतिकता नव्हती, आक्रोश नव्हता. झालेल्या हानीचं दु:ख अपरिमित होतं, पण त्यासाठी कोणालाही त्यांनी दोष दिला नाही.

उद्‌ध्वस्त भागांमध्ये स्वयंसेवक सतत झटत होते. स्वयंसेवक म्हणजे फक्त उत्साहाच्या भरात गेलेले कार्यकर्ते नव्हेत. तर सरकारी, तसंच विविध स्वयंसेवी संस्थांमधे नाव नोंदणी केलेल्या कार्यकर्त्यांच्या उभारलेल्या फळ्या. ठराविक संख्यांनी केलेले त्यांचे गट आणि त्यांना वाटून दिलेली कामं. प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेलं काम चोखपणे करायचं. मग ते चिखलातून, राडारोड्यातून एखादं घर साफ करून पूर्ववत करणं असो की evacuation center मधल्या अनेकशे माणसांसाठी स्वैंपाक करण्याचं असो. कधी नव्हे ते मार्च अर्धा संपल्यानंतरही त्या भागात बर्फ पाडून निसर्ग त्यांच्या कामात अडथळे आणत होताच. पण ह्या अडथळ्यांना भीक घालेल तो जपानी माणूस कुठला? काही ठिकाणी स्वयंसेवकांच्या मदतीला होती तीच माणसं ज्यांची घरंदारं, कुटुंब ह्या त्सुनामीच्या तडाख्यात उद्‌ध्वस्त झाली होती. साफसफाई करताना त्यातल्या एखाद्याच्या हाती कधी कुटुंबाचा चिखलात दडलेला एखादा फोटो सापडला किंवा अगदी मुलीची एखादी हेअरपिन सापडली तरी त्यांच्या लेखी तो आनंद अवर्णनीय होता.

एकीकडे चिखलात सापडलेल्या फोटोंचं नक्की काय करायचं, हे कळत नसताना काही फोटोग्राफर्स मदतीला आले. त्यांनी ते फोटो स्वच्छ करून धुवून फ्रेम करून दिले. कोणी त्या स्वच्छ फोटोंचे डिजिटल कॅमेर्‍यानी फोटो काढून ते कायमस्वरूपी डिजिटल स्वरुपात राहतील ह्याची व्यवस्था केली.

कधी कधी स्वयंसेवकांना तो परिसर बघून नैराश्य येत होतं. पण कधी त्यांना अवचित दैवी चमत्कारानं ढिगार्‍याखाली एखादं चार महिन्यांचं तान्हं बाळ जिवंत सापडलं, तर कधी नऊ दिवसांनंतर एक ८० वर्षाची आजी आणि तिचा १६ वर्षाचा नातू घरातल्या कपाटाखाली सुखरूप सापडला. तेंव्हा मात्र ते नैराश्य, ती वेदना अगदी सहज पुसली जात होती. कारण त्यांच्या तनामनात घुमत होता एकच घोष - "गांबारोऽ निप्पोन !" (सगळे जपानवासी एकजुटीने प्रयत्न करूयात - धीर न सोडता लढूयात!)

मामोरू ओकिनावा नावाचा तीस वर्षीय युवक. त्सुनामीमुळे बेपत्ता झालेल्या आपल्या बायकोला आणि सव्वा वर्षाच्या मुलीला कित्येक दिवस शोधत होता - हातात केवळ त्याचा फॅमिली फोटो आणि एक फावडं घेऊन, सतत फोटोमधल्या बायकोला, मुलीला म्हणत होता, "मला माफ करा. मी तुम्हाला शोधण्यात अपयशी ठरलोय. माझ्या नावाला मीच काळिमा फासलाय" - कारण "मामोरू" चा अर्थ आहे "रक्षण करणे".

जपानी लोकांच्या कार्यक्षमतेला दाद द्यावीशी वाटली जेंव्हा पुढच्या पाच ते सहा दिवसात खचलेले रस्ते दुरुस्त झाले. लोकांकडे रसद पोचू लागली.

ही दुर्घटना झाल्यानंतर अवघ्या पन्नास दिवसातच; म्हणजे २९ एप्रिलला तोक्योमधून आकिताला जाणारी शिनकानसेन, म्हणजेच बुलेट ट्रेन, पुन्हा चालू करण्यात आली. एरवी जपानच्या जवळजवळ सर्व भागातून दर काही मिनिटांनी ये-जा करणार्‍या ह्या शिनकानसेनचं खरं तर कोणालाच अप्रूप नाही म्हटलं तरी चालेल. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र २९ एप्रिलला आकिताला जाणारी पहिली गाडी जेंव्हा तोक्योमधून निघाली, तेंव्हा तोक्यो स्टेशनवर जमून लोकांनी तिला आनंदाने निरोप दिला. मधल्या सेनदाई स्टेशनवर आणि शेवटच्या आकिता स्टेशनवरही लोकांनी उत्साहाने गर्दी केली होती. जणू एखाद्या समारंभाला उपस्थित रहावं अशा कपड्यात स्त्री-पुरुष तिथे आले होते. अक्षरश: वाद्यांच्या आणि टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत झालं. तसंच जिथून-जिथून ती गाडी जाताना दिसते, तिथे रस्त्यांवर उभे राहून लोक आनंदाने हात हलवत गाडीचं स्वागत करत होते, शुभेच्छा देत होते. कोणाच्या हातात झेंडे होते तर कोणाच्या हातात कापडी 'कोई' मासे ('कोई' हा मासा प्रवाहाविरुद्ध पोहणारा. म्हणून जपानमधे त्याला सांस्कृतिक महत्त्व आहे), तर बर्‍याच जणांच्या हातात मोठे कापडी फलक होते ज्यावर लिहिलं होतं " गांबारोऽ निप्पोन!". हा आनंद पुन्हा एकदा अंशत: का होईना पण एक सुरळीत सुरुवात होतेय, ह्याचा होता. डोळ्यात त्या सर्वांसाठी कृतज्ञता होती, ज्यांनी शिनकानसेन ट्रॅक्सच्या अंदाजे ५०० किलोमीटरच्या विस्तारातले १२०० ठिकाणचे fault points शोधून, रात्रंदिवस राबून ते दुरुस्त केले होते.

"हायाबुसा" ही, तोक्यो-आओमोरी दरम्यान धावणारी, जपानमधली सर्वात वेगवान शिनकानसेन. भूकंपाच्या अवघ्या काही दिवस आधी म्हणजे ५ मार्चला तिचं मोठ्या जल्लोषात उद्घाटन झालं होतं. भूकंपामुळे ती ट्रेन बंद करावी लागली. आता अवघ्या सहा महिन्यात पुन्हा एकदा ही हायाबुसा धावायला लागली आहे.

त्सुनामीमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या सेन्दाई भागामधे देखील २९ एप्रिलला फुटबॉलचं स्टेडियम चालू झालं. त्या पहिल्या मॅचला २०००० लोकांनी हजेरी लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. मॅच सुरू करण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणताना कोणालाच अश्रू आवरता आले नाहीत.

जपानी शाळांमधे जुनं शैक्षणिक वर्ष मार्चमध्ये संपून एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होतं. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अगदी बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंत सगळ्यांचंच graduation असतं. विस्कटलेली घडी बसवायचीच, ह्या हेतूने आता काही आठवडे उशीरा का होईना, पण त्सुनामीग्रस्त भागातल्या शाळां-महाविद्यालयांचं graduation व्हायला सुरुवात झाली. एका गावातल्या बालवाडीचं graduation होतं, ज्याला एक जपानी आई उपस्थित होती. तिच्या दोन्ही मुली, वय सहा आणि दोन, ह्या त्सुनामीच्या तडाख्यात कुठे गेल्या होत्या ते त्सुनामीच्या लाटांनाच ठाऊक! आज तिचीही मुलगी खरं तर ह्या समारंभात graduation चा गाऊन, टोपी घालून दिमाखात उभी असायची. तरीही ती आई आज समारंभाला उपस्थित राहिली. का? तर तिचं म्हणणं की "माझी मुलगी आज असती तर मी इथे तिचं कौतुक करायला, टाळ्या वाजवायला आलेच असते ना? मग आज ती नाही म्हणून बाकीच्या चिमुरड्यांचा हा समारंभ कमी महत्त्वाचा ठरतो का?" कसं आणि कुठून आलं असेल एका सर्वसामान्य गृहिणीमध्ये हे मानसिक बळ?

दुर्घटनेनंतर अवघ्या चार महिन्यात आता तात्पुरती घरं उभारली आहेत. तात्पुरती असली तरी त्यांचा दर्जा मात्र मुळीच कमी नाहीये. काही ठिकाणी घरं बांधल्यावर आराखड्यात काही चुका आहेत असं आढळलं. चुका म्हणजे बांधकामाच्या दर्जाविषयक नाहीत, तर घरांच्या रचनेसंदर्भात. आधीच्या रचनेनुसार आजूबाजूच्या घरांशी फारसा संपर्क येत नव्हता. आधीच इथे राहणारे सगळे लोक त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर फेकले गेल्यामुळे मानसिकरित्या खचून गेले होते. त्यात काही वृद्ध एकेकटेच रहात होते. त्यांचं दुखलं-खुपलं एकमेकांना बघता यावं, त्यांना सोबत मिळावी म्हणून पुढच्या बांधणार्‍या घरांची रचना त्यांची दारं एकमेकांसमोर येतील अशी केली. घरं बांधण्याच्या जोडीने ठिकठिकाणी 'साकुरा' म्हणजे चेरीची रोपं आणि सूर्यफुलाच्या बिया लावल्या. म्हणजे पुनर्वसन करताना तिथली फुलं बघितली की लोकांच्या चेहर्‍यावर आनंद उमटेल. नागरिकांचा केलेला इतका लहानसहान विचार ह्या सरकारविषयी खूप काही सांगून जातो.

त्सुनामीच्या तडाख्यामुळे फुकुशिमाचं अणूऊर्जाकेंद्र बंद करावं लागलं. ह्या संकटामुळे आता कधी नव्हे ती वीजबचत करावी लागणार होती. खरं म्हणजे तोक्यो अजून वीजबचत क्षेत्रात आलंच नव्हतं. पण तरीही तोक्योकरांनी आपणहून उत्स्फूर्तपणे वीजबचत करण्याचा निर्णय घेतला. वीजबचत म्हणजे नक्कीच रोज चार ते सहा तास घरातली वीज जाणार, ह्यापेक्षा वेगळं काही माझ्या भारतीय मनाला सुचलंदेखील नाही. पण हळूहळू लक्षात येत गेलं की वीजबचत म्हणजे काही फक्त वीज पुरवठा बंद ठेवून कामं ठप्प करणं नाही; तर कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींमधून वीजबचत करून आपली रोजची कामं सुरळीत ठेवता येतात.

छोट्या दुकानापासून ते अगदी मोठ्या मॉल्सपर्यंत सगळीकडे रोज जितके दिवे लावलेले असत, त्यापेक्षा जवळपास निम्म्याने दिवे कमी केले. रेल्वे स्टेशन्सवरही तेच. विविध ठिकाणी असलेले escalators बंद ठेवले गेले. ज्यांना अगदीच जिने चढता येणं शक्य नाही त्यांनी elevators चा वापर करावा. रोज दर तीन ते चार मिनिटांनी धावणार्‍या लोकल गाड्या आता पाच ते सहा मिनिटांच्या अंतराने धावू लागल्या. सर्व ऑफिसेसमध्ये संध्याकाळी सहा नंतर एसी बंद करायला सुरुवात झाली.

ऑगस्ट महिना म्हणजे तोक्योमध्ये उन्हाळ्याची अगदी परिसीमा असते. त्या दिवसात विजेचा वापर सर्वाधिक होतो. त्यामुळे बर्‍याच कंपन्यांनी असा निर्णय घेतलाय की ऑगस्टमध्ये २ आठवडे सर्व कर्मचार्‍यांना सुट्टी द्यायची. ते दिवस सप्टेंबर मधले शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी भरुन द्यायचे. जेणेकरुन त्याकाळात वीजव्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊ नये. सगळ्यांच्या मनात एकच ध्यास होता "गांबारोऽ निप्पोन!" आणि अक्षरश: 'थेंबेथेंबे तळे साचे' ह्या उक्तीप्रमाणे बाकी ठिकाणी तेवढा वीज तुटवडा भासेनासा झाला.

तोशिबा, मित्सुबिशीसारख्या कंपन्यांनी ह्या काळात स्वत:च्या उत्पादनाची जाहिरात करतानाच जनजागृतीचं कामही केलं. एसीची जाहिरात करताना तापमान २४ ते २६ डिग्री ठेवलं तर कमी वीज खर्च होते हे ठसवण्याचा प्रयत्न केला; तर रेफ्रिजरेटरची जाहिरात करताना तो शक्य तितक्या कमी वेळा उघड-बंद करुन वीज वाचवा हे सांगितलं. त्याचबरोबर "पॅनासॉनिक" सारख्या कंपनीने लोकांच्या चेहर्‍यावर हसू फुलावं, आशावाद निर्माण व्हावा म्हणून भूकंपानंतर घडलेल्या सकारात्मक घटना (शिनकानसेनची, बोटींची सेवा परत सुरु झाली, मुलं पुन्हा शाळेत जाऊन हसू-खेळू लागली) एकत्र करुन त्याची सुंदर चित्रफीत तयार केली. जगाला हाच संदेश द्यायला; की "आम्ही पुन्हा आनंदाच्या दिशेने एकेक पाऊल पुढे टाकतोय"!

राखेतून उठलेल्या फिनिक्स पक्ष्याचा संदर्भ आजवर अनेकदा फक्त वाचला. खुद्द जपानच्या संदर्भातही महायुद्धातून फिनिक्स पक्षाप्रमाणे घेतलेल्या भरारीचे उल्लेख आहेत. हा पक्षी फक्त दंतकथांमधेच असतो असं म्हणतात. पण जपानला आज ह्या संकटातून बाहेर पडताना बघितलं आणि मी याची देही याची डोळा तो फिनिक्स पक्षी बघितला.

कुसुमाग्रज म्हणतात तसं,

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून फक्त ’लढ’ म्हणा”

हा दृष्टिकोनच ह्या पक्षाला राखेतून पुन्हा उभारी घेण्याची हिंमत देत असेल का?

सोमवार, २५ जुलै, २०११

लीझ माइटनर



पुस्तकाचं नाव : लीझ माइटनर
लेखिका : वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन, पुणे
पृ. सं. : ११६
किंमत : रुपये १००/-



मागच्या वर्षीच्या भारतभेटीत जेंव्हा पुस्तकं घ्यायला गेले तेंव्हा वीणा गवाणकरांचं "लीझ माइटनर" हे पुस्तक दिसलं. सांगायला लाज वाटते, पण तेंव्हा लीझ माइटनर ह्या व्यक्तीविषयी मला काहीही माहिती नव्हती. केवळ वीणा गवाणकरांचं पुस्तक म्हणजे ते चांगलं आणि हटके विषयावर असणार ह्या खात्रीनी मी ते घेतलं.

-------
लीझ माइटनर - थोडक्यात सांगायचं तर विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ भौतिक शास्त्रज्ञ. हिनं किरणोत्सर्ग आणि अणुगर्भ विज्ञानात पायाभूत संशोधन केलं. १९२४ ते १९४८ ह्या काळात एकदा, दोनदा नाही तर तब्बल पंधरा वेळा नामांकन होवुनही जिला नोबेल पुरस्कार मिळाला नाही, अशी ही शास्त्रज्ञ.
-------
७ नोव्हेंबर १८७८ रोजी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथे एका ज्यू कुटुंबात लीझ माइटनरचा जन्म झाला. लीझचं शालेय शिक्षण चालू असतानाच्या काळात ऑस्ट्रियामधे स्त्रियांनी विद्यापीठात शिक्षण घेण्यावर कायद्याने बंदी होती. ऑस्ट्रियन मुलींना वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंतच तिथल्या पब्लिक स्कूल मधे शिकता येई. त्याप्रमाणे लीझचं शिक्षणही चौदाव्या वर्षी थांबलं.
१८९७ साली ऑस्ट्रियामधे स्त्रियांना उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. लीझनं १८९९ मधे विद्यापीठ प्रवेशाला पात्र ठरवणार्‍या "मॅच्युरा" परिक्षेची तयारी सुरु केली. १९०१ मधे म्हणजेच वयाच्या तेवीसाव्या वर्षी ती मॅच्युरा परिक्षा उत्तीर्ण झाली. व्हिएना विद्यापीठात प्रवेश घेऊन तिनं एकाच वेळी भौतिक शास्त्र, कलन शास्त्र, रसायन शास्त्र, वनस्पती शास्त्र यांचा अभ्यास सुरु केला. वाया गेलेली सगळी वर्षं भरुन काढण्याच्या जिद्दीनी तिला झपाटुन टाकलं होतं. विद्यापीठातील प्रोफेसर एक्सनर आणि प्रोफेसर बोल्ट्झमन ह्या दोन भौतिकशास्त्रज्ञांमुळे "भौतिकशास्त्र म्हणजे बुद्धी, शक्ती, निष्ठा पणाला लावुन करायचा अभ्यास आहे, ते एक व्रत आहे" हे लीझला उमगलं.
फेब्रुवारी १९०६ मधे लीझला डॉक्टरेट मिळाली. तिच्या प्रबंधाचा विषय होता "Conduction of Heat in Inhomogeneous Solids". व्हिएन्ना विद्यापीठातून भौतिकशास्त्राची डॉक्टरेट मिळवणारी लीझ ही दुसरी स्त्री. (१९०३ साली ओल्गा स्टेंईडलरने अशी डॉक्टरेट मिळवली. पण पुढे ती त्या क्षेत्रात राहिली नाही.)
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु व्हायला अजुन अवकाश होता. म्हणुन त्या फावल्या वेळात तिनं ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ लोर्ड रॅली यांच्या प्रकाश परावर्तना संबधीच्या प्रयोगाचं स्पष्टिकरण देणारं संशोधनात्मक लिखाण केलं. याखेरीज प्रोफेसर बोल्ट्झमन यांचा कनिष्ठ सहकारी स्टिफन मेयर ह्याच्या मार्गदर्शनाखाली किरणोत्सर्गासंबधी अध्ययन आणि संशोधनात्मक काम केलं. १९०६ आणि १९०७ साली अल्फा बीटा किरणांचं प्रारण (radiation), विकिरण (scattering) ह्यात संशोधन केलं. पण तरीही भौतिकशास्त्र क्षेत्रात आपलं भवितव्य काय, ह्याचा अंदाज तिला येईना. कारण अमेरिकेत जशी शास्त्रज्ञ महिलांना वाव देणारी महाविद्यालयं होती, तशी परिस्थिती ऑस्ट्रियात नव्हती. आता व्हिएन्नामधे राहुन काही साध्य होईल असं दिसेना म्हणुन लीझनी बर्लिनला जायचं ठरवलं. १९०७ साली बर्लीन मधल्या विद्यापीठात लीझनं पाऊल टाकलं खरं, पण जर्मनीतील समाज धारणा अजुनही स्त्रियांनी चूल, मूल आणि चर्च ह्या त्रिकोणातच जगावं अशीच होती. बर्लिनला आल्यावर लीझ मॅक्स प्लँक कडुन पुंजसिद्धांता (Quantum theory) विषयी अधिक माहिती मिळवु लागली.
त्यावेळी जेष्ठ ऑरगॅनिक केमिस्ट एमिल फिशर यांच्या बर्लिन मधील संस्थेत डॉ. ऑटो हान हा नावाजलेला रेडिओ केमिस्ट काम करत होता. रसायनशास्त्राची पदवी घेतल्यानंतर ऑटो हाननं "रेडिओथोरियम" हे किरणोत्सर्गी द्रव्य शोधलं होतं. त्यानंतर त्यानं "रेडिओकेमिस्ट" म्हणुनच संशोधन पार पाडायचं ठरवलं. लीझला ऑटो हानबरोबर संशोधन करण्याची संधी मिळाली. यामुळे एक रेडिओ-फिजिसिस्ट आणि एक रेडिओ-केमिस्ट एकत्र येऊन किरणोत्सर्गावर संशोधन करणार होते. परंतू एमिल फिशरनं आपल्या संस्थेत स्त्रीला प्रवेश देणं नाकारलं. शेवटी बरीच रदबदली होवुन लीझनं अन्यत्र कुठेही पाऊल न टाकता संस्थेच्या तळघरातल्या एका खोलीत काम करायचं, अशी तोड निघाली. तिनी अगदी वरच्याच मजल्यावरच्या ऑटो हानच्या प्रयोगशाळेतही पाऊल टाकायचं नाही, इतर तरुणांशी संपर्क येऊ द्यायचा नाही अशी अट होती. तळघरातल्या ह्या खोलीला प्रसाधनगृहाची सोय देखील नव्हती. तिला रस्त्यापलिकडच्या हॉटेलच्या प्रसाधनगृहाचा वापर करावा लागे.
कालांतरानी फिशरनी लीझचं कर्तृत्व मान्य केलं. त्याचा विरोध मावळला आणि त्यानं लीझवरची बंदीही उठवली. पण संस्थेतल्या इतरांच्या लेखी मात्र लीझला अस्तित्वच नव्हतं. ते लीझकडे संपूर्ण दुर्लक्ष करत (साधं अभिवादनही करत नसत). पण त्याही परिस्थितीत लीझनं आपलं काम चालूच ठेवलं. मानसिकरित्या त्रास होणार्‍या घटनांबरोबरच लीझला अनेक आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावं लागत होतं. एक स्त्री असल्यामुळे स्विकारलं न जाण्याची खंतही होतीच.
१९०८ ते १९१० या काळात लीझनं ऑटो हान आणि ऑटो फॉन बेयर समवेत किरणोत्सर्ग विषयक संशोधन केलं. महत्वाचे असे नऊ शास्त्रीय लेख प्रकाशित केले. ह्याच काळात तिनं किरणोत्सर्ग तपासणीसाठी "रेडिओ अ‍ॅक्टिव रिकॉइल" पद्धत शोधली. वैज्ञानिक जगतात ही पध्द्त मान्य होऊन तिचा बराच बोलबाला झाला. तिचे लेख चर्चेले, वाचले जाऊ लागले. ती एकाच वेळी बीटा प्रारणांवर, वायुरुप किर्णोत्सर्गी आयनकणांवर आणि थेरिअम वर संशोधन करत होती. पाच वर्ष ऑटो हान समवेत काम केल्यानंतर तिनं हानच्या तुलनेत एक शास्त्रज्ञ म्हणुन स्वतंत्र दर्जा, लौकीक मिळवला होता.
१९११-१२ ह्या काळात लीझ माइटनर आणि ऑटो हानचा गृप नव्यानं स्थापन झालेल्या "कायझर विल्हम्स इन्स्टिट्युट" इथे गेला. परंतू तिथेही पुन्हा स्त्री असल्यामुळे लीझला कुठलंही पद मिळालेलं नव्हतं. एक "बिनपगारी अतिथी" म्हणुनच तिला तिथे काम करावं लागलं. पुढे वर्षभरानी तिला हानच्या समदर्जाचं पद मिळालं. पण वेतन मात्र त्याच्या तुलनेत अतिशय अल्प, म्हणजे त्याच्या पगाराच्या फक्त एक पंचमांश!
पहिल्या महायुद्धाच्या काळात, म्हणजे १९१४ साली अनेक शास्त्रज्ञांप्रमाणे ऑटो हान देखील युद्ध आघाडीवर गेला. तर लीझनं क्ष-किरण परिक्षणासाठी नाव नोंदवलं. त्यानंतर ती क्ष-किरण तंत्रज्ञ परिचारिका म्हणुन ऑस्ट्रियन सैन्यात रुजु झाली. ऑक्टोबर १९१६ मधे लीझ बर्लिनला परतली. मात्र आता कायझर विल्हम्स इन्स्टिट्युट पूर्णपणे युद्धोपयोगी संशोधनात गुंतलेली असल्याचं तिच्या लक्षात आलं. कारण लष्करी संस्थेने इमारतीतले काही महत्वाचे विभाग ताब्यात घेतले होते आणि आपल्या कामासाठी त्यांना हान-माइटनर दोघांचं सहकार्य हवं होतं. लीझला युद्धोपयोगी संशोधनात गुंतायचं नव्हतं. संस्थेनी प्रस्ताव दिलेलं सवेतन उच्चपद तिनं नाकारलं. मग जानेवारी १९१७ मधे एमिल फिशरनं हान-माइटनर प्रयोगशाळेचे दोन भाग केले आणि लीझला तिचा स्वतंत्र भौतिकशास्त्र विभाग सुरु करुन दिला.

जानेवारी १९१८ मधे तिच्या आणि हानच्या पाच वर्षांच्या कष्टांचं फलित म्हणुन "अ‍ॅक्टिनियम" ह्या मूलद्रव्याचं जनक मूलद्रव्य सापडलं. त्याला नाव दिलं प्रोटॅक्टिनियम (Protactinium) Pa. बर्लिन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स आणि ओस्टिअन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सनं खास पुरस्कार देऊन लीझचा गौरव केला. जर्मन केमिस्ट संघानी ऑटो हानला प्रोटॅक्टिनियमच्या संशोधनासाठी "एमिल फिशर मेडल" बहाल केलं आणि त्या पदकाची फक्त प्रतिकृती लीझला दिली. प्रोटॅक्टिनियमच्या शोधासंबधी जे लेख प्रकाशित झाले, त्या सर्व लेखांवर लेखक म्हणुन ऑटो हानचं पहिलं नाव असे तर लीझचं दुसरं.
१९२० पासून लीझ आणि ऑटो हान ह्यांचे संशोधनाचे मार्ग वेगळे झाले.
बीटा आणि गॅमा वर्णपटातील संशोधनानं तिला प्रयोगवादी भौतिकशास्त्रज्ञांच्या प्रथम श्रेणीत नेऊन बसवलं. तिच्या संस्थेला आंतरराष्ट्रीय लौकीक मिळवुन देण्यास तिचं संशोधन कारणीभूत ठरलं.
१९२२ साली बर्लिन विद्यापीठानं तिला अध्यापक पद दिलं. हा दर्जा मिळवणारी ती जर्मनीतली दुसरी स्त्री. १९२६ मधे पदोन्नती होऊन ती जर्मनीतली भौतिकशास्त्राची पहिली स्री प्रोफेसर झाली. एकदा विद्यापीठाच्या समारंभाच्या वेळी तिचं व्याख्यान होतं. विषय होता "The significance of Radioactivity for Cosmic Process". विद्यापीठाच्या प्रकाशन विभागनं त्याचं नामकरण केलं "The significance of Radioactivity for Cosmetic Process". ही महिला शास्त्रज्ञ, ती Cosmetic Process बद्दलच बोलणार हा ठाम विश्वास!
१९३३ सालापर्यंत लीझनं बीटा-गॅमा वर्णपट, अल्फाकण, तसंच कॉस्मोलॉजी, न्युट्रॉन्स, पॉझिट्रॉन्स वगैरे अणुगर्भ विज्ञानाच्या विविधांगावर संशोधन केलं.
मात्र १९३३ मधे जर्मनीत हिटलर सत्तेवर आल्यावर अनेक ज्यू शास्त्रज्ञांना त्यागपत्र द्यावं लागलं किंवा जर्मनी सोडुन जावं लागलं. लीझनं खरंतर १९०८ मधेच ज्यू धर्म त्यागुन प्रोटेस्टंट धर्मपंथ स्विकारला होता. जर्मनीला पितृभूमी म्हणुन स्विकारलं होतं. तरी ६ सप्टेंबर १९३३ ला नात्झी सरकारनं लीझ माइटनरचा विद्यापीठीय अध्यापनाचा अधिकार काढुन घेतला. कोणत्याही सभांमधुन, चर्चासत्रांमधुन भाग घेण्यावर बंदी घालण्यात आली. अपुर्‍या अन्न-वस्त्र-निवार्‍या विषयी लीझची कधीच तक्रार नव्हती. संशोधन कार्य चालू ठेवता न येणं हीच तिच्या लेखी सगळ्यात कठोर शिक्षा होती. १९३६ पर्यंत तिचं नावही सगळीकडुन पुसलं गेलं. आपल्याला आता जर्मनीमधे राहता येणं अवघड आहे हे लक्षात आल्यावर अखेर अनेक अडचणींवर मात करत, पलायन करुन ती हॉलंडला आणि नंतर स्वीडनला गेली. १९०७ मधे लीझ माइटनर जर्मनीत आली होती ती एक गरीब विद्यार्थिनी म्हणून. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची भौतिकशास्त्रज्ञ, अणुगर्भ वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळाल्यावर ३१ वर्षांनी ती जर्मनी सोडत होती. सप्टेंबर १९३८ मधे ती स्टॉकहोममधे सीगबानच्या संस्थेत रुजु झाली.

अणुविखंडनाचे (Nuclear Fission) प्रयोग :

इकडे बर्लिनमधे ऑटो हान आणि फ्रिटझ स्ट्रासमन हे दोघे अणुविखंडनाच्या प्रयोगात जुंपले होते. राजकीय परिस्थितीमुळे लीझला त्यात प्रत्यक्ष सहभाग घेता येत नव्हता. तरीदेखील पत्रव्यवहारातुन ती सतत ह्या प्रयोगात गुंतली होती. अणुकेंद्राचं विखंडन होऊ शकतं, हे सर्वप्रथम लीझनं ओळखलं. ते कसं आणि का होतं त्याचं स्पष्टीकरणही सर्वप्रथम तिनीच दिलं. परंतू ह्याचं श्रेय मात्र ऑटो हान जाहीरपणे तिला देऊ शकला नाही. तिचा सहभाग अप्रत्यक्ष असल्यामुळे सर्व श्रेयापासून तिला वंचित रहावं लागलं.
अणुविखंडनामुळे भौतिकशास्त्र क्षेत्रात खळबळ उडाली होती. अमेरिकेतही अनेक शास्त्रज्ञांनी विखंडन पडताळुन घेतलं.
अणुगर्भ विज्ञानासंबधी नवीन प्रयोग करुन पहावेत तर तर लीझच्या हाताशी उपकरणं नव्हती. त्यामुळे तिच्या हाता-तोंडाशी आलेलं यश निसटुन जाई.
१९४३ साली लीझला "लॉस अ‍ॅलांओस"च्या अणुबॉम्ब निर्मिती प्रकल्पात सहभागी होण्याचं निमंत्रण मिळालं होतं. ते जर तिनं स्विकारलं असतं, तर ती पुन्हा एकदा मान्यवरांच्या प्रभावळीत झळकली असती. पण आपल्या ज्ञानाचा उपयोग अणुबॉम्ब निर्मितीसाठी करणं तिनं साफ नाकारलं. मृत्यू घडवुन आणणार्‍या कोणत्याही प्रकल्पात तिनं स्वत:च्या भौतिकशास्त्राच्या ज्ञानाला उपयोगात आणू दिलं नाही. ज्याच्यावर आपलं नियंत्रण उरणार नाही, अशी कुठलीही गोष्ट तिला निर्माण करायची नव्हती.

१९४३ साली अमेरिकेनी ALSOS नावाचं खास शोधपथक तयार केलं. जर्मनांची अण्वस्त्रनिर्मितीबाबत काय प्रगती आहे, तसे काही असल्यास ते प्रकल्प उध्वस्त करायचे ही मुख्य कामगिरी ह्या पथकावर होती. जर्मनीमधले शास्त्रज्ञ अण्वस्त्र तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत हे कळल्यावर लिओ झीलार्ड ह्या दोस्तराष्ट्रात आश्रय घेतलेल्या शास्त्रज्ञानी अमेरिकेनी आपलं अण्वस्त्र संशोधन गुप्त ठेवावं, असा आग्रह धरला. अमेरिकन गुप्तचर विभागातला एक एजंट जून १९४५ मधे स्टॉकहोम मधे लीझला भेटायला आला. जर्मनीतल्या विखंडन प्रकल्पाविषयी तिला कितपत माहिती आहे हे जाणण्यासाठी, तसंच ती सोविएत युनियन मधे जाणार आहे का, हे आजमवण्यासाठी तो आला होता. तो एजंट पुढे बर्लिनला जाऊन ऑटो हानला भेटणार होता. लीझनी त्याच्याकडे हान साठी एक पत्र दिलं. ह्यामधे ज्यू लोकांवरचे अत्याचार, शास्त्रज्ञांनी नात्झींसाठी केलेल्या कामाचा राग आदी गोष्टी व्यक्त झाल्या होत्या. ते पत्र हानला मिळालंच नाही. पुढे ते अमेरिकन गुप्तचर खात्याच्या दप्तरी गेलं.
६ ऑगस्ट १९४५ ला हिरोशिमावर पहिला युरेनियम अणुबॉम्ब पडला. बातमी ऐकताच लीझ सुन्न झाली. दुसर्‍याच दिवशीच्या एका लेखात लीझ माइटनरनं स्वत:ची कशी हिटलर पासून सुटका करुन घेतली आणि बॉम्बचं रहस्य दोस्त राष्ट्रांना पुरवलं, अशा स्वरुपाच्या कहाण्या होत्या. लीझ पुरती गोंधळुन गेली. तिला बॉम्ब बनवण्याविषयी, अमेरिका त्यात कशी यशस्वी झाली ह्याविषयी काहीही कल्पना नव्हती. युरेनियमच्या अणुविखंडनाची प्रक्रिया तिनं ओळखली होती, पण आता अणुविज्ञान कोणत्या टप्प्यावर पोचलंय ह्याचं तिला आकलन होत नव्हतं. खर्‍या-खोट्याचं मिश्रण होऊन दंतकथांना ऊत आला होता. लीझला "बॉम्बची ज्यू जननी" म्हणुन तिचा उल्लेख होऊ लागला. ९ ऑगस्टला दुसरा अणुबाँब नागासाकीवर पडला. त्याच रात्री एलिनॉर रुझवेल्टनं न्यूयॉर्कहून रेडिओद्वारा लीझची मुलाखत घेतली. त्यात लीझनं वारंवार स्पष्ट केलं की अण्विकशक्तीचा वापर विचारपूर्वक आणि शांततामय कार्यासाठी झाला पाहिजे.
शांततेच्या काळात, वर्णद्वेषविरहित परिस्थितीत अणुविखंडनाचा शोध लागला असता तर तो लीझ माइटनरच्या कारकीर्दीचा मुकुटमणी ठरला असता. पण तो लागला दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरच्या टप्प्यात. आणि मग शास्त्रज्ञांनी त्याच्यावर हक्क सांगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

१९४४ साली ऑटो हानला रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्याला रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिल्याबद्दल लीझच्या मित्रपरिवाराची/पाठीराख्यांची कोणतीच तक्रार नव्हती. पण भौतिकशास्त्रक्षेत्रातला नोबेल पुरस्कार त्यावर्षी लीझ माइटनरलाच मिळायला हवा होता, असं त्यांचं आग्रहपूर्वक म्हणणं होतं. कारण युरेनियम विखंडनाच्या बाबतीत "ते कसं आणि का होतं" ह्याचं स्पष्टिकरण सर्वात आधी लीझनं दिलं होतं, भौतिकशास्त्राच्या आधारे. हानला नोबेल पुरस्कार मिळाल्यावर त्याच्यावरील लेखांमधुन लीझ माइटनरचा उल्लेख "त्याची साहाय्यक" म्हणुन होऊ लागला. हाननं जरी स्वत: कधी तिचा उल्लेख "मदतनीस" म्हणुन केला नसला तरी तशी झालेली विधानं, करुन दिली गेलेली समजूत दूर करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.

लीझ माइटनरला ऑस्ट्रिया, जर्मनी, अमेरिका आदी राष्ट्रांकडुन बाकी अनेक पुरस्कार, मानसन्मान मिळाले. पण जर्मनीनं अणुविखंडनशोधाबाबत तिला कायम काठावरचंच स्थान दिलं. ही खंत तिला शेवटपर्यंत होती.

तिच्या ९० व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी २७ ऑक्टोबर १९६८ रोजी लीझ माइटनरचा मृत्यू झाला.

१९९२ साली पीटर आर्मब्रुस्टरनी शोधुन काढलेल्या १०९ क्रमांकाच्या मूलद्रव्याला तिचं नाव दिलं गेलं meitnerium (Mt).

------------------------------------
माझं आणि शास्त्राचं, खास करुन भौतिकशास्त्राचं, कधीच सख्य नव्हतं. त्यामुळे पुस्तकातले अनेकसे संदर्भ, लीझ माइटरनी मांडलेली गणितं, तिनी बांधलेले आडाखे हे थोडंसं डोक्यावरुन गेलं. पण तरीही पुस्तक वाचताना ते समजल्या वाचुन तसं अडलं नाही.
लीझ माइटनरची हुशारी, तिनं केलेलं संशोधन कार्य, नंतर कुटुंबापासून तिची झालेली ताटातुट, तिनं झेललेली आर्थिक संकटं, तिला करावं लागलेलं देशांतर, ऑटो हाननी तिच्या समवेत तीस वर्ष केलेल्या संशोधन कामाविषयी नंतर नंतर केलेला अनुल्लेख, नोबेल पुरस्कारापासून वंचित राहणं, तिला तिच्या संशोधनाचं योग्य श्रेय न मिळणं, युरेनियमचं विखंडन, अणुबॉम्ब करण्यासाठी शास्त्रज्ञांमधे चाललेली अहम-अहमिका, जर्मनीमधे ज्यूंवरचे अत्याचार, ह्या सगळ्याविषयी पुस्तकात बरंच सविस्तर वर्णन दिलं आहे. लीझच्या आयुष्यात घडलेल्या अनेकानेक घटना इतक्या गुंतागुंतीच्या आणि वेगवान आहेत, की ह्या छोट्याश्या पुस्तकात त्या अक्षरश: झंझावातासारख्या समोर येत राहतात. उपेक्षा-अपमान आणि मानसन्मान-कौतुक हे ऋतुचक्र तिच्या आयुष्यात सतत फिरतच राहिलं. त्या सगळ्याचाच आढावा मला नाही घेता आलेला. (आणि ते एक प्रकारे बरंही झालं असं वाटलं. कारण मग बाकीच्यांना हे पुस्तक वाचताना त्यातली रंगत कमी झाली असं वाटु शकलं असतं.)
एक प्रश्न सारखा पडतो की लीझ माइटनरला एक शास्त्रज्ञ म्हणुन, देशांतरीत म्हणुन बराच संघर्ष करावा लागला. पण तिचा हा संघर्ष जर ती स्त्री नसती तर कित्येक पटींनी कमी झाला असता का? एक शास्त्रज्ञ म्हणुन स्वत:ला सिद्ध करताना तिला इतकं झगडावं लागलं असतं का? म्हणजे अगदी एमिल फिशर आणि मॅक्स प्लँक सारख्या शास्त्रज्ञांकडुनही आधी "तू एक स्त्री आहेस" अशा उपेक्षेला सामोरं जावं लागलं. खरं तर लीझ माइटनर ही साधारण मादाम मेरी क्युरीच्याच काळातली. मेरी क्युरी पेक्षा ११ वर्षांनी लहान. आईन्स्टाईन तर तिला "अवर मादाम क्युरी" म्हणे. मग स्री असुनही मेरी क्युरीला विज्ञान जगतात मिळालेलं यश, तिला मिळालेली मान्यता ह्या दुसर्‍या मेरी क्युरीच्या वाट्याला संघर्षानंतरही का येऊ नये?

ह्या पुस्तकावर लिहायला घेतलं आणि योगायोग लक्षात आला की लीझ माइटनर म्हणजे एक अणुशास्त्रज्ञ. जिला आपल्या ज्ञानाचा, संशोधनाचा उपयोग कधीही विध्वंसक कार्यासाठी करायचा नव्हता. तिच्या ध्यानीमनी नसताना अणूर्जेचा पहिला वाईट वापर केला गेला तो जपानवर. त्या घटनेला नुकतीच ६६ वर्षं पूर्ण झाली. आणि आजच म्हणजे १५ ऑगस्ट २०११ ला जपाननी शरणागती पत्करल्यावर हे विनाशकारी युद्ध संपुन ६६ वर्षं झाली. तसंच आत्तादेखील फुकुशिमा प्लँट्मुळे पुन्हा एकदा जपानला किरणोत्सर्गाच्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतय. आणि जपानमधेच बसुन मी लीझ माइटनर आणि अणुविखंडनातलं तिचं योगदान ह्याविषयी लिहित्ये. किरणोत्सर्ग आणि अणुगर्भाशी तिचं नातं अतुटच असावं.

-------------------------------
डॉ. रुथ लेविन साइम ह्या रसायन शास्त्रज्ञ लेखिकेने लीझ माइटनरचा पत्रव्यवहार, संशोधना संबधीचे पुरावे, दैनंदिनी, अनेक ग्रंथ, मुलाखती, खाजगी पत्र ह्यांच्या आधारानी संशोधन केलं आणि त्यातुन चरित्रग्रंथ लिहिला "Lise Meitner, a life in physics". ह्यातुनच काळाच्या उदरात गडप झालेला लिझ माइटनर विषयीचा अमुल्य ठेवा जगाच्या हाती लागला. वीणाताईंनी मुख्यत्वेकरुन ह्याच ग्रंथाच्या आधारे त्यांचं हे पुस्तक लिहिलय.
-------------------------------